सध्या गाजत असलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील ‘मीनल’ अर्थात अभिनेत्री स्वानंदी टिकेकर या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आली असली तरी ‘गोष्ट एका काळाची’, ‘प्राइस टॅग’ अशा प्रायोगिक नाटकांतून तसेच पुण्यात शिकत असताना आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामधून स्वानंदीने अभिनय केला आहे. त्याशिवाय कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही तिने केले आहे. ‘मास्टर्स इन लॉ’ केल्यानंतर स्वानंदी टिकेकरने वकील म्हणून प्रॅक्टिसही केली आहे.

पुण्यात शिकत असल्यामुळे बाइकिंगची उपजत आवड होतीच. सुरुवातीला होंडा अॅक्टिवा कॉलेजमध्ये असताना खूप फिरवली आहे. त्या दरम्यान बाबांनी नवीन रॉयल एनफिल्ड बुलेट घेतली होती. ती थंडरबॉल बुलेट मी भरपूर चालवली आहे. बुलेट चालविणे म्हणजे ओव्हरटेक, कॉर्निरग न करता बुलेटच्या लयीचा, फायिरगचा आनंद घेत धीराने आणि नेटाने चालविण्याचा आनंद काय वर्णावा? बुलेट चालविण्याची शान, ऐट काही औरच. त्याला तोड नाही. अर्थात दुचाकीबरोबरच अगदी वयाची १८ वर्षे पूर्ण केली तेव्हापासून माझे ‘कार पॅशन’ सुरू झाले, असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकून वाहन परवाना मिळविल्यावर लगेचच झेन खूप चालवली. त्याच वेळी बाबांनी नवीन स्कोडा ऑक्टाव्हिया घेतली होती. झेन ही स्मॉल कार सेगमेंटमधील असल्याने ऑक्टाव्हिया चालविण्याची किंचित धास्ती वाटत होती, परंतु ड्रायव्हिंग शिकल्यानंतर कोणतीही गाडी चालविता आलीच पाहिजे असे बाबांनी सांगितले आणि ऑक्टाव्हिया चालवायला सांगितली. त्यामुळे ड्रायव्हिंग करण्याचा आत्मविश्वास निश्चितच वाढला. दरम्यानच्या काळात खूप गाडय़ा मी चालविल्या. आमच्याकडे सेदान, हॅचबॅक अशा निरनिराळ्या प्रकारच्या गाडय़ा होत्या. त्या त्या वेळी त्या सगळ्या गाडय़ा मी हौसेने चालविल्या. एवढेच काय एक्सयूव्ही ५०० ही भलीमोठी गाडीसुद्धा मी खूप चालवली. लाँग ड्राइव्हलाही अगदी पार विजापूपर्यंत मी अनेक गाडय़ा चालविल्या आहेत. एकदा ऑडी ए सिक्स ही गाडी घेऊन नाशिकहून येत होते. अन्य गाडय़ांपेक्षा या गाडीचे तंत्रज्ञान निराळे आहे. नाशिक-मुंबई प्रवासात गाडी पंक्चर झाली. तेव्हा ड्रायव्हर एकदम घाबरून गेला होता. परंतु, ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडीविषयक बरेच ज्ञान आत्मसात केले असल्यामुळे नवीन ऑडी ए सिक्स गाडी असतानाही मी संपूर्ण ‘मॅन्युअल’ वाचून पंक्चर झालेला टायर कसा बदलायचा ते समजावून घेऊन टायर बदलला. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मला गाडीचे बोनेट उघडून त्यात असलेली यंत्रणा दाखवून समजावून देण्यात आली होती. त्याचबरोबर टायर पंक्चर झाल्यावर काय करायचे असते, जॅक कसा लावायचा असतो हे सगळे इत्थंभूत शिकविले होते. त्यामुळे एकटय़ाने गाडी चालविताना असे काही झाले तरी मी परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकते. आणखी एक किस्सा सांगण्यासारखा आहे. आईसोबत एकदा मी अलिबागला निघाले होते आणि मीच ड्रायव्हिंग करीत होते. आम्ही दोघीच होतो आणि सिंगल लेनचा प्रचंड खड्डय़ांनी भरलेला रस्ता होता. अवजड वाहनांची प्रचंड रहदारी होती. अलिबागला पोहोचायला तब्बल पाच तास लागले. यातून गाडी सुरक्षितरीत्या चालविणे हे खरोखरीच कसब होते. त्या अनुभवानंतर आता कोणतीही गाडी आणि कसाही रस्ता असला तरी गाडी सुरक्षितरीत्या ईप्सितस्थळी नेण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. केवळ गाडी चालविणे हे उत्तम ड्रायव्हिंग नव्हे. तर गाडी स्टार्ट केल्यावर येणारा आवाज, कुठे काही निराळा आवाज आला तरी ते उत्तम ड्रायव्हरला समजते. त्यासाठी गाडीच्या तंत्रज्ञानाची उत्तम जाण, गाडी बंद पडल्यावर करावयाच्या उपाययोजना यांचे जुजबी ज्ञान हवे. माझ्यासारख्या ‘कार पॅशनेट’ व्यक्तीला ते आहे. म्हणूनच गाडी चालविण्याची मजा, ‘थ्रिल’ अनुभवायला मला आवडते. नुकतीच मी ‘आय टेन ग्रॅण्ड’ ही वाइन रेड रंगाची गाडी बुक केली असून गुरू पौर्णिमेच्या दिवशी ही नवीन गाडी मी घेणार आहे आणि मनसोक्त चालविणार आहे. मुंबईत शूटिंगसाठी जाता-येताना आय टेन ग्रॅण्डसारखी छोटय़ा आकाराची गाडी घेणे हे सोयीस्कर म्हणूनच ही गाडी घेतली आहे.
शब्दांकन – सुनील नांदगावकर