36ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले ड्रायिव्हग लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा.. मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा. माहिती मेल करा.. ls.driveit@gmail.com

उंटाची धडक
मी १८ वर्षांचा झाल्यावर वडिलांनी मला गाडी चालवण्याचे पद्धतशीर शिक्षण घेण्यास सांगितले. मी वडिलांची आज्ञा पाळून ड्रायिव्हग शिकलो आणि परवानाही मिळवला. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त होण्यापूर्वी वडिलांनी अ‍ॅम्बॅसिडर कार घेतली. तेव्हा प्रचंड क्रेझ होती या गाडीची. मात्र, ही गाडी बाबांनी कधीच चालवली नाही. ते मला गाडी चालवायला सांगून माझ्या शेजारी बसत व मला प्रोत्साहन देत. आम्ही खूप ठिकाणी प्रवास केला. स्वत:ची गाडी असली की खरंच खूप मजा येते. कुठेही थांबता येते, कोणाचे बंधन नाही की अटी नाहीत.
माझ्या आठवणीतले दोन प्रवास सांगावेसे वाटतात. १९८० मध्ये खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी म्हणून मी वडिलांना घेऊन रायचूरला गेलो. सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडले आणि आम्ही विजापूरमाग्रे सोलापूरला निघालो. नेमका गाडीचा डायनामो बिघडून दिवे बंद पडले. त्यामुळे मग मागून येणाऱ्या गाडीच्या दिव्याच्या उजेडात आम्ही निघालो. दुर्दैवाने मागच्या गाडीचाही डायनामो खराब होऊन दिवे गेले. रात्रीच्या किर्र अंधारात आम्ही मग समोरून येणाऱ्या गाडय़ांच्या दिव्याच्या प्रकाशात कसाबसा रस्ता कापून सोलापूरला पोहोचलो. डायनामोंची दुरुस्ती करून मग पुढच्या प्रवासाला लागलो.
दुसऱ्या एका प्रवासानंतर रात्री साडेआठच्या सुमारास नगरहून पुण्याकडे येत होतो. रस्त्यावर बरीच वर्दळ असल्याने हळूहळू, रस्त्याचा अंदाज घेत मी गाडी चालवत होतो. एका दुभाजकाजवळ आमची गाडी थांबली असता एक लहान मुलगा दोन उंटांना घेऊन रस्ता ओलांडू पाहात होता. त्याने उंटांना दुभाजकावर उभे राहून रस्ता ओलांडण्याचे आदेश दिले. पहिला आज्ञाधारक उंट दुभाजकावर चढला. मात्र, मागच्याला काही जमेना. त्याचा पाय सटकला आणि ते उंटाचे प्रचंड धूड माझ्या गाडीवर आदळले. त्याचे डोके गाडीच्या दरवाजावर आदळून नंतर पुढच्या काचेवर आपटले. गाडीच्या काचेचा चक्काचूर झाला. अगदी क्षणार्धात हे सर्व झाले. उंटाला लागले नाही, उंटाचा मालक चटकन दोन्ही उंटांना घेऊन पसार झाला. मला मात्र गाडीच्या दुरुस्तीचा भरुदड सोसावा लागला.