सध्या निवडणुकांचे दिवस आहेत. त्यातच उन्हाचा कडाकाही वाढला आहे. अशा परिस्थितीत आरामदायी, प्रशस्त, वातानुकूलित आणि शिवाय इंधनस्नेही एसयूव्ही प्रत्येकालाच, विशेषत: उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या उमेदवारांना हवीहवीशी वाटेल. अर्थात हे काही फक्त निवडणुकीपुरते नाहीच. मुळातच अशी प्रशस्त आणि आरामदायी एसयूव्ही कोणालाही हवीशी वाटेल. टाटा मोटर्सनी याचं उत्तर दिलंय.. टाटा सफारी स्टॉर्मच्या माध्यमातून.. तिचं घोषवाक्यच आहे.. खरी एसयूव्ही!!!

अंतर्गत सुविधा
अत्यंत राजेशाही.. याच एका शब्दात स्टॉर्मच्या अंतर्गत सुविधेचं वर्णन करता येईल. उच्च प्रतीचे लेदर, लाकूड आणि क्रोम यांच्या मिश्रणातून या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. लेदरची नक्षी असलेले स्टिअरिंग आणि क्रोमचा मुलामा देण्यात आलेले गीअर्स गाडीच्या श्रीमंतीत अधिकच भर घालतात. डॅशबोर्डला लाकडाचे नक्षीकाम आणि दारांना आतून देण्यात आलेला लेदरचा मुलामा आपल्याला क्षणोक्षणी राजेशाहीपणाचा थाट याद करून देतात. चारही चाकांना व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम याबरोबरच गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युएल एसआरएस एअर बॅग्जची सुविधाही स्टॉर्ममध्ये आहे. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडलीच तर आतील इनर्शिया बटन आपोआप इंजिनाचा इंधनपुरवठा बंद करते आणि सर्व दरवाजे आपोआप अनलॉक करून संकटाची सूचना देणारे दिवे लावले जातात. याशिवाय आतून गाडी स्पेशियस आहे. ड्रायव्हरसह सहा जण अगदी आरामात बसू शकतील एवढी जागा देण्यात आली आहे. शिवाय पुढे बसणाऱ्याला बूट स्पेसही पुरेसा आहे. तसेच दाट धुक्यातही किमान दहा फुटांपर्यंतचे दिसू शकेल एवढय़ा ताकदीचे फॉगलॅम्प आहेत. टय़ुबलेस टायर्सची सुविधा आहे. रूफ रेलिंगही आहे. त्यामुळे पावसात फिरायला गेलात तर रूफ बाजूला करून भिजण्याचा आनंदही उपभोगता येऊ शकेल.

मायलेज
एसयूव्ही म्हटले की तुम्हाला मिळणारा कम्फर्ट महत्त्वाचा असतो. तरीही मायलेजचा प्रश्न नसतो असे नाही. त्यामुळे स्टॉर्मचा मायलेज साधारणत: प्रतिलिटर १२ ते १५ किमी आहे. आणि हो शिवाय ही प्रशस्त एसयूव्ही फक्त डिझेल व्हर्जनमध्येच उपलब्ध आहे. सध्याच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये तरी पहिल्या पाचात स्टॉर्मचा क्रमांक लागतो.

इंजिन क्षमता
२.२ लिटर क्षमतेचे व्हॅरिकोर इंजिन स्टॉर्ममध्ये आहे. टाटा मोटर्सच्या इतर गाडय़ांच्या तुलनेत या इंजिनाची क्षमता नक्कीच जास्त आहे. शिवाय चालवायला सोपी अशी ही एसयूव्ही आहे. गाडीच्या पुढील आणि मागील भागात सस्पेन्शनची सुविधा आहे. तब्बल ५५ लिटर डिझेल भरता येईल, एवढी इंधन टाकीची क्षमताही या गाडीला अधिक आरामदायी प्रवासाची हमी देणारी एसयूव्ही ठरवते.

गीअर्स
पाच गीअर्स असलेल्या या गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्स जमिनीपासून २०० मिमी असल्याने टार रोड असो वा खडबडीत किंवा मग जंगलातला रस्ता असो, कोणत्याही अडथळ्याशिवाय ही गाडी सर्व प्रकारच्या प्रदेशातून विनातक्रार प्रवास करू शकते. शिवाय स्टॉर्मच्या टायर्सची मजबुती हाही तिचा एक प्लस पॉइंट आहे. तिच्यातील गीअर शिफ्ट ही प्रणाली तर अतुलनीयच.

उपलब्ध रंग
अर्बन ब्रॉन्झ, अ‍ॅस्टर्न ब्लॅक, पर्ल शॅम्पेन, साíडनिया रेड, पर्ल व्हाइट, आर्क्टिक व्हाइट, आर्क्टिक सिल्व्हर.

व्हेरिएंट्स :
एलएक्स, ईएक्स
आणि व्हीएक्स

किंमत :
१६ लाख रुपये
(किंमत विविध ठिकाणी वेगळी असू शकते)