जुन्या धाटणीच्या गाडय़ा आताशा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दुचाकी स्कूटर्स असतील किंवा येझदी, व्हेस्पा, लॅमरेटा इत्यादी उत्पादकांच्या दुचाकी असतील, नवीन मोटरसायकल्सनी, विशेषत स्पोर्टस् बाइक्सनी, या सर्व दुचाक्यांना नामशेष करून टाकले आहे. मात्र, आजही अनेकांचा ‘जुनं ते सोनं’ या म्हणीवर विश्वास आहे. त्यामुळेच जुन्या गाडय़ांचे जतन करणे आणि त्यांना आधुनिक रुप देण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. चारचाकींबाबत तेच दुचाकींबाबतही आहे. त्यामुळेच यामाहावर प्रेम करणारे अनेकजणांनी आजही त्यांच्या जुन्या यामाहा बाइक्स जतन करून ठेवल्या आहेत. त्या रस्त्यावर धावताना दिसतातही.
यामाहाच्या या सर्व दुचाकींचे इंजिन हे टू स्ट्रोक आहे. म्हणजेच आजच्या काळातील बाइक्सच्या तुलनेत त्यांचे मायलेज फारच कमी आहे. तरी देखील या जुन्या, फार आवाज करणाऱ्या आणि अधिक इंधन खाणाऱ्या यामाहाबाबत आजही क्रेझ कायम आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे, की यामाहाने त्यांचा या बाइक्सची कधीच ‘इंधन बचत करणारया बाइक्स’ अशी जाहिरात केलेली नाही. यामाहाच्या गाडय़ा नेहमीच वेगवान, अधिक पीक-अप असणाऱ्या म्हणूनच ओळखल्या जातात.
मूळची जपानची असलेली ही कंपनी आज जगभरात विस्तारलेली आहे. दुचाकी निर्मिती हा या उद्योगाचा एक छोटासा भाग आहे. मात्र, आज त्याने संपूर्ण विश्वच व्यापून टाकले आहे. बाइक्सबरोबरच यामाहा जहाजांचे इंजिन्स, हेलिकॉप्टर, रोबोट्स निर्मिती इत्यादी कित्येक क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवून आहे. १९५५ सालापासून यामाहा दुचाकी निर्मितीच्या क्षेत्रात आहे. तेव्हापासून यामाहाने दैनंदिन वापराच्या दुचाकी, रेसिंगच्या वेगवान दुचाकी व अन्य अनेक प्रकारच्या दुचाकींची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि आजपर्यंत त्यांच्या शेकडो मॉडेल्सनी बाजारपेठेत पाय रोवले आहेत.
यामाहाचे भारतातील स्थान
यामाहाच्या टू स्ट्रोक इंजिन असलेल्या बाइक्सना एकेकाळी भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी होती. मात्र, त्या फक्त एका विशिष्ट वर्गातच लोकप्रिय होत्या. केवळ वेगवान दुचाकी हवी असणारे आणि त्या परवडू शकणारे लोकच या दुचाकींचा विचार करायचे. फोर स्ट्रोक इंजिनाच्या शोधानंतर जसे अधिकाधिक इंधन बचत करणारे पर्याय ग्राहकासमोर येऊ लागले, ग्राहक या अधिक इंधन बचत करणाऱ्या दुचाकींना पसंती देऊ लागले. बदलत्या बाजारपेठेची ही गरज लक्षात घेऊन यामाहानेही फोर स्ट्रोक इंजिनाचा वापर करून भारतीय बाजारपेठेत बाइक्स उतरवल्या. अल्बा, G5, फेजर, स्पार्क, FZ अशा कितीतरी यामाहा बाइक्स आजपर्यंत बाजारपेठेत येऊन गेल्या आहेत. विविध पसंतीच्या आणि गरजेच्या ग्राहकांकरता विविध दुचाकी बाजारपेठेत उतरवूनही यामाहाचा बाजारपेठेत हवा तसा जम बसलेला नाही. FZ ही त्यांची स्पोर्टस् बाइक्स वगळता इतर सर्व दुचाकींना ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

यामाहा ‘रे’
या पाश्र्वभूमीवर यामाहाने गीअरलेस दुचाकी बाजारपेठेत नव्याने उतरायचा निर्णय घेतला व ‘रे’ ही नवीन गीरलेस दुचाकी भारतात दाखल केली. गेल्या वर्षी सप्टेंबरात ही बाइक बाजारात दाखल झाली. भारतीय तरुणी व महिलांना डोळ्यासमोर ठेवून या गीअरलेस बाइकची निर्मिती करण्यात आली. तिची त्याच प्रकारे प्रसिद्धी करण्यात आली. प्रसिद्धीचा भाग म्हणून महिलांना दुचाकी चालवण्याचे धडे देण्याची मोहीम यामाहातर्फे राबवण्यात आली. त्याचबरोबर ‘रे’ची पूर्ण निर्मिती देखील महिलांनी चालवलेल्या प्लान्टमध्ये करण्यात आली. या सर्व प्रकारे प्रसिद्धी करूनही इतर दुचाकींच्या तुलनेत कमी मायलेज, कमी इंजिन क्षमता, देखभालीची किंमत इत्यादी अनेक कारणांमुळे ‘रे’ भारतीय ग्राहकांच्या पसंतीस पडली नाही. या सर्व अनुभवांच्या आधारे यामाहाने यंदा गेल्याच महिन्यात ‘रे’ ही खास करून तरुणाईसाठी बाजारात आणली आहे.

यामाहा ‘रे Z’
‘रे Z’चे इंजिन हे ११३ cc चे असून ८.१ Nm टोर्क आहे. बाजारामध्ये १२५ccचे अनेक पर्याय असताना ११३ cc बाइक कितपत पसंतीस उतरेल हा मोठा प्रश्नच आहे. ‘रे Z’ ० ते ६० किमी प्रतितास हा वेग १२ सेकंदात गाठू शकते असा कंपनीचा दावा आहे. ‘रे Z’चे कंपनी प्रमाणित मायलेज हे एका लिटर मध्ये ६२ लिटर इतके आहे परंतु सर्व-सामान्य चालकाचा आणि शहरी रस्त्यांचा विचार केल्यास ‘रे Z’४५ किमी. प्रतिलिटर इतके मायलेज देते असा अनुभव आहे. ‘रे Z’ चे वजन हे तिच्या इतर स्पर्धक दुचाकींच्या तुलनेत सहा-सात किलो कमी ठेवण्यात यामाहाला यश आले आहे. ‘र Z’चे वजन १०४ किलो इतकेच आहे. यामाहा ‘रे ९’चा अजून एक तोटा म्हणजे तिला डिस्क ब्रेक्स नसून १३० mm चे ड्रम ब्रेक्स आहेत. समान ठेवण्याकरिता पुरेशी जागा या दुचाकीत असून सीट खालचा कप्पा हा बऱ्यापकी मोठा आहे. ‘रे Z’ ही एकंदरीत सहा रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. रे व ‘रे Z’ या दोन्ही दुचाकींची उंची, त्यांचे डिझाइन हे स्त्री व पुरुष या दोघांनाही वापरण्यास सोपे जाईल या पद्धतीने करण्यात आले आहे. यामाहा ने ‘रेZ’च्या निर्मितीसाठी चेन्नई येथे नवीन प्लान्ट या निर्मितीस सुरुवात केली आहे. पुढील वर्षांपर्यंत तो कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. रे ही भारताबरोबरच अन्य देशातही निर्यात करण्याचा यामाहाचा विचार आहे.   भारतातील एकूणच दुचाकी बाजारपेठ अत्यंत वेगाने विकसित होत आहे. २०१६ पर्यंत भारतीय बाजारपेठेतील १६ टक्के भाग काबीज करण्याचा यामाहाचा मनसुबा आहे. होंडा, सुझुकी, TVS इत्यादी कट्टर स्पर्धक बाजारपेठेत असताना ग्राहकांची पसंती मिळवणे यामाहाला कठीण जाणार आहे. डिस्क ब्रेक्स, उच्च दर्जाचे सस्पेन्शन, अधिक इंधन क्षमता व मायलेज अशा अन्य बाबींचा सखोल अभ्यास करूनच आजचा ग्राहक दुचाकी निवडतो. या सर्व निकषांवर दुचाकी स्पर्धकांच्या तुलनेत किती सरस आहेत यावरच कोणत्याही निर्मात्याचे यश अवलंबून आहे.                                             

मूळची जपानची असलेली यामाहा आज जगभरात विस्तारलेली आहे. दुचाकी निर्मिती हा या उद्योगाचा एक छोटासा भाग आहे. मात्र, आज त्याने संपूर्ण विश्वच व्यापून टाकले आहे.  १९५५ सालापासून यामाहा दुचाकी निर्मितीच्या क्षेत्रात आहे. यामाहा बाइक्सबरोबरच जहाजांचे इंजिन्स, हेलिकॉप्टर, रोबोट्स निर्मिती इत्यादी कित्येक क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवून आहे. प्रारंभीच्या काळापासूनच यामाहाने दैनंदिन वापराच्या दुचाकी, रेसिंगच्या वेगवान दुचाकी व अन्य अनेक प्रकारच्या दुचाकींची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि आजपर्यंत त्यांच्या शेकडो मॉडेल्सनी बाजारपेठेत पाय रोवले आहेत..