वाहन चालवायचे म्हणजे ते प्रथम शिकावयास हवे. मी स्कूटर चालवायला शिकलो ते माझा मित्र संजय प्रभूमिराशी याच्या एक रुपयाच्या टीव्हीएस 50वर. संजयला ती गाडी लॉटरीमध्ये लागली होती. त्यामुळे जगन्नाथ चाळीतील आम्हा मुलांची चंगळच झाली. बरीच मुले संजयकडे स्कूटर शिकण्यासाठी येत. त्यात माझाही सहभाग असायचा. रीतसर गाडी शिकून झाल्यावर मी आधी सेकंड हँड टीव्हीएस 50 घेतली व त्यानंतर ९ ऑक्टोबर १९९८ रोजी नवीकोरी बजाज चेतक ही स्कूटर घेतली. आजही माझी ही स्कूटर मला चांगली साथ देते. १५ वर्षांनंतरही तिचा अ‍ॅव्हरेज कायम आहे. अनेकदा मित्रांनी ही माझी जिवलग स्कूटर विकून टाकण्याचा सल्ला दिला, मात्र या स्कूटरने माझा दोनदा जीव वाचवला आहे. अनेक अडीअडचणींत ती माझ्या उपयोगाला आल्याने स्कूटर माझी जिवाभावाची सखीच झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कुलाबा येथे जात असताना वाटेत मागून टँकर व पुढून टॅक्सी आली, त्यांच्या धडकेत मी व गाडी दोन्ही खाली पडलो. या अपघातात माझ्या चेतक स्कूटरचे इंजिन वगळता सर्वच पार्ट्स मोडले, पण माल फक्त खरचटले. माझ्या गाडीचे आभारच मानले मी. म्हणूनच तर मला गाडी विकावीशी वाटत नाही. आय लव्ह माय चेतक स्कूटर.
सुशील बापट, मुंबई