dr03मी १९६५ ते १९९० हा तब्बल अडीच दशकांचा काळ स्कूटर चालवत होतो. तीन स्कूटर्स चालवल्या. त्याही नवीनच. ते एक रोमँटिक ड्रायव्हिंग होते. मी माझ्या स्कूटर्सना सिली व्हेइकल म्हणायचो. कारण मी त्यावरू सातवेळा घसरलो. एकदा तर पत्नी गरोदर असताना तिला पाडलं, म्हणजे गाडी घसरून पडली, दैव बलवत्तर होते म्हणून काही झाले नाही. इतरवेळीही किरकोळ जखमांवर सुटका झाली. मात्र, गाडी पाडल्याशिवाय किंवा गाडीवरून पडल्याशिवाय पक्का ड्रायव्हर बनता येत नाही, हेच खरे. दुचाकीनंतर आस लागली होती चारचाकीची. चारचाकी गाडी घेऊन कुटुंबाला फिरायला नेण्याचे स्वप्न कधीपासून बाळगून होतो. मात्र, नव्या गाडीत आईला बसवून पहिली चक्कर मारायची खूप इच्छा होती. वयाच्या ५५व्या वर्षी ड्रायव्हिंग स्कूल जॉइन केले. यथास्थित गाडी चालवण्याचे प्रशिक्षण वगैरे घेऊन मी १९९० मध्ये नवीकोरी मारुती ८०० गाडी घेतली. ड्रायव्हिंग शिकल्यावर प्रॅक्टिस केली ती माझ्या गाडीवरच. सुरुवातीला खूप रॅश ड्रायव्हिंग करायचो. गाडी चालवताना दुसऱ्या गाडीला ठोकेल यापेक्षा आपल्याच गाडीला काही होईल, या भीतीने जरा अधिकच काळजी घ्यायचो गाडीची. तरीही गाडी भन्नाट गतीने चालवण्याची सवय काही मोडली नाही. हायवे, चढउतार, घाट, अरुंद रस्ते, रात्री, पावसात सर्व प्रकारांत मी सरावलो, गाडी चालवायला. सुरुवातीचे सहा महिने गाडी तुम्हाला नियंत्रित करते, आणि नंतर तुम्ही तिच्यावर राज्य करता. सुरुवातीला लहान लहान टप्पे आखून प्रवास केला. पाल्र्यात फिरलो, त्याानंतर दक्षिण मुंबई, सायन, चेंबूर, वाशी, मुलुंड, ठाणे, मालाड, बोरिवली असा टप्पा गाठला. नंतर वसई, अलिबाग, मुरुड, जंजिरा, रेवदंडा वगैरे ठिकाणी प्रवास केला. माझ्या रॅश ड्रायव्हिंगवर कुटुंबियांचे नियंत्रण असायचे. २०१२ पर्यंत म्हणजे २२ वर्षे मी विनाअपघात गाडी चालवली. नाही म्हणायला, पाल्र्यातच एका रिक्षावाल्याला टक्कर दिली पण ती किरकोळ होती. कालांतराने माझी लाडकी मारुती ८०० मी विकून टाकली. त्यानंतर मुलीने अल्टो घेतली. पण ती तिच्या मालकीची असल्याने जपून चालवली. २०१२ मध्ये मुलीने व्ॉगन आर घेतली. माझे ड्रायव्हिंग लायसन्स २०१४ पर्यंत वैध असल्याने मी ही गाडीही व्यवस्थित चालवू शकलो. वयाच्या ८०व्या वर्षीही मी व्यवस्थितरित्या गाडी चालवू शकतो, याचा सार्थ अभिमान वाटतो. मात्र, आता माझी आई आणि पत्नी या दोघीही हयात नाहीत, त्यामुळे खंत वाटते. पण माझा नातू ही सर्व कसर भरून काढतो. ड्रायव्हिंगचे पॅशन त्याच्यामुळे पुन्हा एकदा तरुण होते आणि मी स्टीअरिंग हातात घेतो..
– दत्तात्रय वर्दे, विलेपार्ले (मुंबई)