मी नागपूरला कृषी महाविद्यालयात शिकायला होतो. आम्हाला सातव्या सेमिस्टरला प्रॅक्टिकल वर्क असते. त्यासाठी सहा महिने गडचिरोलीला राहावे लागणार होते. आम्ही रोज किती काम केले हे तपासण्यासाठी नागपूर महाविद्यालयातून दर महिन्याला प्राध्यापकांचे एक पथक यायचे.
नक्षलग्रस्त असल्याने आम्ही गडचिरोलीत न राहता चोरूनलपून नागपुरातच राहात होतो. फक्त  प्राध्यापकांबरोबर बठक असेल त्याच दिवशी चंद्रपूरला जायचो. असे आम्ही आठ जण होतो. नागपूर ते चंद्रपूर हे २०० किमीचे अंतर आम्ही चार बाइकवरून पाच-सहा तासांत गाठायचो. बठक संपली की परत नागपूरला असे आमचे चालायचे. बाइकवरून जायला मजा यायची. निसर्गरम्य वातावरणात तर बाइक चालवायला खूप आनंद व्हायचा. त्यामुळे बठकीचा दिवस आला की आम्ही खूश असायचो. अशा आम्ही पाच बठका पूर्ण केल्या. सहावी बठक म्हणजे आमची सेमिस्टरची इतिश्री आणि परीक्षेचा दिवस. ती परीक्षा नेमकी सकाळी नऊ वाजता ठेवण्यात आली. आता आम्ही तर गडचिरोलीत नव्हतो. बाकी काहींनी तिथे रुम घेतली होती. मात्र, त्यांच्याकडे जागेची अडचण होती. त्यामुळे आम्हाला कसेही करून नागपुरातून एक दिवस आधी किंवा रात्री पोहोचणे भाग होते. इतर पाच बठका आम्ही दिवसा जाऊन-येऊन केल्याने काही वाटले नव्हते. मात्र, रात्रीच्या अंधारात नागपूरहून चंद्रपूरला जाणे आणि तेही घनदाट जंगलातून म्हणजे थोडी रिस्कच होती. बरं नागपूरहून चंद्रपूरला जाणारी शेवटची बस सायंकाळी सहाची असते. त्यानंतर सकाळ उजाडेपर्यंत त्या दिशेने कोणी जात नाही. जंगली श्वापदं आणि नक्षलवाद्यांचा धोका असायचा. आमच्यातील चौघांनी तर बाइकवरून असलं धाडस करायला स्पष्ट नकार दिला. आदल्या दिवशी सायंकाळी पाचची बस पकडून ते चंद्रपूरला निघून गेले. उरलो आम्ही चौघे आणि दोन बाइक. सायंकाळी सात वाजता निघायचे आम्ही ठरवले. मात्र, आवरता आवरता नऊ वाजले. नाहीतरी लोक १२  पर्यंत जागेच असतात अशा भ्रमात आम्ही होतो. निघालो बाइक घेऊन. शहरातून बाहेर पडेपर्यंत काही वाटले नाही. मात्र, जसजसे नागपूर मागे पडून एकाकी सुनसान रस्ता लागला तसतसा आम्हाला घाम फुटू लागला. एरव्ही दिवसा दिसणारे निसर्गरम्य वातावरण वगरे भयाण वाटू लागले. त्यात सप्टेंबरचा महिना असल्याने पाऊस मध्येच कोसळायचा. वाटेत लागणाऱ्या नद्यानाले दुथडी भरले होते. त्यावरील पूल आम्हाला पार करायचे होते. ६०-७०च्या वेगाने आम्ही बाइक चालवत होतो. अशाच एका पुलावर आम्हाला नागपूरची हद्द संपून चंद्रपूरचे जंगल सुरू झाल्याचे दर्शविणारा दगड आम्हाला दिसला. समोरच घनदाट जंगल. जाम टेन्शन आलेले. परत फिरावे का, असेही मनात यायचे. मात्र, परीक्षा दिली नाही तर वर्ष फुकट जायचे आणि घरच्यांची बोलणी खावी लागतील या भीतीने परत पुढे जावेसे वाटायचे.
मनाचा हिय्या करून जंगलात घुसलो. ३०च्या वेगाने गाडी चालवायला लागलो. किर्र अंधार आणि फक्त बाइकलाइटच्या उजेडात दिसणारा रस्ता एवढाच काय तो दिलासा. आता काही आपले खरे नाही असे वाटायला लागले. ३० किमीवर एका गावातील लाइट अंधुकसे दिसले. तिथपर्यंत पोहोचलो. मात्र, मागे आमच्या मित्रांची बाइक दिसलीच नाही. तिथेच एका चहाच्या टपरीवर थांबलो. चहा घेऊन झाल्यानंतर दोघे मित्र बाइकवरून आले. चहावाल्याला पुढच्या ठिकाणाबद्दल विचारलं तर तो म्हणाला जंगली श्वापदांचा खूप त्रास आहे. वाघ आणि बिबटे रात्री रस्त्यावर येतात त्यामुळे पुढे न जाता गावात थांबण्याचा सल्ला दिला. आम्हीही कुठे लॉज आहे का हे पाहण्यासाठी फिरू लागलो. एका चौकात मागून एक बाइक येऊन आमच्याजवळ थांबली. आम्ही तोंडाला रुमाल बांधला होता आणि पाठीला सॅक होती, त्यामुळे आम्ही दरोडेखोर किंवा नक्षली असल्याचा संशय त्या गाडीवाल्यांना आला. त्यांनी थेट बंदूकच रोखली आमच्यावर. पोलीस होते ते. त्यांना आम्ही खरी माहिती दिल्यावर उलट आम्हालाच त्यांनी फैलावर घेतले. एका लॉजपर्यंत मग सोडायलाही आले, परंतु त्यांची पाठ वळताच आम्ही पुन्हा पुढच्या मार्गाला लागायचे ठरवले होते. कारण सकाळी आठ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे होते. घनदाट जंगलातून गाडी पुन्हा चालवायला लागलो. आता तर निम्म्या वेगाने गाडी हाकत होतो. तेवढय़ात समोर अंधारात चमकणारे डोळे दिसले. आम्ही जागीच थांबलो. वाटलं आता तर काही खैर नाही. नापास झालो तरी बेहत्तर मागे वळून पुन्हा लॉजवर जायचे. मात्र, तेवढय़ात मागून एक चारचाकी गाडी आली. विचार केला याच गाडीच्या मागे गाडय़ा लावायच्या आणि सुसाट सुटायचे. जोरात हॉर्न वाजवत निघालो. ते जंगली श्वापद होते की काय माहीत नाही. पण आम्ही गाडय़ा दामटवल्या. पहाटे साडेतीनला चंद्रपुरात पोहोचलो. एक लॉज शोधला. अंग टाकलं. सकाळी सात वाजता उठलो. आठ वाजता परीक्षा केंद्रावर हजर. मात्र, पुन्हा बाइकच्या भानगडीत पडायचे नाही असे ठरवले होते. पेपर चांगला गेला. पेपर देऊन आल्यावर आता काय करायचे, असा प्रश्न आला. कारण बाइकवर धाडस करायचे नाही असा निश्चय केला होता. मात्र क्षणभर विचार केला, काल रात्री एवढे धाडस आपण केले. आता तर दिवसाढवळ्या निघायचेय. मग काय, मारली किक गाडय़ांना आणि सायंकाळपर्यंत गाठलेही नागपूर.
– सुशील देशमुख, नागपूर.

लाँग ड्राइव्ह आवडते
मला लहानपणापासूनच बाइकचे आकर्षण होते. कोल्हापूर जिल्ह्य़ातले साळशी हे माझे गाव. विविध बाइकचे फोटो जमवणे, त्यांचे मॉडेल्स संग्रही ठेवणे आदी छंद मी जोपासले होते. बाइक रायिडग तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र, सज्ञान होईपर्यंत मला कोणी गाडीला हात लावू दिला नव्हता. मी बाइक शिकलो ते हिरो होंडा सीडी १०० वर. मात्र, मला खास आकर्षण होते रॉयल एन्फिल्ड बुलेटचे. माझे वडील शिक्षक होते. त्यांनी त्यांच्या काळातली चलती असलेली सुझुकी मॅक्स १०० ही बाइक घेतलेली आणि विशेष म्हणजे ही गाडी कशी चालवायची हे मी त्यांना शिकवले. एमसीए करत असताना मला माझ्या आई-वडिलांनी पल्सर घेऊन दिली. १५० सीसीची ही बाइक मी भन्नाट पळवायचो. माझ्या गावाहून पुण्यापर्यंतचा माझा पहिलावहिला लाँग ड्राइव्ह मी याच बाइकवर केला. वर्षभर वापरली मी ती बाइक. त्यानंतर माझे पॅशन असलेली रॉयल एन्फिल्ड बुलेट मी घेतली. माझ्या या आवडत्या बुलेटवरून मी कोल्हापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, माल्रेश्वर, गुहागर, हेदवी, परशुराम, महाबळेश्वर, महाड, जयगड, सिंधुदुर्ग इत्यादी ठिकाणी फिरलो. एमसीए पूर्ण झाल्यावर मी नोकरीनिमित्त हैदराबादला गेलो. तिथे मी एलएमएल अ‍ॅड्रिनो एफएक्स ही बाइक घेतली. तिच्यावरून मी हैदराबादनजीकची सर्व प्रेक्षणीय ठिकाणे पालथी घातली. सध्या मी पुण्यात स्थिरावलो आहे. माझ्याकडच्या एन्टायसरवरून मी पुण्यात मनसोक्त भटकंती करत असतो.
– अविनाश पाटील, पुणे

मी बाइकवेडा..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com