dr04’माझे बजेट चार ते पाच लाख रुपये आहे. मला सीएनजी किंवा डिझेल कार सुचवा. माझा रोजचा प्रवास ८० किमीचा आहे.
– सुशील कदम
’एवढय़ा कमी किमतीत सीएनजी कार येईल. मारुती व्ॉगन आर सीएनजी किंवा सेलेरिओ सीएनजी या गाडय़ा उत्तम आहेत. पण डिझेल गाडी हवी असेल तर सेलेरिओ एलडीआय हीच गाडी घ्यावी. तिचे मायलेज २५ किमी प्रतिलिटर एवढे आहे. ही एक उत्तम ताकदीची गाडी आहे.
’ह्य़ुंडाई व्हेर्ना की होंडा सिटी या दोन्हींपैकी कोणती गाडी घ्यावी यासंदर्भात माझी द्विधा मनस्थिती आहे. माझा रोजचा प्रवास २० किमीचा आहे. पेट्रोल गाडी घेऊ की डिझेल, सुचवा.
– प्रवीण साने, पुणे
’तुम्ही पेट्रोल कारच घ्यावी. मी तर तुम्हाला होंडा सिटी गाडी घेण्यास सुचवेल. ही गाडी मायलेजला चांगली आहे आणि तिचे इंजिनही प्रचंड ताकदीचे आहे. तुम्हाला अधिक मायलेज असणारी कार हवी असेल तर मी तुम्हाला मारुती सिआझ गाडी घेण्यास सांगेल. सिआझचा मायलेज १७ किमी प्रतिलिटर एवढा आहे आणि ही गाडी आतून प्रशस्तही आहे.
’माझे बजेट दहा लाख रुपये आहे. मला डिझेलवर चालणारी एसयूव्ही घ्यायची इच्छा आहे. कृपया सांगा.
– सच्चिदानंद धारगळकर
’तुमच्या बजेटमध्ये फोर्ड इकोस्पोर्ट हीच गाडी येऊ शकेल. थोडे बजेट वाढवले तर रेनॉ लॉजी ही गाडी तुम्ही घेऊ शकाल.
’माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. माझ्या कुटुंबात आम्ही पाच जण आहोत. माझा रोजचा प्रवास काही फारसा नाही. मागच्या बाजूला तीन लोक आरामात बसू शकतील अशी गाडी मला घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– सुभाष देवळेकर
’उत्तम कार आणि मागील बाजूस बसण्यासाठी प्रशस्त जागा असलेली गाडी म्हणजे इटिऑस लिव्हा. तुम्हाला ती पेट्रोल व्हर्जनमध्ये सहा लाख रुपयांत मिळू शकते. दुसरा पर्यात टाटा बोल्टचा आहे. या गाडीची उंची चांगली आहे आणि आतील स्पेसही प्रशस्त आहे. मात्र, तिचा मायलेज फक्त १२ किमी आहे. तुम्ही योग्य निर्णय घ्या.
’माझे बजेट साडेसात ते साडेआठ लाख रुपये आहे. महिन्यातून १५-२० दिवस मी फिरस्तीवरच असतो. प्रतिदिन माझे फिरणे सरासरी १२० ते १५० किमीचे असते. मला चांगला मायलेज देणारी आणि कमी मेन्टेनन्स असलेली गाडी घ्यायची आहे. होंडा जॅझ अलीकडेच लाँच झाली आहे. तिचे भविष्य काय आहे.
– पंकज देशमुख, नागपूर
’होंडा जॅझ ही एक चांगली गाडी आहे. स्पेशिअस आहे. गुणवत्ता आणि रिसेल व्हॅल्यू यासंदर्भातही जॅझ उत्तम आहे. तिला १.५ आयडीटेक इंजिन आहे. जे मोबिलिओ, अमेझ व सिटी या गाडय़ांत आहे. उत्तम गाडी आहे, बिनधास्त घ्या.
’मी गेल्या दहा वर्षांपासून अल्टो कार वापरतो आहे. मी फक्त सुटीच्या दिवशीच गाडी वापरतो. माझे साप्ताहिक ड्रायव्हिंग ६० ते १०० किमीचे आहे. मला आता नवीन गाडी घ्यायची आहे. मात्र, सेडान घ्यावी की एसयूव्ही याबाबत संभ्रम आहे. तुम्ही सांगा कोणती गाडी घ्यावी.
– महेश मेहता, पुणे
’डिझेल मॉडेलच्या बाबतीत काहीच अडचण नाही. तुम्हाला डिझेल गाडीसाठी दोन लाख रुपये जास्त गुंतवावे लागतील. ह्य़ुंडाई क्रेटा ही चांगली गाडी आहे. ती तुम्ही ऑटो मोडमधील टॉप मॉडेल घ्या. तुम्हाला मारुतीची गाडी घ्यायची असेल तर सिआझ ही गाडी घ्या. या दोन्ही गाडय़ा पेट्रोलमध्येही उपलब्ध आहेत.
’मला माझ्या वडिलांसाठी सेडान कार घ्यायची आहे. त्यांच्या गुडघ्यांवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांना आराम वाटेल, अशीच गाडी घ्यायची आहे. होंडा अमेझ, मारुती डिझायर, टाटा झेस्ट किंवा फोर्ड फिगो अस्पायर यांपैकी कोणती गाडी घ्यावी याबाबत संभ्रम आहे. बजेट आठ लाखांपर्यंत आहे. मार्गदर्शन करा.
– श्रीकांत साबळे
’तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार घ्यायचा सल्ला मी देईल. त्यातल्या त्यात तुम्हाला डिझायर ही गाडी परवडू शकेल. तिची ऑनरोड किंमत साडेसात लाख रुपये आहे. सर्वोत्तम इंधनस्नेही गाडी आहे.