टाटा मोटर्सची बोल्ट ही हॅचबॅक श्रेणीतील कार सध्या विक्रीबाबतही वेगात धावत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एकूणच विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागलेल्या टाटा मोटर्सला बोल्ट काहीशी सावरताना दिसत आहे. या श्रेणीत ती मारुती सुझुकी, ह्य़ुंदाई तसेच नव्या दमाच्या शेव्‍‌र्हले, निस्सानलाही बोल्टची स्पर्धा आहे.
होरायझनेक्स्ट मोहिमेंतर्गत बोल्टसह झेस्ट (सेदान श्रेणी) व नॅनो (जेनेक्स्ट) ही तयार करण्यात आली. मात्र तरुण वर्गाला समोर ठेवून बोल्टमध्ये माहिती तंत्रज्ञानावरील अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सुविधांबाबत बोल्ट अधिक बोल्ड आहे. मात्र तिच्या बाह्य़ रूपाबाबत टाटा अद्यापही इंडिकाला विसरली नाही, असे प्रकर्षांने जाणवते.
टाटा मोटर्सच्या बोल्टचा नवा अधिक अद्ययावत अवतारही येईलच. मात्र तूर्त ती मारुतीच्या स्विफ्ट व ह्य़ुंदाईच्या ग्रॅण्डला किती मागे टाकते ते पाहावे लागेल. स्पर्धेच्या या गटातील कारच्या किमती ४.८० लाख रुपयांच्या घरात असताना बोल्ट अद्ययावत सुविधांसह ४.६५ लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरुम, मुंबई) आहे. ११९३ सीसी इंजिन क्षमतेची, ४ सिलिंडरच्या बोल्टचे वजन ११२५ किलो ग्रॅम आहे. १८ किलोमीटर प्रति लिटर इंधन क्षमता बोल्टद्वारे साधली जाते. ती स्पर्धकांपेक्षा फार मागे अथवा पुढेही नाही. डिझेलवरील बोल्ट प्रति लिटर २२.९५ किलोमीटपर्यंत धावू शकते.
तीन वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने होरायझनेक्स्ट मोहिमेंतर्गत बोल्ट सादर केली. या मोहिमेंतर्गत तिच्या अन्य श्रेणीतील नॅनो व झेस्टही दाखल झाल्या. मात्र बोल्टमध्ये सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने अधिक भर देण्यात आला आहे. तरुण वर्गाला आकर्षित करण्यात ती अधिक यशस्वीही होईल. मात्र तिचे बाह्य़ रूप अधिक स्पोर्टी केले असते तर तिचा विक्री वेग एव्हाना अपेक्षेपेक्षा अधिक वाढला असता.

अद्ययावत सुविधांवर भर
आपण ज्या घरात राहतो ते प्रसन्न वाटण्यासाठी घरातील वस्तू, फर्निचर चांगले व नीटनेटके मांडायला हवे. तसेच बोल्टबाबतही आहे. या कारमधील अंतर्गत रचना ही प्रामुख्याने तरुण वर्गाला समोर ठेवून केली गेली आहे. बोल्टच्या अंतर्गत रचनेसाठी टाटा मोटर्सच्या प्रवासी कार व्यवसाय विभागाच्या कार्यक्रम नियोजन व प्रकल्प व्यवस्थापनाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश वाघ यांचे नॅनोनिर्मिती कालावधीतील मार्गदर्शन उपयोगी आले आहे. जर्मनी, ब्रिटनच्या कंपन्यांच्या सहकार्याने बोल्टमध्ये टच स्क्रीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आवाजाद्वारे सूचना करून कारमधील एसी, एफ रेडिओ यातील बदल करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान बोल्टमधील वैशिष्टय़पूर्ण म्हणावे लागेल.
संगीत ऐकण्यासाठी कारमध्ये आयपॉड, यूएसबी, एसडी कार्ड तसेच ब्लूटूथची जोड (केवळ अ‍ॅण्ड्रॉइड) मोबाइलला देण्याची सुविधा आहे. टच स्क्रीनच्याच साहाय्याने कारच्या चारही बाजूचे स्पीकर स्वतंत्ररीत्या चालू अथवा बंद करता येतात. स्टेअरिंगसह समोरचा आतील भाग पूर्णत: काळ्या या एकाच रंगात उपलब्ध असला तरी त्याची रचना, मांडणी ही अधिक आकर्षित झाली आहे.
रस्त्यावर धावताना वेगवेगळा ‘फिल’ देणारे तिहेरी अनुभव या एकाच कारमध्ये भारतीय प्रवासी कारमध्ये प्रथमच देऊ केला आहे. शहरातील गर्दीच्या वाहतुकीसाठी (सिटी) तसेच मोकळ्या रस्त्यावर बिनधास्त वेग पकडण्यासाठी (स्पोर्ट) व इंधन क्षमतेसाठी (इको) असे वेगवेगळे पर्याय केवळ एका पुश बटनावर या एकाच कारमध्ये आहेत. बसण्याची जागाही सुटसुटीत व आरामदायी करण्यासाठी आसन रचनेवर विशेष भर दिल्याचे जाणवते. ड्रायव्हर व बाजूच्यासह मागचे सलग सीटही ‘रग्बी’चा अनुभव देणारे आहेत. रग्बी खेळणाऱ्यांचे खांदे जसे ‘ब्रॉड’ असतात तशा सीट पाठीसाठी दिल्या आहेत. चालकाच्या उंचीनुरूप सीट हवी तशी करण्याची यातील रचना अधिक सोयीची आहे.

रिव्होट्रॉन १.२ लिटर इंजिन
पेट्रोल प्रकारातील इंजिन यात उपलब्ध आहे. टाटा मोटर्सने स्वत: विकसित केलेले रिव्होट्रॉन १.२ लिटर इंजिन यात बसविण्यात आले आहे. ते ८९ बीएचपी आणि १४० एनएम जातीचे आहे. त्याचा टबरे स्पूल हा १८०० ते २००० आरपीएम आहे. कंपनी लवकरच बोल्टमध्ये १.३ लिटर मल्टिजेट इंजिनही आणणार आहे. डिझेलवरील बोल्ट ५.७५ लाख रुपयांपुढे उपलब्ध आहे. चेचिस तसेच सस्पेन्शनसाठीच्या यंत्रणा अधिक विकसित केल्याने चालविताना बोल्ट अधिक स्मूथ वाटते. अचानक ब्रेक दाबल्यासह ती लगेचच स्थिर होते. अन्यथा अन्य कार ब्रेक दाबल्यानंतर जागेवर थांबतात, मात्र वरच्या बाजूने त्या अधिक हालतात. बोल्टचे पॉवर स्टेअरिंग वळवून झाल्यानंतर आपोआप पुन्हा सरळ होते.

रूपात फार फरक नाही
बोल्टचा बाह्य़ भाग हा काहीसा स्पोर्टी सादर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यासाठी रुफ व बॅक साइडमध्येही आकर्षकता आणली गेली आहे. मात्र चार-पाच फुटावरून तिला पाहिले की इंडिकाची आठवण काही जात नाही. इंडिकाचा आकार हा टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांसाठी ‘यूनिकनेस’ म्हणायचा. ९०च्या दशकात टाटा मोटर्स याच वाहनाद्वारे प्रवासी वाहननिर्मिती क्षेत्रात उतरली. तिला प्रतिसादही मिळाला. मात्र गेल्या काही वर्षांमधील इंडिकाला लागलेले ‘टॅक्सी’ बिरुद पुसण्यासाठी बोल्ट खूप यशस्वी ठरेल याबाबत शंकाच आहे. पण म्हणतात ना, अनेकदा जवळ गेल्याशिवाय कळत नाही, तसे दुरून बोल्ट ही इंडिकाची ‘मॉडिफाइड’ आवृत्ती असली तरी त्यातील अंतर्गत रचना व सुविधा या नव्या दमाच्या कारनाही लाजवेल अशाच आहेत. बोल्टचा समोरचा काहीसा भाग टाटा मोटर्सच्याच झेस्टप्रमाणे आहे. इंडिकाच्या तुलनेत तो अधिक रूपवान केला आहे. सिग्नेचर ग्रिल आणि पिआनो ब्लॅक सराऊण्डची जोड त्याला आहे. बोल्टची उंची थोडी अधिक असल्याने तिचा ग्राऊंड क्लिअरन्सही वाढला आहे. बोल्टच्या हेड व टेल लॅम्पचे डिझाइन मात्र इंडिकाच्या दिव्यांपासून खूपच वेगळे व अधिक स्टायलिस्ट आहेत.

* इंजिन :
१.२ लिटर टबरेचार्ज एमपीएफआय
* ट्रान्समिशन :
५ स्पीड मॅन्युअल
* पॉवर :
८८.८ बीएचपी, ५००० आरपीएम
* आकार :
*८२५-१६९५-१५६२
* सीसी : ११९३
* आकार :
*८२५-१६९५-१५६२
* किंमत :
४.६५ लाख रुपये
(एक्स-शोरुम, मुंबई)
वीरेंद्र तळेगावकर -veerendra.talegaonkar@ expressindia.com