भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आजच्या घडीचा देशातला स्टार फलंदाज. कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या कामगिरीतले सातत्यही दृष्ट लागण्याजोगे असेच आहे. अगदी टीव्हीएसच्या एकूण कार्यपद्धतीला शोभेसेच आहे हे. त्यामुळेच स्टार सिटीप्लसचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून धोनीच योग्य ठरतो तो यासाठीच. असो. मुद्दा हा आहे की स्टार सिटीप्लस दिसते कशी, चालते कशी आणि मुख्य म्हणजे मायलेज किती देते. स्टार सिटीप्लसचा हा अनुभव ऑनरोड अनुभवायला मिळाला.
हिरो मोटोकॉर्प, होंडा बाइक्स, बजाज, मिहद्रा, हर्ली-डेव्हिडसन यांसारखे दिग्गज तरुणाईला आकर्षति करण्यासाठी भरमसाट दुचाकी बाजारात आणत असतानाच टीव्हीएसनेही या स्पध्रेत उडी घेतली आहे. मात्र, ही उडी घेतली आहे एन्ट्री लेव्हल बाइक सेगमेंटमध्ये. स्टार सीरिजमधील सिटी प्लस ही बाइक बघितली की टीव्हीएसची ही तयारी जाणवते. ‘स्टार इन द सिटी’ही त्यांची टॅगलाइनही सार्थ ठरवते..
ब्रेक सिस्टीम
डिस्क ब्रेक प्रकारात सध्या तरी सिटीप्लस उपलब्ध नाही. पुढचा ब्रेक हाताने लावता येऊ शकतो तर मागचा ब्रेक पायाने दाबता येतो. विशेष म्हणजे गाडीचे सस्पेन्शन अगदी स्मूद आहे. टॉप गीअरला गाडी चालवली तरी सस्पेन्शनमध्ये काही फरक पडत नाही. अगदी मख्खन जैसी चलती है, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
फोर स्ट्रोक
गाडी फोर स्ट्रोक आहे. म्हणजे चार गीअर सिटीप्लसला आहेत. चारही गीअर खालचे आहेत, म्हणजे तुम्हाला गाडीचा वेग कमी करायचा असेल तर गीअर शिफ्ट करताना ते वर उचलावे लागतात. अर्थात बाइकप्रेमींना एवढी फोड करून सांगण्याची गरज नाही.
लूक
सिटीप्लस तशी दिसायला साधीच आहे. एन्ट्री लेव्हल बाइक असल्याने फारसा स्टायलिश लूक नसला तरी तिच्या नुसत्या दिसण्यावर जाऊ नका. एकदा का तुम्ही स्वार झालात की तिच्या अंगात वारं संचारतं. अगदी किक मारल्यापासून ते पहिला गीअर टाकल्यानंतरचा तिचा वेग भन्नाट वाटतो. चार गीअरची ही बाइक हमरस्त्यावर अगदी सुसाट धावते. शिवाय वजनाला हलकी असल्याने चालवताना ती जड वाटत नाही.

मायलेज
११० सीसी आणि फोर स्ट्रोक इंजिन असलेली सिटीप्लस प्रतिलिटर ८६ किमी मायलेज देते असा टीव्हीएसचा दावा आहे. मात्र, आपल्याकडील रस्ते आणि एकूणच परिस्थिती पाहता कंपनीचा हा दावा थोडा, म्हणजे अगदी थोडाच, अतिच वाटतो. ८६ नाही पण पाच-दहा किमी मायलेज कमी असेल. पण मायलेज इतर गाडय़ांच्या तुलनेत अगदी चांगला मिळेल याची खात्री बाळगायला हरकत नाही.

स्पीडोमीटर
पांढऱ्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर स्पीडोमीटरचे आकडे झळकतात. १४० पर्यंतचा हायस्पीड आहे. गाडी सुरू केल्यावर अगदी ० ते २० सेकंदात सिटीप्लस वेग पकडते. हायवेवर ९० ते १००च्या स्पीडने चालवता येते. वजनाला हलकी असूनही स्पीड वाढवल्यानंतर गाडी व्हॉबल होत नाही, हे विशेष.

इकोनॉमीटर
गाडीच्या इग्निशनवर स्पीडोमीटर असून त्याच्याजवळच इकोनॉमीटर बसवण्यात आला आहे. तुम्ही जेव्हा ४० ते ५० किमी प्रतितास या आदर्श वेगाने गाडी चालवत असाल त्यावेळी या इकोनॉमीटरवरचा हिरवा दिवा प्रज्वलित असतो. आणि तुम्ही या आदर्श वेगाची मर्यादा ओलांडली की इकोनॉमीटरवरचा लाल दिवा लगेचच तशी सूचना देतो.

सीटची रचना
आसनव्यस्थाही उत्तम आहे. बाइकचालकाच्या मागे बसणाऱ्यालाही आरामदायी वाटेल अशी सीटची रचना करण्यात आली आहे. सीटच्या खाली मागच्या बाजूला एक कुलूप देण्यात आले आहे. सीट उघडण्यासाठी त्याचा वापर
होतो.

इंधन टाकी
इंधनाची टाकी गाडीच्या तुलनेत मोठी आहे. इंधन टाकीची क्षमता दहा लिटर पेट्रोलची असून रिझव्‍‌र्हचा कोटा दोन लिटर आहे. म्हणजे गाडी रिझव्‍‌र्हला लागली तरी तुम्ही किमान १५० किमीपर्यंत प्रवास करू शकता.
किंमत :
४४ हजार रुपये (एक्स शोरूम)
रेटिंग : 4/5