एलपीजी किट बसवण्याच्या दोन प्रचलित पद्धती आहेत. एका प्रकारचे किट कंपनीकडून फिट करून नव्या वाहनामध्ये वाहनासोबतच मिळते, तर दुसऱ्या प्रकारचे किट जुन्या वाहनात अधिकृत वितरकाकडून बसवून yy03घ्यायचे असते. एलपीजी किट उत्पादन करणाऱ्या कंपनीने केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या टेिस्टग एजन्सीकडून किटला मान्यता मिळवणे गरजेचे असते.
सदर मान्यता मिळाल्यानंतर कंपनीने किट बसवणाऱ्या वितरकांना प्रशिक्षण देणे अपेक्षित असते. त्यानुसार सदर कंपनीने प्रशिक्षण दिल्यानंतर कंपनी आणि वितरक यांनी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे सदर वितरकाच्या केंद्राला मान्यतेसाठी अर्ज करायचा असतो.
या वितरकाकडील फिटिंग करणाऱ्या कारागिरांना उत्पादक कंपनीने प्रशिक्षण दिलेले असल्याचा पुरावा सादर करावयाचा असतो. सदर अर्ज प्राप्त झाल्यावर परिवहन आयुक्त कार्यालय सदर वितरकाचे केंद्र ज्या आरटीओ कार्यालयाच्या हद्दीत असते त्या कार्यालयाकडून त्याने सादर केलेल्या माहितीच्या खरेपणाबद्दल अहवाल मागवते.
सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालय सदर वितरकास रेट्रो फिटर म्हणून काम करण्यास परवानगी देतात.
सदर रेट्रो फिटर जुन्या वाहनावर एलपीजी किट बसवण्याचे काम करतात. म्हणजे एखाद्या गॅरेजमध्ये जर आपण एलपीजी किट बसवण्यासाठी जाता तर त्याच्याकडे त्या किटच्या कंपनीच्या परवानगीशिवाय परिवहन आयुक्त कार्यालयाची लेखी परवानगी असणे गरजेचे आहे. तसेच सदर वितरकास त्याचे वर्कशॉप ज्या परिवहन कार्यालयाच्या कार्यकक्षेत आहे त्या कार्यालयाकडून ट्रेड सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे.