चौतीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला सेकंडहँड रॉयल एन्फिल्ड घेण्याची खूप इच्छा होती. तसा प्रयत्नही सुरू होता. परंतु माझ्या बजेटचे काही जमत नव्हते. मिलिटरीतील बुलेटसाठी प्रयत्न केला व अलाहाबाद केंद्रातून वाहन उपलब्ध असल्याची माहिती मला मिळाली. मात्र, अलाहाबादेतून सांगलीत वाहन आणण्याची लष्करी व नागरी नियमांनुसारची नोंदणी प्रक्रिया खूप खर्चिक व जिकिरीची होती त्यामुळे त्या प्रस्तावावरही पाणी सोडावे लागले. त्याच दरम्यान १९७८ मध्ये बनलेल्या यझदीचे मॉडेल माझ्या पाहण्यात आले. वेळ न दवडता मी ती खरेदी केली. तत्पूर्वी मोटारसायकल चालवण्याचे रीतसर प्रशिक्षण मी घेतले होते. मात्र, सराव झाला तो २५० सीसीच्या यझदीवर. प्रचंड प्रेमात होतो मी या गाडीच्या. सुटीचा वार आला की घरात न थांबता गाडीची टाकी फुल्ल करून मी प्रवासाला निघत असे. त्यावेळी पेट्रोल अवघे साडेतीन रुपते प्रतिलिटर होते. माझ्या एका मेकॅनिक मित्राकडून मी गाडीच्या तांत्रिक बाबींची जुजबी माहिती करून घेतली होती. त्यामुळे लांबच्या प्रवासात फारसा अडसर यायचा नाही. यझदीचे निर्माते जावा मोटर्स यांनी ही गाडी सलग १८ तास चालवल्यानंतरही वाहनास कोणताही धोका संभवत नसल्याचा दावा केला होता. त्याचा प्रत्यय मला माझ्या सांगली ते नागपूर या प्रवासादरम्यान आला. अशा या माझ्या लाडक्या यझदीचा वापर कमी होऊ लागला. त्यामुळे ती दुसऱ्या व्यक्तीला द्यावी लागली. आजही तीन वर्षांनी तिची आठवण होताच माझ्या मनात कालवाकालव होते.    – एम. आर. जोशी, सांगली.

बुलेट चालवायचीय
कडक इस्त्री केलेला एनसीसीचा गणवेश घालून रुबाबात चालण्याचे, घोडेस्वारी करण्याचे, ज्युडो-कराटे आदी क्रीडा प्रकारांत सहभागी होण्याचे वेड मला होते, अगदी तसेच बाइक चालवण्याचेही वेड होते. पोलीस खात्यात नोकरी करण्याची इच्छा होती. मात्र, काही कारणास्तव ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे मग शारीरिक शिक्षण या विषयात बी.एड. करून शिक्षिकेची नोकरी पत्करली. मात्र, मुलांच्या शिक्षणाकडे, करिअरकडे लक्ष देता यावे यासाठी शिक्षकी व्यवसायालाही रामराम केला. मुलांसाठी विविध क्लासमध्ये जावे लागते. या कामात माझी यामाहा एन्टायसर मला खूप मदत करते. एन्टायसर चालवते म्हणून माझे खूप कौतुक होते. डोंबिवलीत होणाऱ्या पारंपरिक उत्सवांमधील बाइक रॅलीत उत्साहाने भाग घेते, त्यावेळी नातेवाइकांना माझा अभिमान वाटतो. माझे बाइकवेड जपण्यात व त्याला पाठिंबा देण्यात माझे पती, भाऊ व मुले यांचा मोठा हातभार आहे. मला बुलेटही चालवता येते. मात्र, स्वत:च्या बुलेटवरून लांबचा प्रवास करण्याचे माझे स्वप्न आहे. माझ्यासाठी ते विशेषच असेल आणि माझे पुढचे ध्येय तेच आहे.
– सुरेखा कोकाटे,  डोंबिवली

चंद्रपूर ते अमरावती बाइकप्रवास
मी मूळचा अमरावतीचा; परंतु डाक विभागातील नोकरीमुळे चंद्रपुरात राहतो. २५ जुल रोजी बाइकवरून चंद्रपूरहून अमरावती गाठावी, असा विचार माझ्या मनात आला. बाइकवरून फिरायला मला खूप आवडते, त्यामुळे हा प्रवास मला सहज जमेल, अशी माझा धारणा होती. काम आटोपून मी संध्याकाळी ०८.३० ला रूमवर गेलो. सुस्ती येऊ नये म्हणून रात्रीचे जेवण मुद्दाम टाळले. रात्री रूम पार्टनरला सांगून बाइक काढली. रात्री ०९.३० च्या सुमारास गाडीची टाकी फुल करून चंद्रपूर सोडलं. घुग्गुसमाग्रे जाणे धोकादायक असल्याचे माझ्या ऐकिवात होते; पण मी जोखीम पत्करायचे ठरवले होते. चंद्रपूर-घुग्गुस-वणी-यवतमाळ-नेर-नांदगाव खंड-अमरावती असा मार्ग मी निवडला..
चंद्रपूर-घुग्गुस-वणी हा परिसर दगडी कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध आहे. या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर अतिशय जड वाहतूक चालते.. रात्री तर या वाहतुकीला उधाण येते. त्या दिवशी वेगळा काही अनुभव नाही आला. पाऊस यथातथाच असल्याने रस्त्यावर धुळीचे आणि मोठमोठय़ा कंटेनर्सचे साम्राज्य होते. त्यातून कसाबसा मार्ग मी काढत होतो. मी आपली एक विशिष्ट वेगमर्यादा ठेवून गाडी चालवत होतो. वेग वाढवायला मला संधीच नव्हती, कारण ट्रक मला पुढे जाऊच देईनात. वणीपर्यंत जायला रात्रीचे १२ वाजले. मी आपले संगीताचा आनंद घेत काळ्याकुट्ट रात्री संगीत रजनी अनुभवत होतो. पुढे २.३० ला यवतमाळ आले.. चहा घेतला. मला थोडे बरे वाटले. नेर आणि नांदगावदरम्यान मला पेंग यायला लागली, कारण यवतमाळ आणि नेर थोडा घाट आणि जंगल आहे. पाऊस होता व त्यात गार वारेही सुटले होते. नेरच्या पुढे गेल्यावर मला तीन-साडेतीनच्या दरम्यान बाइकवरच डुलक्या यायला लागल्या. हे जरा धोकादायक होते. झोप उडवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गाडी लावून चक्क मोठय़ाने मोबाइलवरील गाणे लावले आणि थोडा वेळ नाचलो. झोप उडाल्यावर गाडी पुन्हा हाणली. पहाटे साडेचारला अमरावतीला पोहोचलो. घरच्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या मोठय़ा काकांनी तर सलामच ठोकला मला. त्यांनी स्वत: गरम गरम चहा करून दिला मला आणि मी भरून पावलो. सगळा थकवा कुठच्या कुठे निघून गेला.
– सागर येवतकर, शिंदी बु. (अमरावती)

मी बाइकवेडा..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com