‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘पोस्टकार्ड’, ‘तांदळ’, ‘पारध’, राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘अनुमती’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे खरे तर बाइकप्रेमी. मात्र, दिग्दर्शन क्षेत्रात यशाच्या पायऱ्या चढत गेल्यावर कार असणं हे एक स्टेटस सिम्बॉल समजले जाते. त्यांनीही मग हीच वाट चोखाळली..

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने चित्रपट निर्मिती करण्यात गुंतलेले दिग्दर्शक कमी आहेत. त्यामध्ये आघाडीचा क्रमांक गजेंद्र अहिरे यांचा लागतो. विविध विषय, निरनिराळे कलावंतांना घेऊन जलदगतीने चित्रपट बनविण्यात गजेंद्र अहिरे यांचा हातखंडा आहे. अशा सतत चित्रपटाचाच विचार मनात घोळणाऱ्या दिग्दर्शकाला प्रवासही भरपूर करावा लागतो. चित्रिकरणासाठी स्थळे शोधणे, निरनिराळ्या गावी जाऊन चित्रिकरण करण्यासाठी वाहन अत्यावश्यक नव्हे अपरिहार्य ठरते. म्हणून गजेंद्र अहिरे यांना याविषयी विचारले असता त्यांनी चारचाकी घेण्याआधी बाइकचे पॅशन असल्याचे स्पष्ट केले. ते सांगतात.. स्वत:च्या पैशातून पहिल्यांदा खरेदी केलेली कायनेटिक होण्डा मी घेतली. त्यानंतर बजाजच्या दुचाकी घेतल्या. पत्नी वृंदाच्या वाढदिवशी गाडी घ्यायचीच असे ठरविले होते. परंतु, त्या दिवशी अधिकचे पैसे देऊन गाडी घेता येत नव्हती. ओळखीच्या एका ज्येष्ठ पत्रकाराने माझा हिरमुसला चेहरा पाहिला आणि स्वत:ची ‘मारुती ओम्नी’ ही गाडी लगेच दिली. निळ्या रंगाच्या त्या गाडीने वृंदाच्या वाढदिवशी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. खरे तर कार माझ्याकडे नव्हती तेव्हा आपण पैसे आले की अमूक एक गाडी आधी घेऊ नंतर मर्सिडीझ, ऑडी घेऊ असे खूप मनात यायचे. प्रत्यक्षात मात्र गाडय़ा घेण्याची आर्थिक ताकद मिळवली तेव्हा मात्र अमूक एक ब्रॅण्डच्या गाडय़ा, स्टेटस आणि एकूणच गाडी घेण्याचे आणि ऐटीत त्यातून फिरण्याचे ‘पॅशन’ संपूनच गेले. ‘अनुमती’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा निर्मात्यांनी फोर्ड फिएस्टा ही गाडी भेट दिली. आता सध्या माझ्याकडे स्कोडाची ‘येती’ ही पांढऱ्या रंगाची गाडी आहे. पण खरं सांगायचं तर गाडी घेण्याचे ‘पॅशन’ असे आता वाटत नाही. शेवटी कोणती गाडी तुमच्याकडे आहे यापेक्षा ती गाडी घेऊन तुम्ही कुठे चालला आहात, काय करणार आहात हे फार महत्त्वाचे ठरते. दुसरा असा एक विचारही आला की ड्रीम कारचे स्वप्न कशासाठी पाहायचे ‘एक्स्पायरी डेट’ असलेल्या गोष्टींचे स्वप्न पाहण्यात अर्थ नाही. हा विचार बळावत गेला आणि ‘पॅशन’ कमी झाले. सध्या माझ्याकडे असलेल्या ‘स्कोडा येती’ या गाडी वापरतोय. पण प्रेमाने दिलेली मारुती ओम्नी आणि फोर्ड फिएस्टा या गाडय़ा ज्यांनी मला भेट दिल्या त्याची सर ड्रीम कारला येणार नाही हे खरेच.