सतीश राजवाडे हे नाव मराठी रसिकांच्या चांगलेच परिचयाचे आहे. ‘मृगजळ’सारखा पुरस्कार विजेता चित्रपट, तसेच ‘गैर’, ‘पोपट’, आणि आता आगामी ‘सांगतो ऐका’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.कार चालविणे आणि त्याचा आनंद लुटणे याची मला भयंकर हौस असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सिनेमाची संकल्पना सुचल्यानंतर, प्री-प्रॉडक्शनसाठी जेव्हा रेकी करावी लागते, तेव्हा मी माझी गाडी घेऊन प्रवासाला निघतो. रेग्युलर गीअर आणि क्लच असलेली कार चालविणे यापेक्षा स्वयंचलित कार चालविणे मला खूप आवडते. सुरुवातीला माझ्याकडे होंडा सिटी होती. परदेशातील ऑटोमॅटिक कार मी खूप पाहिल्या आहेत, त्यामुळे आपल्याकडे मारुती कंपनीने ‘ए स्टार ऑटोमॅटिक’ ही गाडी बाजारात आणली तेव्हा मी लगेच घेतली. ही चालवत असल्यापासून कार ड्रायव्हिंगची मौज हीच मुळी ऑटोमॅटिक कारमध्ये असते असे माझे ठाम मत झाले आहे. या ऑटोमॅटिक कारमध्ये, डी२ आणि डी३ असे पर्याय वेगासाठी दिलेले असतात. मला वाटते नजीकच्या काळात ऑटोमॅटिक कार्स खूप लोकप्रिय होतील. अॅव्हरेज थोडे कमी मिळते परंतु क्लच दाबायचा नसल्यामुळे प्रदूषण कमी होते. पांढऱ्या रंगाची माझी गाडी घेऊन मी राज्यभर भरपूर प्रवास केला आहे. ड्रीम कारचे म्हणाल तर भविष्यात केव्हा तरी रेंज रोव्हर ही एसयूव्ही प्रकारातली गाडी मला घ्यायला आवडेल. अर्थात या गाडीची किंमत साठ-सत्तर लाखांच्या आसपास तरी आहे. तरीदेखील ती माझी ड्रीम कार आहे. कधी तरी मी ती नक्की घेईनच.

कोणती कार घेऊ?
* मी सौदी अरेबियात वास्तव्याला आहे. पण मला काही दिवसांसाठी पुण्यात यायचे आहे. या कालावधीत चारजणांसाठी योग्य ठरेल अशी कोणती स्मॉल कार मी घेऊ. नंतर ती कार तशीच राहणार आहे, कोणी तिचा वापर करणार नाही.  – राजेश जाधव, यांबू (सौदी अरेबिया)
* वस्तुत: तुम्ही फक्त काही दिवसांसाठीच मायदेशी येणार आहात. तुम्हाला तुमच्या वास्तव्याच्या कालावधीत भाडय़ानेही कार घेता येऊ शकते. आज असे अनेक पर्याय आहेत. तुम्ही पुण्यात येण्यापूर्वीच तुम्हाला हवी तशी गाडी रिझव्र्ह करू शकता. इंटरनेटवर तशी सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला विमानतळावर घ्यायला येण्यापासून ते तुमच्या संपूर्ण निवासादरम्यान व परत विमानतळापर्यंत सोडण्यासाठी तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही पुण्यातल्या तुमच्या निवासादरम्यान एखादी कार घ्यावी, असे सुचवावेसे वाटत नाही.
*‘प्रीमियर रिओ’बद्दल तुमचे मत काय? सात ते आठ लाखांत कोणती छानशी एसयूव्ही मिळू शकते.     – डॉ. नरेंद्र राइसकवार
* ‘प्रीमियर रिओ’ ही एसयूव्ही दिसायला चांगली तर आहे. मात्र, तिच्याबद्दल फारसे ऐकिवात नाही, ती फारशी दिसतही नाही रस्त्यावर त्यामुळे तिच्याबद्दलचे मत व्यक्त करणे अप्रस्तुत वाटते. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे किमान सात-आठ लाखांत तुम्हाला एसयूव्ही मिळणे अंमळ कठीणच आहे. मारुतीची अर्टगिा ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, मात्र तिचीही किंमत तुमच्या बजेटपेक्षा जास्त आहे. तिसरी म्हणजे तुम्ही पाचजणांसाठी कम्फर्टेबल ठरू शकेल अशा गाडीविषयी विचारले आहे. तर मग त्यासाठी कोणतीही सेडान जास्त उपयुक्त ठरेल. मारुती, होंडा, ह्य़ुंदाइ, शेवरोले, निस्सान, टोयोटा यासर्व प्रकारच्या कंपन्यांच्या सेडान प्रकारातल्या गाडय़ा उपलब्ध आहेत, ज्या तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ’२.driveit@gmail.com वर पाठवा.
शब्दांकन : सुनील नांदगावकर