मला ड्रायव्हिंगची प्रचंड हौस आहे. म्हणूनच मी गाडीवर ड्रायव्हर ठेवलेला नाही, मी स्वत:च चालवितो. नाटक-मराठी मालिका यातून कामे केली असली तरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका २००८ साली सुरू झाल्यानंतर २००९मध्येच मी पहिल्यांदा गाडी घेतली. माझी पहिली गाडी चंदेरी रंगाची ह्युंदाई अ‍ॅसेण्टची व्हिवा मॉडेलची गाडी होती. मला नेहमीच मोठी गाडी घ्यायची होती. कुटुंबाला घेऊन फिरण्यासाठी मोठीच गाडी हवी असे पहिल्यापासूनच मनात होते. ह्युंदाई अ‍ॅसेण्ट व्हिवाची निवड करण्याचे कारण म्हणजे ही सेडान कार आहे. मॅन्युअली चालविता येणारी गाडी होती. ऑटोमोबाइल इंजिनीअर असलेल्या मित्राचा सल्ला मानून सुरुवातीला हात साफ करण्यासाठी एखादी गाडी वापरावी असे त्याने सांगितले. म्हणून तेव्हाच्या बजेटनुसार ह्युंदाई अ‍ॅसेण्ट व्हिवा ही गाडी मी चार-साडेचार लाखांत घेतली. तेव्हाचे ते मॉडेल तीन-साडेतीन वर्षे जुने होते. परंतु २०११ मध्ये ही गाडी विकूनही मला चांगली किंमत मिळाली हे विशेषत्वाने नमूद करायला हवे. ही गाडी विकून मी फोक्सव्ॉगन वेंटो ही ऑटोमेटिक गाडी घेतली आणि सध्या तीच वापरतोय. शुभ्रधवल रंगाची ही गाडी म्हणजे जर्मन तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना म्हणायला हरकत नाही. सुरुवातीपासूनच पेट्रोलवर चालणाऱ्या गाडय़ा वापरणेच मला आवडते. त्यामुळे व्हेंटो हीसुद्धा पेट्रोलवर चालणारीच गाडी घेतली. मुंबईतल्या प्रचंड रहदारीमध्ये ऑटोमेटिक गाडी चालविणे हेच आरामदायी आहे. म्हणूनच ऑटोमॅटिक गाडी घेतली. सर्वसामान्यपणे एका ठिकाणी बसून आठ-दहा तास काम करण्यापेक्षा आमच्या क्षेत्रात आम्ही कलावंत सेटवर बरीच धावपळ करीत असतो. त्यामुळे दमायला होते. अशा वेळी शूटिंग संपल्यानंतर प्रत्येक मिनिटाला क्लच दाबणे, ब्रेक दाबणे यापेक्षा ऑटोमेटिक गाडीची मजा न्यारीच असते. एकदा डी मोडवर म्हणजे ड्राइव्ह मोडवर गाडी टाकली की फक्त अ‍ॅक्सिलरेटर, ब्रेक दाबणे एवढेच काम उरते. त्यामुळे प्रवास सुखदायी, आरामदायी करता येतो. वर्षांतून एकदाच देखभाल खर्च आणि सव्‍‌र्हिसिंग करणे हा या गाडीचा आणखी एक फायदा आहे. माझे स्वप्न विचाराल तर नि:संशयपणे बीएमडब्ल्यू हे एकच उत्तर मी देईन. बीएमडब्ल्यूचे विशिष्ट मॉडेल वगैरे असे सांगता येणार नाही. कारण या नावातच सारे काही आहे असे मला वाटते.
मंदार चांदवडकर
शब्दांकन – सुनील नांदगावकर

तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील माधव भिडे ही भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर गेल्या सहा-सात वर्षांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. हिंदी मालिकांमध्ये गाजत असला तरी मराठमोळ्या मंदारच्या कारकीर्दीची सुरुवात ‘ऑल दी बेस्ट’ या नाटकापासून झाली आहे. दोन चमूंमध्ये हे नाटक सुरू होते तेव्हा त्यात आंधळ्याची भूमिका मंदारने केली होती. मूळचा मेकॅनिकल इंजिनीअर असलेला मंदार दुबईत काही वर्षे नोकरी करून आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी मुंबईत परतला. नाटकानंतर मराठीत छोटय़ा पडद्यावर गाजलेल्या ‘वादळवाट’ या मालिकेत निर्भीड वर्तमानपत्रातील संदेश ही वृत्तपत्र छायाचित्रकाराची भूमिका त्याने साकारली होती. ‘तारक मेहता..’ मालिकेला प्रेक्षकांचे आशीर्वाद लाभले आहेत, असेही मंदार चांदवडकरने आवर्जून नमूद केले.