व्हिंटेज अ‍ॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया (व्हीसीसीआय) यांच्यातर्फे अलीकडेच पुण्यात व्हिंटेज कार रॅली आयोजित करण्यात आली होती. या कार रॅलीत रोल्स रॉइसपसून विलीजपर्यंत अशा सर्व प्रकारच्या ९० गाडय़ा सहभागी झाल्या होत्या. या रॅलीचा आढावा..

गाडी कितीही जुनी झाली तरी तिच्यावरील मालकाचे प्रेम काही कमी होत नाही. त्यात जर गाडी अगदीच जुनी असेल, अगदी थेट गोऱ्या साहेबाच्या काळातली, तर मग बघायलाच नको. त्या वेळच्या गाडय़ांचा ऐटबाजपणा, डामडौल, तिची देखभाल अगदी आनंदाने सांभाळला जातो. अगदी हीच बाब पुण्यात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या व्हिंटेज कार रॅलीत ठळकपणे दिसून आली. रोल्स रॉइस, पॅकॉर्ड, इम्पाला, डॉज, रोइली, मॉरिस, मर्सिडिज या व अशा अनेक गाडय़ा पुणेकरांना रस्त्यावर धावताना दिसल्या. केवळ चारचाकीच नव्हे तर दुचाकीही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. या मोटारी बघताना, त्यांच्या मालकांशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवत होती की, हा फक्त आणि फक्त पशांचा खेळ नव्हे! अर्थात पसा (तोही थोडाथोडका नव्हे!) असल्याशिवाय जुन्या मोटारी खरेदी करता येत नाहीत हे खरे, पण मोटारींबद्दल खरेखुरे प्रेम असल्याशिवाय त्या सांभाळता येत नाहीत हेही तितकेच खरे!

हडसन, द ग्रेट
d8रंगसंगतीची कमाल असलेली आणखी एक देखणी मोटार म्हणजे ‘हडसन ग्रेट’. व्हीसीसीसीआयचे अध्यक्ष नितीन डोसा यांच्या मालकीची ही दुर्मीळ मोटार थेट १९३२ मधली. डोसा यांच्याकडे ती आली १९९७ मध्ये. इतर गाडय़ांसारखीच या गाडीचीही दुरवस्था झाली होती. मात्र, तिला पुन्हा तिच्या पूर्वीच्याच दिमाखात उभे केले तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्फारले, हडसनची अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे काळजी घेणारे राजू सांगत होते. सात माणसे बसू शकतील अशी ऐसपस जागा, ‘फोल्ड’ करता येणारे छत, आठ सिलिंडर असलेले इंजिन आणि मेकॅनिकल सायकल ब्रेक्स ही तिची वैशिष्टय़े. सगळ्यात डोळ्यांत भरतो तो तिचा केशरी आणि मरून रंग. ही मोटारसुद्धा स्पध्रेसाठी मुंबईहून चालवत आणली होती.

विलीज जीप
d10इतर उंची मोटारींमध्ये थोडीशी वेगळी वाटणारी विलीज जीप पण या फेरीत बघायला मिळाली. पार्कर सादिक यांची ही ‘लेफ्ट हॅण्ड ड्राइव्ह’ची क्रीम रंगाची जीप दुसऱ्या महायुद्धात वापरली गेली होती. उघडता येणारे छत, चालकाच्या पुढची काचही उघडणारी, स्टीअरिंगला लागून चक्क‘रायफल सॉकेट’, जीपच्या मागच्या बाजूला जोडलेला पाणी भरण्याचा मोठा कॅन, आत चार जणांना बसता येईल अशी प्रशस्त जागा अशा किती तरी सोयी या ‘विलीज’मध्ये आहेत. जीपच्या पुढच्या बाजूला ‘ब्लॅकआऊट लाइट्स’ युद्धाची आठवण करून देणारा. सगळीकडे ब्लॅकआऊट असताना हे दिवे मोटारीच्या पुढचे अगदी जवळचे तेवढे दिसेल इतकाच प्रकाश देतात. ही जीप चार-पाच फूट पाण्यात सहज चालते. सादिक म्हणाले, ‘‘मला जुन्या मोटारींमध्ये वापरलेल्या तंत्राचे खूप आकर्षण आहे. जुनी मोटार म्हटले की देखभाल लागणारच, त्याला मर्यादाच नसते. पण मला या सगळ्यात खूप मजा वाटते.’’
सादिक यांच्याकडे असलेली छोटय़ा आकाराची ‘राइली वन पॉइंट वन’ देखील ते खूप उत्साहाने दाखवतात. ‘आताच्या मोटारींना ‘पुश बटन स्टार्ट’ची सोय असते. पण माझ्या राईलीलाही पुश बटन स्टार्ट आहे. म्हणजे आताचे तंत्र अगदी त्या वेळीही वापरात होते.’

ग्रीन रोल्स रॉइस
d11वेगवेगळ्या मालकांनी आणलेल्या रोल्स रॉइसच्या विविध मॉडेल्सचा संग्रहच इथे बघायला मिळाला. अमर अली जेठा यांची क्रीम आणि ऑलिव्ह ग्रीन रंगातली ‘रोल्स रॉइस पी-११’, योहान पूनावालांची १९३२ मधली लाल आणि काळी रोल्स रॉइस, या गाडय़ा डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्याच. मोटारीचा प्रत्येक भाग सुबक आणि उंची कसा असू शकतो याचं रोल्स रॉइस हे उत्तम उदाहरण. त्यातही मोटारीच्या पुढच्या बाजूस दिमाखात उभी राहिलेली ‘स्पिरिट ऑफ एक्स्टसी’ची चंदेरी बाहुली ही रोल्स रॉइसची ओळख.

मोरपंखी रोल्स रॉइस
१९२९ सालातली मोरपंखी रोल्स रॉइस दिमाखात उभी होती. चकचकीत रंगाच्या या आलिशान गाडीत मोटारीत चढायला रुंद पायरी, आत गुळगुळीत लाकडाची जुन्या ढंगाची सजावट, काळ्या चामडय़ाच्या शानदार सीट्स असा सगळा जामानिमा. मोटारीचे मालक फली धोंडी थेट मुंबईहून घेऊन आले होते तिला. ही मोटार माझ्याकडे १९९५ मध्ये आली. तेव्हा तिची अगदीच दुरवस्था झाली होती. तिला तिचे मूळ रूप प्राप्त करून देण्यासाठी पाच वष्रे काम करीत होतो, असे सांगताना धोंडी यांच्या चेहऱ्यावरील समाधान लपत नव्हते. पॅशन असेल ना, तर मोटारीची देखभाल नक्कीच जमते, अगदी सहज त्यांनी त्यांच्यातील कारवेड अधोरेखित केले.

लाल परी इम्पाला
d9तलेरा संग्रहातली लाल-पांढरी ‘शेव्हरोलेट इम्पाला’ (मॉडेल १९६४ चे) जुन्या िहदी चित्रपटांच्या नायकांची आठवण करून देत होती. ‘बी. यू. भंडारी’ कंपनीचे प्रवीण कपाडिया या मोटारीची देखभाल करतात. दोन रंगांमधली मोटार हल्ली बघायला मिळणे विरळाच, पण बहुतेक जुन्या मोटारींमध्ये रंगसंगतीची ही किमया दिसते. इम्पाला प्रसिद्ध आहे तिच्या लांबडय़ा आकारामुळे. पुढच्या बाजूचे चार मोठमोठे दिवे, आतली नाजूक सजावट, अगदी स्टीअिरगमध्येही साधलेली लाल-पांढरी संगती, लाल चामडी सीट्स तिचे देखणेपण वाढवत होत्या.

मॉरिस मायनर
d12लहान आकर्षक आकाराच्या ‘मॉरिस मायनर’ मोटारींनीही या रॉलीत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. सुभाष सणस यांच्या संग्रहातली पिवळ्या रंगाची ‘मॉरिस मायनर १०००’, पार्कर सादिक यांची बॉटल ग्रीन रंगाची मॉरिस मायनर (१९५१) या मोटारी बघण्यासारख्या. जुन्या मोटारी आणखी जुन्या होत राहतील, कदाचित त्यांना पुढे नवे मालकही मिळतील. पण जोपर्यंत या मोटारींबद्दलचे प्रेम आणि ‘पॅशन’ राहील तोपर्यंत त्यांचा दिमाख जराही उणावणार नाही.

रोव्हर
d13सोनेरी रंगाच्या शस्त्रसज्ज सनिकाच्या चिन्हानं सजलेली मरून रंगाची ‘रोव्हर’ (मॉडेल १९२३ चे) फली धोंडी यांच्या संग्रहात आहे. ‘आता अशा फक्त ३० रोव्हर्स आहेत जगात. त्यातल्याही फक्त आठच धावण्याच्या अवस्थेत आहेत,’ धोडी सांगतात. ‘ट्विन सििलडर एअर कूल्ड इंजिन’ हे या मोटारीचे वैशिष्टय़ आहे. हे इंजिन खरे तर मोटारसायकलसारखेच. जुन्या मोटारींमधल्याही फार कमी मोटारींना ‘एअर कूल्ड’ इंजिन असते. मरून रंग आणि त्यावर उठून दिसणारी सोनेरी रंगाची सजावट यामुळे ही मोटार शोभून दिसते.
संपदा सोवनी -sampada.sovani@expressindia.com