मार्गशीर्ष महिन्यापासून अनेक जण उपास करायला सुरुवात करतात. बऱ्याच जणांच्या उपास करण्याच्या पद्धतीही अगदी टोकाच्या असतात. निर्जळी उपास, काहीही न खाता फक्त पाणी पिऊन उपास, फक्त चहा- कॉफी पिऊन उपास, इथपासून उपासाचे पदार्थ चारी ठाव तुडुंब जेवण्यापर्यंतचे ‘उपास’ बघायला मिळतात. यातला कुठला उपास बरा? काहीही न खाता राहणे बरे की वाईट? उपासाचे कोणते पदार्थ त्यातल्या त्यात बरे, याची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न-
‘लंघन’ – आजार बरे करण्यासाठीच
न खाणे म्हणजे लंघन करणे हा उपचारांचा एक भाग असल्याचे आयुर्वेद मानतो. हे लंघन केव्हा करावे यासंबंधी काही संकेत देण्यात आले आहेत. खाल्लेले अन्न पचलेले नसताना किंवा अपचन झाल्यावर शरीरात निर्माण होणारा ‘आम’ बरा होण्यासाठी लंघन करावे, असे आयुर्वेद म्हणतो. शरीरातील नीट न पचलेले अन्न (आम) पूर्ण पचले, की शरीर हलके झाल्यासारखे वाटेल आणि त्यानंतर खाण्यास हरकत नाही. बरेचसे आजार बरे होण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून लंघन करावे, असाही उल्लेख आढळतो. उदा. ताप येण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे ‘आम’. त्यामुळे असा ताप सुरुवातीच्या अवस्थेत लंघन करून बरा होऊ शकतो, असे सांगितले. ‘आम’ वाढल्यामुळे होणारे आजार बरे करण्यासाठीचा एक उपाय म्हणजे लंघन हे विसरता कामा नये. निरोगी व्यक्तीने लंघन करणे अपेक्षित नाही.
भुकेचा ‘वेग’ थांबवू नये
भूक, तहान, अश्रू, मल-मूत्र असे शरीराचे वेगवेगळे ‘वेग’ आयुर्वेदात सांगितले आहेत. हे वेग थांबवू नयेत, त्या-त्या वेगाप्रमाणे वागावे असेच सांगितले गेले आहे. उदा. भूक लागल्यास खावे, तहान लागल्यास पाणी प्यावे, रडावेसे वाटल्यास रडावे. वेगांचा अवरोध आजारांना आमंत्रण देणारा ठरेल, असे आयुर्वेद म्हणतो. भूक लागल्यावरही लंघन करणे हा त्या वेगाचा अवरोधच. त्यामुळे विनाकारण न खाता राहणे नकोच.
एकादशी अन् दुप्पट खाशी!
काही जण काहीही न खाता अगदी कडकडीत उपास करतात, तर काही उपासाचे नानाविध पदार्थ खायची एक संधी म्हणून उपास करतात. उपासाच्या पदार्थामध्ये प्रामुख्याने बटाटा, रताळी, साबुदाणे, शेंगदाणे याच गोष्टी वापरल्या जातात. यातले शेंगदाणे सोडले तर इतर पिष्टमय पदार्थच आहेत. पिष्टमय पदार्थ शरीराला चटकन ‘एनर्जी’ देतात, कारण अंतिमत: ती साखरच असते; पण हे पदार्थ दिवसभर सतत खात राहिल्यास पचनशक्तीवर ताण येतो. शेंगदाण्यात प्रथिने असतात; पण ते पित्तकर आहेत. त्यामुळे नेहमीसारखे जेवण न करता शेंगदाणेच अति खाल्ले गेल्यास आम्लपित्त आणि शरीरातील उष्णता वाढते. उपासाच्या लोकप्रिय पदार्थामध्ये तंतुमय पदार्थ अत्यल्प आहेत. शरीराचे पोषण करणाऱ्या इतर आवश्यक घटकांचाही त्यात अभावच असतो.
नुसते पाणी/ नुसता चहा पिऊन उपवास?
अन्नात तंतुमय पदार्थाचा अंतर्भाव खूप गरजेचा असतो. इतर काही न खाता केवळ पाणी पिऊन किंवा चहा पिऊन जे लोक उपवास करतात त्यांना तंतुमय पदार्थ मुळी मिळतच नाहीत. मग पचनशक्तीने पचवायचे काय? कच्च्या आणि तंतुमय पदार्थाचा अभाव पचनाच्या आजारांना आमंत्रण देतो. यात आम्लपित्त होण्याची शक्यता तर असतेच; पण ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ (ग्रहणी) होऊन पोट बिघडणे, बद्धकोष्ठ होणे, पोटात गुडगुड आवाज येणे, अशी लक्षणेही दिसू लागतात. वारंवार न खाता कडक उपास करणाऱ्यांमध्ये मूळव्याध आणि फिशर हे आजारही पाहायला मिळतात. आहारात तंतुमय पदार्थ नसल्यामुळे पोट साफ न होणे हे या आजारांचे एक कारण ठरते.

– डॉ. राहुल सराफ

उपासाच्या पदार्थावर आडवा हात नकोच!
उपासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, साबुदाणे वडे, दाण्याची आमटी, वेफर्स अशा पदार्थावर आडवा हात मारण्याचा अनेकांचा परिपाठ असतो. या पदार्थामध्ये तेलातुपाचा वापर प्रचंड होतो. त्यामुळे शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे असे उपास वारंवार करणाऱ्यांच्या शरीरात चरबी वाढण्याची शक्यता असते. तेल-तूप आणि साखरेच्या अतिरिक्त वापरामुळेच हे पदार्थ पचायला जड होतात आणि ते पचवण्यासाठी शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे खर्च करावी लागतात. त्यामुळे कितीही आवडले तरी उपासाचे पदार्थ प्रमाणातच खाल्लेले बरे. काही जण दिवसभर उपाशी राहतात आणि रात्री संपूर्ण जेवण करून उपास सोडतात; पण दिवसभर रिकाम्या राहिलेल्या पोटावर रात्री एकदम पोटभर जेवल्यामुळे ताण येऊ शकतो.
उपासाला हे पदार्थ खाल्लेले चांगले
* ताजी फळे   
* राजगिऱ्याची लाही किंवा राजगिऱ्याचा लाडू आणि दूध
* दूध- गूळ घातलेले उकडलेले रताळे
* शिंगाडय़ाची लापशी
* राजगिऱ्याचा पराठा
* वरीच्या तांदळाची खिचडी
* दही-काकडी (काकडीची कोशिंबीर)
* ताक
– मानसी गोगटे, आहारतज्ज्ञ
ेंल्लं२्रेंल्लॠी२ँ96@ॠें्र’.ूे