हवेत छान गारवा सुरू झाला आहे, त्यामुळे सकाळी उठून चालायला जाणाऱ्यांसाठी अगदी योग्य वातावरण आहे. व्यायामाची सुरुवात करण्यासाठी आणि व्यायामात लांबलेला ब्रेक मोडून पुन्हा तरतरीत होण्यासाठीही चालायला लागा.. व्यायाम करायला वेळ नाही, कंटाळा येतो, झोपमोड होते.. अशी कारणे तुमच्याकडे असतील. मात्र सध्याच्या बठय़ा  जीवनशैलीत व्यायाम आवश्यकच आहे, याबाबत दुमत नाही.
सगळ्यात आधी लक्षात घ्या की, व्यायाम हा आपल्या जीवनशैलीचा, दैनंदिन नित्यक्रमाचा भाग करायला हवा. भरपूर काम असते, वेळच पुरत नाही म्हणून सकाळी उठल्यावर ब्रश करायला किंवा आंघोळीला फाटा देता का? ब्रश केले नाही तर दात खराब होतील, आंघोळ केली नाही तर शरीराला दरुगधी येईल, मग व्यायाम केला नाही तर शरीर आतून मोडकळीला येईल.. एवढे लक्षात घेतले तरी व्यायाम सुरू करण्यासाठी वेगळे कारण शोधावे लागणार नाही. सकाळी उठल्यावर ब्रश, आंघोळ आणि व्यायाम झालेच पाहिजेत. असे एकदा ठरवले की आपोआप पुढच्या गोष्टी त्याभोवतीने मांडता येतात.मात्र सकाळी झोप अर्धवट टाकून चालायला जाऊ नका.त्यामुळे होते काय,की काही दिवसांनंतर झोप साठू लागते, थकवा जाणवू लागतो, कंटाळा येतो. हे सर्व व्यायामामुळेच घडले असे वाटते आणि मग त्याकडे कायमचे दुर्लक्ष होते. त्यामुळे सकाळी लवकर बाहेर पडायचे असल्यास रात्री लवकर झोपा.
व्यायामाला लोक कंटाळतात ते त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे. कोणत्याही गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो. मुलांना शाळेत शिकायला पाठवल्यावर तो दुसऱ्याच दिवशी पदवी मिळवत नाही. त्यासाठी पंधरा वष्रे द्यावी लागतात. मग व्यायामाचे फायदे तरी लगेच कसे मिळणार? शिवाय एकसारखाच अभ्यास करून पदवी गाठता येत नाही तसेच रोज फक्त चालूनही व्यायामाचे सर्व फायदे मिळत नाहीत. मात्र पहिल्या इयत्तेची सुरुवात चालण्यापासून होते, हे लक्षात घ्या.
उद्दिष्ट निवडणं हा व्यायामाला किंवा कोणत्याही क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी चांगला मार्ग आहे. तुम्ही येत्या आठवडय़ात किती वेळ, कोणता व्यायाम करणार ते ठरवा. पार्कला आज तीन फेऱ्या मारल्या तर दुसऱ्या दिवशी चार फेऱ्या मारायचे उद्दिष्ट ठेवा. त्याची नोंद करा. एकतर त्यामुळे तुम्ही मार्गावर आहात का ते तुम्हाला समजू शकेल. वजन कमी करण्याचे किंवा कंबर-नितंब यांचा घेर कमी करण्याचे उद्दिष्टही ठेवता येईल. त्यानुसार व्यायाम सुरू करून नोंद करा. काही दिवसांनी त्या नोंदवहीकडे पाहिल्यावर तुम्ही गाठलेल्या उद्दिष्टाकडे पाहून प्रेरणाही मिळेल. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात व्यायाम केला नाही, हे लक्षात आल्यावर अधिक लक्ष देऊन व्यायामाकडे वळाल. किती वेळ आणि कोणता व्यायाम आवश्यक आहे हे प्रत्येकाच्या प्रकृतीवरून ठरते. मात्र हळूहळू सुरुवात करा. उत्साहाच्या भरात कठीण व्यायामप्रकार करायला गेलात तर असह्य़ वेदना होतील आणि व्यायामाच्या मार्गात अडथळे येतील. नवीन घेतलेल्या गाडीलाही सुरुवातीला ५०० ते १००० किलोमीटर सावकाश न्यावे लागते. मग आळसावलेल्या शरीरातील स्नायूंना व्यायामासाठी तयार करण्यासाठी थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे?
अनेक तरुण मुले उत्साहाने जिममध्ये येतात, मग काही दिवसांनी त्यांना कंटाळा यायला सुरुवात होते. तुम्हाला तेच ते करायचा कंटाळा आला तर मग इतर पर्याय निवडा. सायकल चालवा, जॉिगग करा, पोहण्याचा आनंद घेता येईल, टेनिस, व्हॉलीबॉल खेळता येईल.. शारीरिक हालचाल महत्त्वाची.. एकटय़ाला व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर व्यायामाची आवड असलेल्या मित्र-मत्रिणीलाही सोबतीला घ्या. मात्र गप्पा मारायच्या की व्यायाम करायचा याचे प्राधान्य तुम्हालाच ठरवायला हवे.
तुम्हाला अगदीच वेळ मिळत नसेल. सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करत असाल तरीही व्यायामासाठी वेळ देता येतो. कर्मचाऱ्यांच्या वेळा लक्षात घेऊन अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी कार्यालयातच जीम सुरू केली आहे. काही ठिकाणी नृत्यातून व्यायामाचे वर्गही आहेत. त्याचा उपयोग करून घ्या. हेदेखील शक्य नसेल तर एक मात्र नक्की करा. आवर्जून चाला. पंधरा-वीस मिनिटांच्या मार्गासाठी वाहनाचा उपयोग करू नका. घरातही अ‍ॅक्टिव्ह राहा. स्वत:ची कामे स्वत: करा. त्यामुळे आळस निघून जातो. मन ताजेतवाने राहते.
आणखी एक गोष्ट, व्यायाम हा केवळ शरीर सुडौल करण्याचा, छान दिसण्याचा मार्ग नाही. ते व्यायामाचे फायदे आहेतच, पण मुळात शरीरातील सर्व प्रक्रिया उत्तम सुरू राहण्यासाठी, हार्मोन्सचा तोल सांभाळण्यासाठी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मानसिक ताण घालवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. त्यामुळे चालायला लागा..
– बिपिन साळवी, फिटनेस ट्रेनर.