स्कोडाचा भारतीय बाजारपेठेतील विक्री हिस्सा वाढविण्यात रॅपिडने मोलाची भूमिका बजावली आहे. सेडान प्रकारातल्या रॅपिडने नोव्हेंबर, २०११ पासून भारतीय बाजारात पाय रोवले आणि बघताबघता यशाची कमान गाठली. त्यामुळेच इतर ब्रँड्सच्या तुलनेत स्कोडा इंडियाने रॅपिडवरच लक्ष केंद्रित केले आहे. रॅपिडच्या आणखी एका नवीन मॉडेलचे यंदाच्या मार्चमध्ये लाँचिंग झाले. त्यानिमित्ताने..
आपल्याला कार घ्यायची असेल तर आपण सर्वप्रथम काय पाहतो, तर तिचं रुपडं, तिच्यात असलेल्या सुविधा, इंजिन क्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिची किंमत आणि मग तिचा मायलेज इ. इ. त्यानंतर आपण मग त्या कारची तुलना इतरांशी करून पाहतो. मग त्यातल्या त्यात कोणती चांगली, तिची निवड करतो. हल्ली बाजारात एवढय़ा नवनवीन गाडय़ा आल्या आहेत की निवडीचे अनेक पर्याय हात जोडून उभे असतात. मात्र अखेरीस ब्रँडनेमला अधिक महत्त्व देत एखाद्या ठरावीक ब्रँडच्याच गाडय़ा घेतल्या जातात, परंतु याचा अर्थ असा नाही की त्या ब्रँडच्या तुलनेत इतर ब्रँड चांगले नसतात. इतरही ब्रँड तितकेच चांगले आणि दमदार असतात. स्कोडा हा त्यातला एक उत्तम पर्याय आहे. स्कोडाने आतापर्यंत बाजारात ऑक्टाव्हिया, फाबिया, सुपर्ब वगरे गाडय़ा आणल्या. मात्र त्यांना खरे यश मिळवून दिले ते रॅपिडने. रॅपिडच्या आगमनानंतर स्कोडाचा प्रगतीचा आलेख उंचावला. मग अर्थातच रॅपिड हे लाडके मॉडेल बनले. याच रॅपिडचे नवीन मॉडेल, एलिगन्सचे, यंदाच्या मार्चमध्ये बाजारात आणले गेले. सेडान प्रकारातल्या या रॅपिड एलिगन्सचे रुपडेही आकर्षक आहे. शिवाय चार सिलिंडरची क्षमता असलेली ही सेडान पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे.

अ‍ॅक्सिलरेशन
गाडी सुरू करताच साडेबारा सेकंदांत ती शून्यापासून ते १०० किमी प्रतितास एवढा वेग गाठू शकते. पाच गीअरची ही गाडी हायवेवर भन्नाट पळते. शहरातही तुम्हाला पहिल्या गीअरवर चालवताना ब्रेक आणि अ‍ॅक्सिलेटर दाबून ठेवावाच लागतो. जरा ब्रेकचा पाय काढला तरी झपकन पुढे जाते. १९० किमी प्रतितास हा या सेडानचा टॉप स्पीड आहे. अ‍ॅक्सिलरेशन स्मूद आहे. खाली दाबून पुढे घ्यायचा असे रिव्हर्स गीअरचे तंत्र आहे.

बाह्य़रूप
गाडीचा लूक चांगला आहे. बोनेट मोठे तर आहेच, शिवाय डिकीही ऐसपस आहे. गाडीचे चारही बाजूचे दिवे हॅलोजनसदृश आहेत. ग्राऊंड क्लिअरन्स (१६८ मिमी) चांगला आहे. त्यामुळे खड्डय़ातून गाडी नेताना फारसे काही वाटत नाही. परंतु ग्राऊंड क्लिअरन्स कितीही चांगला असला तरी खड्डय़ातून आणि गतिरोधकावरून गाडी नेताना सावधगिरी बाळगलेलीच बरी. गाडीचे टायर्स निसरडय़ा रस्त्यावरही ग्रीप पकडून असतात. मात्र या गाडीला सनरूफ नाही. डॅशबोर्डवरील रेडिओ, एमपीथ्री, मोबाइल कनेक्शन, ब्ल्यू टूथ यांचे कार्यान्वय चांगले होण्यासाठी गाडीच्या मागे टपावर दिलेला अँटेना शक्तिशाली आहे. शिवाय फॉग लॅम्पही शक्तिशाली आहेत. गाडीची लांबी चार हजार ३८६ मिमी असून रुंदी एक हजार ६९९ मिमी आहे.  

अंतरंग
गाडीत पाच जण आरामात बसू शकतील एवढी ऐसपस जागा आहे. भारतीय रस्त्यांची अवस्था लक्षात घेऊन आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. आसनांच्या आरामदायी रचनेमुळे पोटातले पाणीही हलणार नाही, याची खात्री स्कोडा रॅपिड देते. पुढील आणि मागील अशी दोन्ही बाजूंची आसने आरामदायी आहेत. चालकाला ड्रायिव्हग व्हील त्याच्या सोयीनुसार अ‍ॅडजस्ट करण्यासाठी व्हीलखालीच एक खटका देण्यात आला आहे. बाकी डॅशबोर्डवर नेहमीचेच फंक्शन्स आहेत. बूट स्पेस चांगली आहे.

मायलेज
रॅपिड पेट्रोल आणि डिझेल प्रकारांत उपलब्ध आहे. पेट्रोल प्रकारातील ही सेडान १२ ते १४ किमी प्रतिलिटर अ‍ॅव्हरेज देते. हायवेवर मात्र १६ किमीपर्यंत मिळू शकतो हा अ‍ॅव्हरेज. डिझेल प्रकारातील गाडी १३ किमी प्रतिलिटर अ‍ॅव्हरेज देते. इंधन टाकीची क्षमता ५५ लिटर आहे. हायवेवर वेगात चालवताना मात्र गाडी एका बाजूला झुकत असल्याचे निदर्शनास आले आहे, परंतु गाडीच्या निर्मितीत दोष असेल तरच असे प्रकार होऊ शकतात.

सुरक्षितता
स्कोडा रॅपिडमध्ये ड्रायव्हर आणि प्रवाशाच्या सुरक्षेसाठी एअर बॅग्जची व्यवस्था आहे. एबीएस तंत्र, ब्रेक असिस्ट आणि इंजिन इममोबिलायझर याही सुरक्षेच्या सुविधा आहेत. ब्रेक लाइट्स, सीट बेल्ट्सही आहेत.