सतत काही तरी एक्सायटिंग पाहिजे.. भन्नाट, वेगवान असं.. रक्त कसं सळसळलं पाहिजे.. अशीच मानसिकता असते तरुणाईची. या सळसळत्या चतन्याला बूम बूम बाइकची साथ लाभली तर बहारच.. म्हणूनच आजकाल बाइकनिर्माते स्पोर्ट्स बाइक्सची निर्मिती जास्त करताना दिसतात. त्यामुळेच हर्ली डेव्हिडसन, केटीएम ड्यूक, ट्रायम्फ या परदेशी कंपन्यांनी भारतात तंबू ठोकला आहे. आता त्यात आणखी एका नव्या भिडूची भर पडणार आहे.. यूएम ग्लोबलची!

शंभर-सव्वाशे सीसीची बाइक म्हणजे तरुणांसाठी डाव्या हाताचा मळ असतो. एखाद्या खेळण्यासारखी ते या बाइक्स उडवतात.. म्हणजे चालवतात. त्यांना क्रेझ असते ती वेगाची. त्यामुळे अर्थातच १५० व त्यापुढील सीसीच्या बाइक्स चालवण्यातच त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. तरुणांची ही आवड पाहूनच हीरो, बजाज, होंडा या भारतीय कंपन्यांनी २०० सीसीहून अधिक क्षमता असलेल्या बाइक्स बाजारात आणल्या आहेत. त्यांचा खपही चांगला आहे. स्पोर्ट्स बाइक्सची ही वाढती लोकप्रियता पाहून विदेशी कंपन्यांची भारतात नजर न वळती तरच नवल होते. त्यामुळेच हर्ली डेव्हिडसन, केटीएम ड्यूक, ट्रायम्फ, ह्य़ोसंग या कंपन्यांनी भारतात तंबू ठोकला आहे. आता यात यूएम ग्लोबल या अमेरिकास्थित नव्या कंपनीची भर पडणार आहे. मूळची मियामी येथील असलेली यूएम ग्लोबल जगभरात ४५ देशांत विस्तारलेली आहे. यंदापासून ती भारतात पदार्पण करणार आहे. म्हणजे त्यांचं ग्राऊंड वर्क आधीच तयार झालंय, फक्त उत्पादन सुरू होणे बाकी आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात त्यांची पहिली दुचाकी लाँच होणार आहे. अर्थातच त्यांचं मुख्य लक्ष्य आहे तरुणाई. २०० आणि २३० सीसीच्या बाइक्स ते प्रथम बाजारात आणणार आहेत. यूएम ग्लोबलच्या रेनेगेड या सीरिजमधील या बाइक्स असतील. २०० सीसीची रेनेगेड स्पोर्ट तर २३० सीसीची कमांडो. या गाडय़ांच्या किमती एक ते दीड लाखांच्या आसपास असतील. त्यांची स्पर्धा असेल ती हीरो, बजाज आणि होंडा यांच्याशी. शिवाय रॉयल एन्फिल्ड, हर्ली डेव्हिडसन, केटीएम ड्यूक आणि ह्य़ोसंग यांनाही यूएम ग्लोबल टक्कर देणार आहे.

स्वस्त स्पोर्ट्स बाइक
यूएम ग्लोबलला ४०० सीसीपर्यंतच्या बाइक्स भारतीय बाजारपेठेत उतरवायच्या आहेत. कंपनीच्या मते सद्यस्थितीत हर्ली डेव्हिडसन, रॉयल एन्फिल्ड, बजाज, हीरो यांच्या एवढय़ा क्षमतेच्या गाडय़ा असल्या, तरी त्यांच्या किमती जास्त आहेत. मात्र यूएम ग्लोबलच्या गाडय़ा त्यांच्या तुलनेत कमी किमतीच्या असतील असे कंपनीचे म्हणणे आहे.
ल्ल ल्ल
महिन्याला पाच हजार
सुरुवातीला दरमहा पाच हजार बाइक्स उत्पादित करण्याचा कंपनीचा मानस असून, पुढील तीन वर्षांत ही क्षमता दरमहा १५ हजार करण्याचा कंपनीचा इरादा आहे. भारतातील दुचाकी विक्रीचा वाटा दहा टक्क्यांपर्यंत नेण्याचाही कंपनीचा निश्चय आहे.
ल्ल ल्ल
१००-१२५ सीसीही
सुरुवातीच्या काळात कंपनी स्पोर्ट्स बाइक तयार करणार असली, तरी तिसऱ्या टप्प्यात १०० आणि १२५ सीसी क्षमतेच्या बाइक्सही बाजारात आणण्याचा कंपनीचा मानस आहे. या गाडय़ांच्या किमती एक लाखाच्या आसपास असतील. मात्र त्यासाठी आणखी किमान दोन र्वष वाट पाहावी लागणार आहे. कंपनीने दिल्लीत संशोधन व विकास विभाग स्थापन केला असून, सद्यस्थितीत त्यांच्याकडे वॉटर-कूल्ड व्ही ट्विन इंजिन विकसित करण्यात आले आहे. ३५० सीसीच्या गाडय़ाही तयार करण्याचा कंपनीचा निर्धार आहे.