दारू पिणे हा मूलभूत हक्क आहे, तसेच ते प्रतिष्ठेचे लक्षणही आहे, असे विधान करून मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबुलाल गौर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
दारू पिऊन गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत नाही, हे पटवून देण्यासाठी ८५ वर्षांचे गौर यांनी हे वक्तव्य केले. दारू गुन्हे वाढवत नाही. दारू (अल्कोहोल) पिल्यानंतर लोक त्यांची शुद्ध गमावून बसतात आणि त्यामुळे गुन्हा घडतो. जी व्यक्ती मर्यादेत दारूचे सेवन करते, ती गुन्हा करत नाही. त्यामुळे कुणीही प्रमाणाबाहेर दारू पिऊ नये, एवढेच. दारू पिणे हा सर्वाचा मूलभूत हक्क असून, दारू पिणे हा अलीकडे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाला आहे, असे ते म्हणाले.
भोपाळमध्ये दारूच्या विक्रीची वेळ रात्री दहावरून ११.३० वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याबाबत पत्रकारांनी गौर यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली होती.
गौर हे यापूर्वीही बरेचदा वादग्रस्त ठरले आहेत. तामिळनाडूतील स्त्रिया ‘अंगभर कपडे’ घालत असल्याने इतर राज्यांच्या तुलनेत तेथे लैंगिक गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी आहे, असे त्यांनी चेन्नई भेटीदरम्यान म्हटले होते.
‘धोतर कसे घालावे ही मी शिकवू शकत नसलो, तरी ते कसे सोडावे हे मी तुम्हाला शिकवू शकतो,’ असे एका रशियन नेत्याच्या पत्नीला म्हटल्यामुळे गौर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. महिला अधिकार कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. बलात्काराचे वर्णन ‘सामाजिक गुन्हा’ असे करून, कधी तो बरोबर असतो, तर कधी चूक असतो, असेही ते म्हणाले होते. महिलांवर बलात्कार होणार नाहीत, याची सरकार खात्री देऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी काँग्रेसची संतप्त टीका ओढवून घेतली होती.