‘आशुतोष’ ऊर्फ ‘आशु’ असे नाव घेतले की समस्त मराठी तरुणाईला सध्या एकाच आशुचा चेहरा डोळ्यासमोर येतो. अल्पावधीत तरुणाईचा टीव्हीवरील आवडता कलावंत बनलेला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील आशुची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता पुष्कराज चिरपुटकर याच्या वाहनविषयक आवडीबाबत..
चार चाकी वाहन चालविण्याची आवड असणे आणि ‘कार पॅशन’ असणे या माझ्या मते वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या अर्थाने ‘कार पॅशन’वाला मी नक्कीच नाही. पण आपल्या आयुष्यात असलेल्या अनेक वस्तू, वास्तू यांच्याशी आपले एक नाते जुळून जाते. आपली पहिली स्कूटर, पहिल्यावहिल्या पगारातून खरेदी केलेल्या वैशिष्टय़पूर्ण वस्तू किंवा या प्रकारच्या गोष्टींशी आपले नाते बनून जाते. पुण्यात नाटक आणि शॉर्टफिल्म्स करणारा आमचा एक ग्रुप होता. पुण्यात बराच काळ वास्तव्य असताना मला माझ्या बाबांनी चंदेरी रंगाची नॅनो भेट दिली होती. तीच माझी पहिलीवहिली गाडी म्हणता येईल. या चंदेरी नॅनोसोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एक लाखाची कार अशी नॅनोची जाहिरात करण्यात आली होती, प्रत्यक्षात मात्र ही किंमत दोन-सव्वादोन लाखांच्या घरात गेली. अर्थात माझ्याकडील नॅनो ही पॉवर विंडोज वगैरे काही अधिक सुविधा असलेली होती. परंतु नॅनोचा आकार आणि केलेली जाहिरात यामुळे बरेच लोक चिडवायचे. परंतु गाडी वापरायला सुरुवात केल्यानंतर या गाडीचे फायदे खूप आहेत हे समजले. आमच्या ग्रुपमधील प्रत्येकाच्या घरी कुणाला गरज लागली की आम्ही गाडी घेऊन हजर व्हायचो. भरपूर सामान गाडीत ठेवून चार-पाच जण बसून आम्ही नॅनो भरपूर पिदडवली असेच म्हणावे लागेल. कुणाच्या घरी नातेवाईक आले असले नि त्यांना सामानासह स्टेशनवर सोडायला जायचे असेल तर लगेच नॅनो घेऊन जाणे, आमच्या ग्रुपमधील कुणा मित्राला घर बदलायचे तेव्हा सामानाची ने-आण करणे, मित्रांबरोबर पुण्याच्या आसपास भटकणे यामुळे या गाडीशी माझे सूर जुळले, एक नाते जुळले, असेच म्हणावे लागेल. आता मुंबईत आल्यानंतर ती गाडी पुण्यातच ठेवली आहे. परंतु पुन्हा नवीन गाडी घेण्याचा विचार करताना पहिली पसंती नॅनो गाडीलाच आहे. छोटी गाडी म्हणून चालवायला ही गाडी उत्तम आहे. आलिशान गाडी, स्टाइल, स्टेटस सिम्बॉल वगैरे या दृष्टीने मी चारचाकी गाडीकडे पाहत नाही. चार चाकी गाडी ही एक सोय आहे इतकेच म्हणावेसे वाटते. नॅनो गाडीशी माझे नाते जुळले असे मात्र आवर्जून नमूद करावेसे वाटते.
 शब्दांकन – सुनील नांदगावकर