गाडीवरून रस्त्याने जात असताना आपल्या गाडीकडे (आणि अर्थातच आपल्याकडे) सगळ्यांनी गर्रकन माना वळवून पाहावे ही आपली प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. गाडी जेव्हा नवीन असते ना, त्या वेळी होते असे.. कधीकधी. मात्र, प्रत्येक वेळी होईलच असे नाही. तुम्ही गाडी कोणती वापरता यावर हे माना वळवून बघण्याचे प्रमाण ठरत असते. बजाजच्या नव्या डिस्कव्हर १५०एफबाबत असे म्हणता येईल. या नव्याकोऱ्या गाडीचे नुकतेच बाजारात आगमन झाले आहे. मात्र एक नवा स्टायलिश जोश या गाडीवर अनुभवायला मिळतो..
बजाजने नेहमीच आजच्या तरुणाईला भावेल, रुचेल, आकर्षित करेल अशा गाडय़ा आणण्याचा धडाका अलीकडच्या काळात लावला आहे. पल्सर हे त्याचे उदाहरण म्हणता येईल. डिस्कव्हरचे मात्र तसे नव्हते. १००, १२५, १३५ अशा क्युबिक क्षमतेच्या गाडय़ा या रेंजमध्ये बजाजने आणल्या. त्यांची विक्रीही चांगली झाली. मात्र, यूथ आयकॉन बनू शकेल असे त्यात अपील नव्हते. मात्र आता डिस्कव्हर १५०एफ अर्थात १५० क्युबिक क्षमतेची जी गाडी बजाजने बाजारात आणली आहे, ती नक्कीच यूथ आयकॉन बनू शकेल अशी आहे. उत्तम पिक-अप, स्मूद सस्पेन्शन, टय़ूबलेस टायर्स, डिस्क ब्रेक, उत्तम मायलेज आणि लय भारी लूक.. या सर्व गुणांच्या आधारावर डिस्कव्हर १५०एफ एक नव्या जोशात सादर झाली आहे. अल्पावधीतच या गाडीने लोकप्रियता मिळवली आहे. डिस्कव्हर हे मॉडेल बजाजने २००४ मध्ये लाँच केले होते. त्यानंतर आज दहा वर्षांनी त्यांनी डीटीएस आय टेक्नॉलॉजीचे इंजिन असलेली १५० सीसीची ही बाइक बाजारात आणून स्पोर्ट्स बाइकच्या वाढत्या स्पध्रेत आपले पाय आणखी भक्कमपणे रोवले आहेत, शिवाय १५०एफची किंमतही इतर समकालीन बाइकच्या तुलनेत कमी आहे. सर्वच बाबतींत डिस्कव्हर १५०एफ सरस ठरेल अशीच आहे.

बारूप
सिंगल सिलिंडर असलेली १५०एफ ही डिस्क व ड्रम ब्रेक प्रकारांत उपलब्ध आहे. अ‍ॅनालॉग स्पीडोमीटर, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर यांच्यासह डिजिटल घडय़ाळ ही या बाइकची जमेची बाजू. पाच गीअर असलेली १५०एफ शहरांतील गर्दीच्या रस्त्यांवरही तुम्हाला चांगली साथ देते, तर हायवेला सुसाट पळवण्याचा अनुभवही देते. हेड व टेल लॅम्पमध्ये एलईडीचा वापर करण्यात आल्याने धुकेसदृश परिस्थितीतही १५०एफ चालवण्यास सोईस्कर ठरते. आरामदायी आणि हाताला मऊ वाटणारे हँडलग्रिप, उच्च दर्जाचे स्विचगीअर यामुळे १५०एफच्या बाह्य़रूपात आणखीनच भर पडते. आसनही फ्लॅट असल्याने मागे बसणाऱ्याला आरामदायी वाटते. सस्पेन्शन स्मूद असल्याने फायिरगचा आवाज फार मोठा येत नाही. दहा स्पोकचे अ‍ॅलॉय मोटारसायकलच्या इंजिनासारखेच काळे आहेत.

इंजिन क्षमता
१५०एफ किक स्टार्ट व इलेक्ट्रिक बटण अशा दोन्ही प्रकारांनी सुरू करता येते. १४५ सीसीचे हिचे सिंगल सिलिंडर एअर कूल्ड पद्धतीचे असून त्यामुळे कोणत्याही हवामानात गाडी पटकन सुरू होऊ शकते. गाडी सुरू केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत ६० किमी प्रतितास एवढा वेग पकडू शकते, यावरून तिच्या पिकअपची कल्पना यावी. १५०एफचा सर्वोच्च स्पीड ११२ किमी प्रतितास एवढा जाऊ शकतो. टय़ूबलेस टायर्स हे या गाडीचे आणखी एक वैशिष्टय़ आहे.
मायलेज
१५० एफ किमान ६० ते ७० किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. एकूणात किफायतशीर, परंतु आकर्षक अशा पद्धतीने या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे.
किंमत
६७ हजार ५०० रुपये
(स्थानिक करानुसार प्रत्येक ठिकाणी ही किंमत बदलू शकते)