ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची.  मेल करा. ls.driveit@gmail.com

२०११ मध्ये नवऱ्याने माझ्यासाठी पहिली मारुती सुझुकी अल्टो  ही कार बुक केली. साधारण २०/२५ दिवसांत आमच्याकडे कार येणार म्हणून मी मोटार ड्रायिव्हग स्कूलला जाऊ लागले. २० दिवसांच्या ट्रेिनगमध्ये आपण कार चालवायला शिकू, असे वाटले. त्याच दरम्यान ठरलेल्या शुभ मुहूर्तावर शोरूममधील ड्रायव्हर कार घेऊन आला. वाहन म्हटले की लक्ष्मी आपल्या घरी आली. म्हणून प्रथम कारचे औक्षण, पूजा ही नारळ फोडून झाल्यावर कार प्रथम देवळात घेऊन जावे असे ठरले, परंतु नवीन कोरी कार चालवायची हिम्मत झाली नाही. शोरूममधील ड्रायव्हरलाच देवळात घेऊन गेलो. त्या वेळी शोरूममधील ड्रायव्हरनेच सल्ला दिला की, तुम्ही तुमच्या कारसोबत सराव करा. कारण ट्रेिनग स्कूलमध्ये स्टेअिरग आपल्या हातात असते. व बाकीचे क्लच, एक्सिलेटर, ब्रेक हे त्याच्याही पायाजवळ असल्यामुळे आपण तेवढे कार चालवण्यास तरबेज होत नाही. स्वत:च्या कारवर प्रॅक्टिस कराल तर तुम्ही लवकर शिकाल. त्याप्रमाणे मी ड्रायव्हरला तासाचे पसे ठरवून सकाळी प्रॅक्टिस करू लागले. ड्रायव्हरबरोबर असताना मी कार छान चालवायचे परंतु एकटी कार कशी चालवू, असा प्रश्न उभा होता. त्या वेळेस माझी मोठी मुलगी जी आता १८ वर्षांची आहे, तिने मला धीर दिला व सांगितले की, मी तुझ्यासोबत असेन, आपण सोसायटीत थोडी थोडी पॅ्रक्टिस करू. असे करता करता दररोज सोसायटीतून कार बाहेर काढून रस्त्यावर एक फेरफटका मारत असे. अशा प्रकारे कार शिकले. एक-दोनदा कार खरचटली. फार दु:ख झाल़े  जणू काही माझ्या शरीरालाच खरचटले असे वाटायचे. कार शिकताना फ्लायओवर म्हणजे खूप उंच घसरगुंडी आहे असे वाटत असे. त्यावर आपली कार उंच उंच आपण नेतो व पुन्हा त्या उंच घसरगुंडीवरून जोरात कार खाली घेऊन येतो की काय, असे मनात येऊन भीती वाटायची, परंतु फ्लायओवरवरून कार चालवताना फ्लायओवर कधी सुरू झाला व कधी संपला हेच कळायचे नाही. आता मी सफाईदारपणे कार चालवते. मे २०१४ ला अल्टो विकून हुंदाईची आय १० नवीन कार घेतली़ आता मला सर्व प्रकारच्या कार चालवायची इच्छा आहे. आज कित्येक स्त्रिया रेल्वे, विमान तसेच स्वयंरोजगारासाठी रिक्षा, शाळेतील मुलांच्या मेटाडोरसारख्या मोठय़ा गाडय़ा जबाबदारीने चालवतात तेव्हा त्यांचा अभिमान वाटतो व आपण कार चालवतो याचे काही विशेष वाटत नाही. कार घेतल्यावर असे स्टिकर लावत होते आता त्याच्या जागी मी ‘वकील’ असल्याचे स्टिकर लावल्यामुळे माझी कार मला सेलेब्रिटी आहे असे वाटते..

-अ‍ॅड. संध्या दिलीप वायंगणकर, ठाणे</strong>