भारतीय ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये सध्या हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही या तीनही गाडय़ांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणता येईल, अशा क्रॉसओव्हर प्रकारच्या गाडय़ांनी प्रवेश केला आहे. पण या गाडय़ा खरोखरच एसयूव्हीसारखा परफॉर्मन्स देतात का, या गाडय़ांमध्ये असं काय वेगळं असतं..

क्रॉसओव्हर गाडी म्हणजे काय?

क्रॉसओव्हर गाडी म्हणजे हॅचबॅक किंवा सेडान कारचं मॉडेल घेऊन त्याला एसयूव्हीसारखा लुक देऊन बनवलेली गाडी. या प्रकारात प्रवासी गाडीच्या फ्रेमवर एसयूव्ही गाडीचे फीचर्स बसवले जातात. म्हणजेच या गाडय़ांचा लुक थोडासा स्पोर्टी असतो. थोडी उंच गाडी, त्यामुळे जास्त ग्राउंड क्लिअरन्स, तगडं इंजिन अशा सगळ्या गोष्टी या गाडीत दिल्या जातात. मात्र त्याचबरोबर एखाद्या हॅचबॅकमध्ये असलेली फीचर्सही त्यांत असतात. म्हणजेच उत्तम मायलेज, ऐसपैस सीट्स, उत्तम अंतर्गत रचना यांचाही समन्वय या गाडय़ांमध्ये साधला जातो.

गाडय़ा कोणकोणत्या?
सध्या भारतीय बाजारपेठेत खूपच कमी कंपन्यांनी क्रॉसओव्हर प्रकारच्या गाडय़ा आणल्या आहेत. या
कंपन्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक गाडय़ांच्या डिझाइन्सवरच आधारित या सर्व क्रॉसओव्हर गाडय़ा आहेत. क्रॉसओव्हर गाडय़ांकडे एक दृष्टी टाकली की, त्यांच्या मूळ हॅचबॅक गाडय़ा ओळखणं अजिबात कठीण जात नाही. यात मुख्य फरक हा असतो की, क्रॉसओव्हर गाडय़ा जास्त स्पोर्टी असतात. या गाडय़ा फक्त एसयूव्हीसारख्या दिसतात की, त्या तशा कामगिरीही करतात, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण या गाडय़ा निश्चितपणे त्यांच्या हॅचबॅक व्हर्जनपेक्षा नक्कीच चांगली कामगिरी पार पाडतात आणि ग्राहकांना एक वेगळीच अनुभूती देतात. त्यांची किंमतही नेहमीच्या हॅचबॅक मॉडेलपेक्षा जरा जास्त असते. स्पोर्टी लुक, आकर्षक अंतर्गत रचना, तांत्रिकदृष्टय़ा प्रगत बदल यांमुळे या गाडय़ांची किंमत काहीशी वाढते. भारतीय बाजारपेठेत फक्त तीन कंपन्यांच्या क्रॉसओव्हर कार्स आहेत. यात टोयोटा इटियॉस क्रॉस, फोक्सव्ॉगन, क्रॉस पोलो आणि पुंतो इव्होवर आधारित फियाट अ‍ॅव्हेंच्युरा!

टोयोटा इटियॉस क्रॉस
या गाडीची पेट्रोल व्हेरियंटमधील बेसिक किंमत ५.९५ लाख एवढी आहे, तर डिझेल व्हेरियंटची किंमत ७.३ 91लाखांपासून सुरू होते. टोयोटा कंपनीच्या गाडय़ा वापरण्याची सवय असलेल्यांना आणि या कंपनीची महती माहिती असलेल्यांना टोयोटाच्या इंजिनबद्दल वेगळं सांगायला नको. पण ही गाडी नेहमीच्या इटियॉसपेक्षा नक्कीच वेगळी आणि स्पोर्टी आहे. पॉवर विंडोज, फॅब्रिक सीट्स, पॉवर स्टिअरिंग अशी फीचर्स असलेल्या या गाडीचा मायलेजही १७ किलोमीटर प्रतिलिटरच्या आसपास आहे. डिझेल व्हेरियंटमध्ये हेच मायलेज २३ किलोमीटपर्यंत आहे. त्यामुळे टोयोटा इटियॉस क्रॉस ही गाडी एक स्टाइल स्टेटमेण्ट ठरू शकते.

फोक्सवॅगन क्रॉस पोलो
फोक्सवॅगनची भारतीय बाजारपेठेतील सुरुवात दमदार करणारी गाडी म्हणजे पोलो. त्यानंतर या कंपनीच्या जेट्टा, पसॅट, बिटल या गाडय़ांनी भारतीय घराघरांत स्थान मिळवलं. पण हॅचबॅक प्रकारातील या गाडीने उच्च मध्यमवर्गीयांच्या घराचे गॅरेज बघितले. या गाडीचंच क्रॉस मॉडेल फोक्सव्ॉगनने क्रॉस पोलो नावाने बाजारात आणलं आहे. आकर्षक बाह्य़रूप, अंतर्गत रचना आणि या सर्वासह डिझेल व्हेरियंटमधील २२ 92किलोमीटर प्रतिलिटरचं मायलेज यांमुळे ही गाडी लोकांच्या पसंतीला उतरणार, यात शंकाच नाही. या गाडीची डिझेल व्हेरियंटची किंमत ८ लाखांच्या आसपास आहे.

फियाट अ‍ॅव्हेंच्युरा
फियाट कंपनी भारतीयांसाठी जुनी नसली, तरी या कंपनीने आपल्या नवीन डिझाइन्सच्या आकर्षक गाडय़ा भारतीय बाजारपेठेत आणत पुन्हा एकदा या बाजारपेठेत आपले आसन बळकट करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला मिळालेले यश म्हणजे फियाटची हॅचबॅक गाडी 93पुंतो! फियाटचे जबरदस्त इंजिन आणि आरामदायक रचना यांमुळे ही गाडी फियाटसाठी लाभदायक ठरली. आता क्रॉसओव्हर मॉडेल आणतानाही फियाटने पुंतो इव्हो या गाडीलाच पसंती देत अ‍ॅव्हेंच्युरा ही क्रॉसओव्हर गाडी आणली आहे. पेट्रोल व्हेरियंटमधील या गाडीच्या बेसिक मॉडेलची किंमत ६.१ लाख एवढी आहे. तर डिझेल व्हेरियंटमध्ये हीच किंमत ८.१ लाखांच्या आसपास आहे. इतर दोन गाडय़ांप्रमाणेच या गाडीची अंतर्गत रचना आणि सोयी सारख्याच आहेत. पेट्रोलमध्ये ही गाडी १७ किमी आणि डिझेलमध्ये २१ किमी एवढा मायलेज देते.