शहरात प्रत्येकाचा ‘आपला भाग’ असतो.. पण स्थलांतरितांचं काय? तेही आपापले भाग निर्माण करण्याच्या प्रयत्नात ‘सांस्कृतिक आव्हानं’ पेलत असतात आणि शहराचा बहुढंगीपणा वाढवत असतात..

अफाट विस्तारलेलं महानगर असो, झपाटय़ानं पसरणारं मोठं, मध्यम शहर असो वा अंगापिंडाने भरत चाललेले गाववजा शहर – घट्ट नातं म्हणाल तर शहरातल्या एखाद्याच भागाशी असतं आपलं. शहर म्हणून नकाशावर विसावलेल्या भौगोलिक सीमा कितीही विस्तारत गेल्या तरी आपल्या कल्पनेत शहराच्या सीमा वेगळ्या असतात. शहराचा एक अमूर्त तुकडा आपण ‘आपला’ म्हणून कवटाळलेला असतो. म्हणताना म्हणू आपण मारे शहर आपलंबिपलं आणि आपण ‘शहराचे नागरिक’ वगैरे; पण शहरामध्ये बराच काळ वावरताना, राहताना आपले आर्थिक- सामाजिक- सांस्कृतिक व्यवहार शहराच्या ज्या हिश्शात एकवटलेले असतात, तो हिस्सा ‘आपला भाग’ वाटत राहतो आणि बाकी काहीसा परका. एखादा भाग आपला का वाटावा आणि दुसरा का वाटू नये यामागे भाषा, जात, धर्म, वर्ग, वर्ण यांआधारे एकवटण्याची विषम मानसिकता मोठय़ा प्रमाणावर आहे हे ओघानं आलंच.
अशा अनेक ‘ओळखीं’मधून, ‘आयडेंटिटी’मधून आकारलेल्या शहरी अवकाशाशी तिथे वावरणाऱ्या स्थानिकांचा, स्थलांतरितांचा आणि अर्धस्थलांतरितांचाही- मनोव्यापार खेळत राहतो आणि ‘आपल्या भागाची’ मनोव्याप्तीही बदलत राहते. अर्बन स्टडीजमध्ये याला ‘इमॅजीनड टेरिटरीज’ म्हणतात – कल्पित हद्दिते! भाऊ पाध्यांच्या ‘वासूनाका’मधले मोन्या, डाफ्या ‘वालपाखाडी’ हा आपला ‘एरिया’ मानतात किंवा जयंत पवारांच्या ‘अधांतर’मधला नरू ‘आपल्या हद्दीत’ टगेगिरी करू बघतो ही या अजस्र महानगरीतल्या ‘कल्पित हद्दितांची’ एव्हरग्रीन उदाहरणे. शहरात स्थिरावलेल्या स्थानिकांसाठी अशा हद्दी आखून घेणं अवघड नसतं, पण नव्यानेच आलेल्या स्थलांतरितासाठी ‘आपल्या’ भागाची हद्द ठरवणं आव्हानात्मक असतं. शहरात राहता कुठेही आलं, काम कुठेही मिळालं तरी जिथे ‘घरच्यासारखं’ वाटेल- मागे सोडून आलेल्या घराची/ गावाची/ राज्याची/ देशाची आठवण करून देणारा सामाजिक-सांस्कृतिक व्यवहार जिथे करता येईल- अशा ‘भवताला’च्या शोधात स्थलांतरित असतात. जिथे कोणत्याही भयाच्या सावटाविना ओळखीचं अन्न शिजवता येईल, नेहमीची भाषा बोलता येईल, गाणी-बजावणी, सण-समारंभ साजरे करता येतील, धर्मव्यवहार सांभाळता येतील असा भवताल सामूहिकरीत्या, कोणा ‘स्थानिकाच्या’ डोळ्यांवर येणार नाही या पद्धतीनं हळूहळू निर्माण करीत जाणं ही स्थलांतरितांची निकड असते आणि एक आव्हानही. अवाढव्य, अमूर्त शहरी अवकाशामधून स्वत:चा व आपल्या समूहाचा भवताल निर्माण करीत शहरामध्ये रुजत जाणारे स्थलांतरित शहराच्या जिवंतपणात महत्त्वाचं योगदान देतात. अनेक बंदर-शहरांमध्ये बंदराजवळ आढळणारी ‘चायना टाऊन्स’, फाळणीनंतर शेकडय़ाने वसलेले ‘सिंधी कॅम्प’, धरमशालामधील ‘तिबेट’, धारावीतलं ‘कामराजनगर’ वा पुण्यातला झपाटय़ाने बदलणारा ‘हिंजवडी- मॉडेल कॉलनी- एफ.सी. रोड’ परिसर ही भवताल निर्माण करण्याची परिपक्व ते उगवती उदाहरणे. अशी ‘भवतालनिर्मिती’ अथवा ‘प्लेसमेकिंग’ची प्रक्रिया डोळसपणे उलगडून पाहणं एक वेगळं भान देऊन जातं. अर्थात स्थलांतरित समूहाच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीनुसार, सांस्कृतिक सजगतेनुसार भवतालनिर्मिती बदलत जाते. यूपी/ बिहारमधून मुंबईत स्थलांतर करून भोजपुरी अभिव्यक्तीत आपली अस्मिता टिकवणारे समूह आणि ईशान्य भारतातून दिल्लीमध्ये स्थलांतर करणारे समूह यांचा आपापल्या ठिकाणी भवतालनिर्मितीला प्रतिसाद टोकाचा भिन्न तर आहेच, पण एक वेगळं आकलन घडवणाराही आहे. विशेषत: दिल्लीमधील ईशान्य भारतीयांचा!
ईशान्येकडील आठ राज्यांचा समूह ‘प्रतिज्ञा’, ‘भारतमाता की जय’ वगैरे म्हणणाऱ्या वा न म्हणणाऱ्याही तमाम भारतीयांसाठी काही ठरावीक ‘समजुतींपलीकडे’ विशेष उत्सुकतेचा विषय नसतो. तेथे असलेले वांशिक गट-तट, राजकीय-सामाजिक अस्थिरता, विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही विकासाचा अभाव, परिणामी बेकारी यामुळे या राज्यांतील अनेक सुस्थापितांनी दिल्लीकडे प्रस्थान ठेवले. शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या अनेक उत्तम संधी हे एक आकर्षण होते- मात्र तेथील अल्प उत्पन्न गटाला दिल्लीत स्थलांतरित होण्याचा पर्याय अजूनही आवाक्याबाहेरचा होता. १९९० नंतर भारतीय अर्थव्यवस्थेने सांधे बदलले. दिल्ली ‘शहरा’वरही त्याचे पडसाद उमटलेच. गुडगाँव, नोएडा, फरिदाबाद ही सॅटेलाइट टाऊन्स सेवाक्षेत्राने कवेत घेतली, मॉल, कॉल सेंटर्स, रिटेल शॉप्स यांतून रोजगार निर्माण झाले. उत्तम इंग्रजी बोलू शकणारे, खरे तर ‘टिपिकल इंडियन अ‍ॅक्सेंट’ नसणारे आणि शिफ्ट डय़ुटीज करू शकणारे तरुण मनुष्यबळ त्यासाठी हवे होते. ही गरज ईशान्य भारतातील तरुणाई सहजी पूर्ण करू शकत होती. आसाम/त्रिपुरासारख्या ब्रह्मपुत्र-खोऱ्यातील राज्यांपेक्षा मणिपूर, मिझोरम, मेघालयसारख्या डोंगराळ भागांत दशकानुदशके ख्रिस्ती मिशनरी शाळा-कॉलेजांनी आपले जाळे फार पूर्वीपासून विणले होते. मात्र या राज्यांमध्ये नोकरीची शाश्वती नव्हती. ९०च्या दशकापासून पुढे मात्र, बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी दिल्लीमधील दर्जेदार कॉलेजात जायचा, नोकरी पत्करायचा पर्याय उपलब्ध झाला. तो अनेक कोवळ्या तरुण-तरुणींनी स्वीकारला. या तरुणांसोबत कुटुंबीयांसोबत नसल्याने वाढत्या सव्‍‌र्हिस सेक्टरकरिता ते ‘लो मेंटेनन्स हय़ूमन रिसोर्स’ ठरले. एकीकडे जागतिकीकरण आणि नवउदार अर्थनीती दिल्लीच्या परिघावरील गावांमधून स्थानिकांना दूर करीत ‘जेन्ट्रिफिकेशन’ लादत असताना, ‘ग्लोबल सिटी’चे वेध लागलेली दिल्ली हजारो मैलांवरील ईशान्य भारतीयांना मात्र रोजगाराच्या नवीन संधी बहाल करून आपल्यात सामावून घेत होती. ईशान्य भारतीय दिल्लीमध्ये आले तरी यूपी-बिहारच्या अंगमेहनती मजुरांप्रमाणे ते परिस्थितीशरण वगैरे नव्हते. ‘होम स्टेट’शी मिळताजुळता ‘भवताल’ निर्माण करण्याची तीव्र असोशी होती त्यांच्यात; पण आव्हाने सांस्कृतिक आघाडीवर होती.
विशिष्ट चेहरेपट्टीमुळे, शारीरिक ठेवणीमुळे त्यांना दिल्लीमध्ये भयंकर हेटाळणी सहन करावी लागली, आजही लागते. नागा, कुकी, बोडो, मैतेयी, राजवंशी या स्वत:च्या वांशिक आणि त्याला जोडून येणाऱ्या धार्मिक अस्मिता कटाक्षाने जपणारे हे कोवळे तरुण ‘सरासरी ईशान्य भारतीय’ – नॉर्थ ईस्टर्नर- ही भोंगळ अस्मिता स्वीकारू शकत नाहीत. डोंगरी भागात आणि खोऱ्यात बांबू शूट्सपासून पोर्क वा बीफपर्यंत वेगवेगळे अन्नपदार्थ खातात. दिल्लीमध्ये सुरुवातीला हे सगळ मिळवणं वा हिंदूबहुल वस्तीत बीफ किंवा मुस्लीमबहुल वस्तीत पोर्क शिजवून खाणं शक्यच नव्हतं. परिणामी घर शोधताना वणवण भटकणं ओघानं आलं. पुन्हा हिंदी भाषेचा गंध नाही. रिक्षा-बसमध्ये वा इस्टेट एजंटकडून होणारी आर्थिक फसवणूक नेहमीचीच. डोंगरी वातावरणात मोकळे-ढाकळेपणे, लिंग-भेद मनातही न आणता एकत्र वावरणारे ईशान्य भारतीय तरुण-तरुणी, ‘कम्फर्ट क्लोद्स’ म्हणून थ्री फोथ्र्स-जीन्स-टीज घालणाऱ्या तरुणी दिल्ली-हरयाणातील आक्रमक, रासवट, पुरुषी वर्चस्ववादी दृष्टीला कायम खटकत आले आहेत. अश्लील लैंगिक शेरेबाजीने एक टोक गाठल्याचा आणि ‘संस्कृतिविडंबन करणाऱ्या अशा मुलींना दुसरं काय म्हणणार’ हा बेशरम दृष्टिकोन सार्वत्रिक झाल्याचाही तो काळ. (‘चक दे इंडिया’मधले रजिस्ट्रेशन डेस्कवरचे आणि छेडखानीचे प्रसंग आठवताहेत?). रोजगाराच्या संधी पदरात पाडून घेताना आपल्या राज्यापासून दूर, एका नवख्या मात्र ‘असहिष्णू’ ‘राष्ट्रीय राजधानीमध्ये’ ईशान्य भारतीय तरुणाईने भयंकर सांस्कृतिक घुसमट अनुभवली. जिथे ‘घरच्या’प्रमाणे पोर्क-बीफ शिजवता येईल (मुळात उपलब्धही करून घेता येईल), आपली वांशिक अस्मिता वेगळी सांगता येईल, आपल्या भाषेत ‘संवाद’ साधता येईल आणि जिथे लैंगिक- वांशिक शेरेबाजी नसेल अशा एका ‘हवाबंद’ पोकळीतील ‘सांस्कृतिक’ भवतालाची तीव्र ओढ दिल्लीमधील ईशान्य भारतीय भवतालनिर्मितीला जन्म देऊन गेली आहे.
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या नॉर्थ कॅम्पसला लागून जीटीबीनगर वा मजनू का टिला असेल, साऊथ कॅम्पस, जेएनयू किंवा आयआयटीजवळ हुमायूनपूर, मुनीरका, ग्रीन पार्क असेल.. त्यांचा चेहरा मणिपुरी, मिझोरामी, अरुणाचली किंवा सरमिसळ ईशान्य भारतीय झाला आहे. छोटय़ा छोटय़ा ब्लॉक्समधून राहणारे, चिंचोळ्या गल्ल्यांमधून वावरणारे हे तरुण जणू आपलं गाव उभारू पाहताहेत. वांशिक अस्मितांनुसार, भाषिक वैशिष्टय़ानुसार आलेली ‘चर्चेस’, ईशान्य भारतीय पाद्री हा तिथे या मुलांना भावनिक आधार देणारा एक महत्त्वाचा ‘मीलनबिंदू’ झाला आहे. भूतान-तिबेटमधून आलेले किंवा शिष्यवृत्त्या घेऊन भारतात आलेले आग्नेय आशियाई विद्यार्थी या चर्चेसमध्ये आवर्जून जातात. कोरियन टी.व्ही. मालिका आवडीने बघतात, जवळच्या डीयर पार्कमध्ये पारंपरिक तालांवर नृत्यं करतात. छोलेभटुरे, ब्रेड पकोडे आणि दही भल्ला मिळणाऱ्या रस्त्यांवर आता मोमो विकणाऱ्या ठेल्यांची रेलचेल असते. आडगल्ल्यांत पोर्क/बीफ शॉप्स- बांबू शूट्स विकणारे विक्रेते आढळतात. या भागांत ‘चिंकी’ शब्दावर किंवा ‘अश्लील कमेंट’वर नापसंतीचे केवळ कटाक्षच उमटत नाहीत तर संघटित विरोध दर्शवला जातो.
दिल्लीमध्ये गेली दोन-तीन दशके अव्याहत सुरू असलेलं, ‘असहिष्णू’ नवउदार अर्थनीतीच्या सावलीत वाढलेलं हे भवतालनिर्माण अस्मितेमागील सांस्कृतिक राजकारणही उलगडून दाखवतं. शहरी अवकाशावर ‘हक्क’ प्रस्थापित करताना दिसतात जेव्हा हे स्थलांतरित, तेव्हा कुठे तरी ते शहराला समृद्ध करता करता शहरात सामावूनच गेलेले असतात, नाही का?