11आपण मुलांच्या, तरुणांच्या मानसिक विकासाबद्दल बोलतो, ऐकतो. तसे बहुतेक वेळेला वृद्धापवस्थेत काय मानसिक विकास / बदल होतात, याचा कधी विचार केलाय? एरिक अ‍ॅरिक्सन नावाच्या मनोवैज्ञानिक जोडप्याने याचे संशोधन करून या विषयाला नवी दिशा दिली. त्यानंतर ज्येष्ठांच्या मानसिकतेचा अभ्यास करणाऱ्या ज्ञानशाखेत त्यावर आणखी संशोधन झाले. वृद्धावस्थेत माणसाचे शरीर दुर्बल झाले तरी मनाची परिपक्वता वाढते. मेंदूचा आजार नसेल आणि समजूतदार, समतोल व्यक्तिमत्त्व असेल तर अपेक्षित विकास होतो. बहुतेक वृद्धांमध्ये हा विकास होतो, असे संशोधनातून आढळून आले आहे.

मानसिकता बदलणे – बहुतेक ज्येष्ठ नागरिक स्वत:च्या जीवनाचा मागोवा घेतात. आपल्या जीवनात आपली ओळख कशी घडली याचे निष्कर्ष शोधतात. वेगवेगळ्या नात्यांमधील आपली भूमिका- उदा. मुलगा-मुलगी-पालक-नागरिक म्हणून तपासतात. कुठेतरी अपेक्षेपेक्षा कमी पडले असेल तर त्याच्या कारणांचा विचार करतात. तरुणपणी कुठल्याही समस्यांचे, असमाधानाचे उकल कार्यातून करण्याकडे कल असतो. पण वृद्धपणी अशा परिस्थितीत तडजोडीकडे कल असतो. हा वृत्तीचा बदल नकारात्मक नसून अगदी साधारण, सकारात्मक समजायला हवा.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

भावनात्मक शांतता – ज्येष्ठ नागरिकांच्या दीर्घकाळाच्या अनुभवामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट पाहिलेली असते. या काळात बहुतेक वृद्ध आपल्या भावनांना कसे नियंत्रणात ठेवायचे त्याचा भरपूर सराव करू शकतात. आपल्या भावना ओळखणे, त्यांना सांभाळणे यात वृद्धांचे प्रावीण्य असते. कुठल्या विषयाचा किती त्रास करून घ्यावा, त्यांना माहीत असते. त्यामुळे कुठल्याही विषयाच्या, घटनेच्या नंतर ते क्वचित त्रस्त होतात. ते शांतपणे त्या क्षणाला सामोरे जाऊ शकतात. एकप्रकारचा धीरगंभीरपणा त्यांच्यात येतो.

मृत्यूच्या वास्तविकतेचा स्वीकार – मृत्यू अटळ आहे आणि नजीक आहे याची जाणीव वृद्धपणी होते आणि ते सत्य स्वीकारले जाते. त्यामुळे भौतिक वस्तूंवरील प्रेम कमी होते. अगदी रोजच लागणाऱ्या वस्तू- उदा. चष्मा, काठी, औषधाचा डबा आदींशिवाय ते इतर गोष्टींबद्दल जास्त विचार करत नाहीत. खूप पुढचा विचार करण्याची पद्धत बदलून फक्त तत्कालीन विचारच करतात. त्याचे कारण म्हणजे- मृत्यू कधीही येऊ शकतो. खूप दिवसांपासून मनात काही तरी दडपलेले ते व्यक्त करून मन हलके करतात. गुपित, राग, अपराधीभावना, कृतज्ञता असे विषय मांडू शकतात.

स्थितप्रज्ञता – समाधानी ज्येष्ठांचे परमार्थीकरण होते. ही स्थिती कुठल्याही धार्मिक किंवा संप्रदायाशी निगडित नसते. असे ज्येष्ठ नागरिक भावनांमध्ये वाहून जात नाहीत की जगापासून अलिप्तही होत नाहीत. स्वत:ची (उदा. आरोग्याची काळजी घेणे) आणि इतरांची सर्व कर्तव्ये ते नेमके पार पाडत असतात. सण-समारंभाचा आनंदही घेत असतात. पण हे सर्व निरपेक्षपणे आणि आनंदाने करतात. कोणत्याही परिस्थितीचा लवकर व समाधानाने स्वीकार करतात. एकप्रकारची स्थितप्रज्ञता येते. या स्थितीला भावनात्मक विकासाची सर्वात उंच पायरी मानली जाते. उतावळे, अस्थिर वाटणारे ज्येष्ठ नागरिक मृत्यू खूप जवळ आल्याचे कळल्यावर ही पायरी गाठतात.
वृद्धापकाळी सर्व प्रकारची वाढ खुंटलेली असते, असाच नकारात्मक विचार सतत केला जातो. मात्र या वयाचेही काही फायदे आहेत. ते जाणून त्याची अंमलबजावणी झाल्यास आयुष्याची संध्याकाळ अधिक समाधानी होऊ शकेल.
डॉ. वाणी कुल्हळी, मानसोपचारतज्ज्ञ
vanibk@rediffmail.com