बऱ्याच वर्षांपूर्वी गाडी चालवायला शिकले तरी स्वत:च्या जबाबदारीवर एकटीने गाडी चालवायची संधी मिळाली नव्हती. पन्नाशीत प्रवेश केल्यावर जेव्हा आम्ही स्वत:ची गाडी घेतली तेव्हाच गाडीचं स्टीअिरग माझ्या हातात आलं. शिकले होते डबल ब्रेकच्या ड्रायिव्हग स्कूलच्या फियाटवर आणि चालवायची होती ५ गीअरची सँट्रो. म्हणून एक ‘रिफ्रेशर’ कोर्स करावा असं ठरवलं. पहिल्याच दिवशी माझे शिक्षक म्हणाले, आजारी पडून बरेच दिवस अंथरुणावर पडून राहिलो म्हणून आपण चालायला विसरतो का? तुम्हाला येत्येय गाडी चालवायला, फक्त तुमचा आत्मविश्वास कमी झालाय, तो वाढवायला तुम्हाला मी मदत करीन. मला हुरूप आला आणि खरंच ८ दिवसांत मला स्वत:बद्दल खात्री वाटायला लागली. गाडी घेऊन मी पार अगदी मुळशीपर्यंत जाऊन आले. बाजूला माझे शिक्षक होतेच बसलेले. माझा उत्साह पाहून ते म्हणाले, वाढत्या वयातल्या पुरुषांना मी आजवर शिकवलंय, पण तुमच्या वयाच्या बाईला पहिल्यांदाच शिकवतोय. मलाही एक नवा अनुभव आणि आत्मविश्वास मिळाला तुमच्यामुळे.
महिन्याभरात मी गाडी घेऊन मुंबईला गेले. कोथरूड ते अंधेरी साडेतीन तासात गेले. त्यात पंधरा मिनिटं चहासाठी. आता मी सराईत गाडी चालवू लागले. मुंबईहून सकाळी ६ आणि पुण्याहून सकाळी ८ वाजता निघालं तर अति वेगाने न जातासुद्धा अडीच-तीन तासांत पोचता येतं हे लक्षात आलं. मुंबई-पुणे प्रवास तर नेहमीचा आणि सवयीचा झाला, पण पुण्याहून सांगली, सातारा, कोल्हापूर, नरसोबाची वाडी इथेसुद्धा अगदी सहज जाऊ लागले.
मुंबई-पुण्यात गाडी चालवण्यापेक्षा एक्स्प्रेस हायवेवर गाडी चालवणं मला सोपं वाटतं. तिथे अति घाई, विनाकारण स्पर्धा आणि फाजील आत्मविश्वास टाळून आपली लेन पकडून निवांत ठरावीक वेगात जात राहिलं तर फारसं कुणी आपल्या वाटेत येत नाही. मुख्य म्हणजे दुचाकीस्वार, बस ड्रायव्हर आणि रिक्षावाले नसतात डोकं फिरवायला. २००९ सालच्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ आलं होतं. त्या दिवशी मला मुंबईला जाणं अगदी आवश्यक होतं, कारण पुतणीच्या लग्नासाठी दुसऱ्या दिवशी लखनौला जायचं होतं. मी सगळं सामान गाडीत भरलं, हायवे पोलिसांना फोन केला की हायवेवर आणि मुख्य म्हणजे घाटात काय परिस्थिती आहे? ‘पाऊस अजिबात नाहीये, कुठेही पाणी नाही, वारा पुष्कळ आहे पण रस्ता एकदम मोकळा आहे. बिनघोर जा.’ हे ऐकलं आणि देवाचं नाव घेऊन निघाले. धोका वाटला, भीती वाटली तर जिथे असू तिथून परत फिरायचं हे पक्कं ठरवलं होतं. रस्ता खरोखर मोकळा होता. मोठमोठे कंटेनर्स आणि बसगाडय़ा डाव्या बाजूने सावकाश जात होते, मी मधून ७०-८०च्या वेगाने आणि बाजूच्या जलद लेनमधून क्वचित एखादी गाडी बंदुकीच्या गोळीसारखी सुसाट जात होती. वारा भन्नाट वाहत होता. पायी चालणं-दुचाकी किंवा रिक्षासारखं हलकं वाहन चालवणं अशक्यच होतं. लोणावळ्यात कॉफी घेतली. पुढे खंडाळ्याच्या बोगद्यापासून अडोशीच्या बोगद्यापर्यंत पाऊस लागला. वाऱ्यामुळे धारा आडव्या तिडव्या पडत होत्या. वायपर्स फुल ठेवावे लागत होते. त्या अंतरात मी चक्क १५च्या वेगाने गाडी आणली. एकटी होते, रस्ता सुनसान होता, उतार होता, धोका न पत्करणं हाच शहाणपणा होता. घाट उतरून फूड मॉलला आले, रस्त्याच्या कडेला 5 मिनिटं थांबले आणि पुढे निघाले. नवल म्हणजे त्या दिवशी चेंबूर-सायन-धारावीमध्येसुद्धा रस्ते मोकळे होते. साडेअकरा वाजता निघाले होते कोथरूडहून. बरोब्बर पावणेतीन वाजता-म्हणजे सव्वातीन तासांत अंधेरीला पोचले. वादळी वारा आणि पाऊस यांच्या साथीने घाटात गाडी चालवण्याचा अनुभव विलक्षण थरारक होता. गाडीमुळे मला हवं तेव्हा हवं तिथे जाण्याचं स्वातंत्र्य मिळालंय आणि ‘प्रयत्न केला तर काही कठीण नाही’ हा आत्मविश्वास मिळालाय. आता मी साठीत आहे, अल्टो 10 चालवते, वेळ थोडा जास्त घेते, पण नजर, कान आणि हातपाय साथ देत आहेत तोपर्यंत मी गाडी चालवायची थांबणार नाही हे मात्र नक्की.
– राधा मराठे, अंधेरी (मुंबई)

ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले ड्रायिव्हग लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा.. मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा.
माहिती मेल करा.. ls.driveit@gmail.com