ड्रायिव्हगच्या आवडीमुळे कार चालवावी असे माझे स्वप्न होते. दोन वर्षांपूर्वी मुलाने सँट्रो कार घेतली. सुनेने आणि मी गाडी शिकावी म्हणून माझे पती आमच्या मागे लागले. ड्रायिव्हग स्कूल झाले. आमच्या इमारतीमध्ये छोटे वळणदार बोगदे आहेत. त्यातून गाडी बाहेर काढावी लागते. प्रथम गाडी बाहेर काढताना मला दहा मिनिटे लागली. त्यात तीन-चार वेळा बंदही पडली. तरी मला गड सर केल्यासारखे वाटले. चौकात गाडी बंद पडणे, मागे गाडय़ांची रांग, हॉर्नचे आवाज, लोकांच्या त्रासिक मुद्रा पाहून लक्षात आले, आपल्याला योग्य ट्रेनिंगची गरज आहे. सिद्धेश नलावडेसारखा आदर्श ट्रेनर मिळाला. पहिल्याच दिवशी तिसरा गीअर टाकायला सांगितला. मला आश्चर्य वाटले की मला तिसरा गीअर टाकता येतो, कारण तोपर्यंत दुसरा गीअर आणि डावीकडील वळण घेत गाडी पुन्हा घरी आणणे इथवरच मजल होती. हायवेचा हेअर पिन टर्न आणि त्यात पुलावरचा चढाव या वेळी खूप दमछाक व्हायची. गाडी तर बंदच पडायची आणि एक दिवस असा आला की गाडी बंद न पडता, रहदारी सांभाळत वळण पार केले त्या वेळी सिद्धार्थनी ‘परफेक्ट’ म्हटले. आता मी शहरात, हायवेला आत्मविश्वासाने गाडी चालवते. सिद्धार्थनी आव्हान म्हणून मला
ट्रेनिंग द्यायचे ठरवले. कारण आज माझे वय साठ वर्षांचे आहे. सकाळी मुलगा-सून यांच्या जेवणाचे डबे, घरातील इतर कामे करून सकाळी आठ वाजता ट्रेनिंगला जात असे. अशी तारेवरची कसरत करत डिसेंबर २०१४ मध्ये दोन वर्षांच्या नातीसोबत ट्रेनिंग पूर्ण केले. आश्चर्य वाटेल पण ड्रायिव्हग टेस्टच्या वेळी माझी नात माझ्यासोबत होती. अशी आहे माझ्या स्वप्नपूर्तीची कारकीर्द.
माधुरी घटवाई, मिरा रोड, मुंबई

 ड्रायिव्हिंग  शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले  ड्रायिव्हिंग  लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा.. मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा.
माहिती मेल करा.. ls.driveit@gmail.com