बऱ्याचशा माणसांचे स्वप्न असते की, आपल्याकडे गाडी असावी, गाडी स्वत:ला चालविता यावी इत्यादी. याला मीसुद्धा अपवाद नव्हतो; परंतु माझ्याबाबतीत नियतीचीपण हीच इच्छा असावी. त्यामुळेच बऱ्याच वर्षांपूर्वी काही वर्षांकरिता माझी आफ्रिकेमध्ये, झांबिया येथे कामानिमित्त बदली झाली. तेथे मिळणाऱ्या सुखसोयींमध्ये गाडी, बंगला इत्यादी गोष्टी होत्या व त्याकरिता स्वत:ला गाडी चालविता येणे गरजेचे होते. लगेचच मी ड्रायव्हिंग dr04स्कूलमध्ये नाव दाखल केले; परंतु त्याचा परवाना मिळण्यापलीकडे काहीही उपयोग झाला नाही. झांबिया येथे ऑफिसमध्ये मला ड्रायव्हिंग येते असे (बेधडकपणे) सांगून फक्त प्रॅक्टिस करावयाची आहे, असे सांगितले व बऱ्यापैकी ड्रायव्हिंग शिकून घेतले. हे चालविणे शिकताना शिकविणारा मांडीवर चापटय़ा मारून त्या-त्या पायाचा उपयोग अ‍ॅक्सिलेटर, गीअर इत्यादी बदलण्याकरिता कसा करावयाचा हे सांगत होता. तेव्हा अपमान झाल्यासारखे वाटायचे; परंतु इलाज नव्हता. गाडी ताब्यात आल्यानंतर सुरुवातीला माझा मित्र मला जाता-येताना सोबत करावयाचा व नंतर मी गाडी एकटा चालवायला लागलो. तो दिवस अजूनही स्मरतो व बाजूला असणाऱ्या माणसामुळे किती धीर येतो, याची जाणीव झाली. सुंदर, चांगली देखभाल केलेले रस्ते व त्यात गाडी चांगल्या कंडिशनमध्ये. मग काय स्पीड किती ठेवावयाचा हे आपणच ठरवावयाचे. मी १३० किमी/तास या स्पीडने गाडी चालवीत होतो, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू गाडी चांगली चालवीत आहेस, अशा प्रकारचे प्रोत्साहन मला मित्रांकडून मिळाले व माझा धीर चेपला. मला गाडी चालविताना मजा यायची व त्याची आवड निर्माण झाली. सुट्टीमध्ये माझी फॅमिली जेव्हा झांबिया येथे यावयाची त्या वेळी त्या सर्वाना घेऊन मी लाँग ड्राइव्हला जायचो. त्या वेळी मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटायचे व हा सर्वात आनंदाचा क्षण होता. जाता-येताना ऑफिसमधील स्टाफला कधी-मधी लिफ्ट देणे जरुरीचे होते. त्या वेळी आणखीनच धन्य झाल्यासारखे वाटायचे. असो. काही वर्षांकरिता अनुभवलेले हे सुख मला अजूनही भावत आहे. कारण गाडी व त्यासंबंधीच्या  सुखद आठवणी तेथेच ठेवून मी भारतात परतलो तो त्या सीटवर कधीही न बसण्यासाठी. येथे बऱ्याच गोष्टींमुळे गाडी चालवावी, हे मनातसुद्धा येत नाही.
– अनंत जोशी, मुंबई

माझा मुलगा माझा गुरु
dr03 आम्ही पहिली गाडी घेतली ती माझ्या वयाच्या ४७व्या वर्षी. मला गाडी चालविण्याची फार आवड होती. माझ्याआधी माझे पती मोटार स्कूलमध्ये जाऊन गाडी शिकले पण त्यांना चांगला अनुभव आला नाही, म्हणून मी माझ्या मुलाकडून गाडी शिकले. माझा मुलगा गुरू म्हणून फार कडक शिस्तीचा होता. गाडी शिकताना कोणतीही चूक झाली तर फार ओरडायचा, पण गाडी शिकण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे मी ते सर्व सहन केले. त्यामुळे चार-पाच दिवसांतच गाडी शिकले, पाचव्या दिवशी मी एकटी गाडी घेऊन बाहेर जाऊन आले. त्यानंतर दोन दिवसांनी दादरला गेले असताना लाल सिग्नल  माझ्या गाडीपुढे बस असल्याने मला दिसला नाही आणि मी गाडी तशीच पुढे नेली. लाल सिग्नल असताना गाडी पुढे नेल्याने पोलिसाने मला पकडले. मी घाबरलेले असतानाही पोलिसाला म्हटले, ‘दादा मला आता तुम्ही दंड केल्यास माझा उत्साह जाईल आणि गाडी चालवणे बंद होईल. मी पुन्हा असे होऊ देणार नाही.’ असे सांगितल्यावर त्याने मला यापुढे काळजी घ्या असे सांगून सोडले.  यानंतर एकदा मी सिग्नल लाल असल्यामुळे थांबले असताना माझ्या मागे असलेला बस ड्रायव्हर, मी तशीच गाडी पुढे न्यावी म्हणून सारखा हॉर्न देत होता. ते पाहून माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका गाडीच्या ड्रायव्हरने मला सांगितले की, महिला गाडी चालवीत असेल तर काही लोक असेच त्रास देतात. तुम्ही गाडी सिग्नल मिळाल्याशिवाय गाडी सुरू करू नका. असे अनेक अनुभव घेऊन मी शिकत गेले आणि आज माझे वय ७० असूनही मुंबई, पुणेसारख्या कोणत्याही शहरात गाडी चालवू शकते.
– चित्रा जोशी  मुंबई

ड्रायिव्हिंग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले ड्रायिव्हिंग लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा.. मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा.
माहिती मेल करा.. ls.driveit@gmail.com