आपल्यापैकी बरेच जण पक्के ‘गोडखाऊ’ असतात. जेवणानंतर काहीतरी गोड तोंडात टाकलं नाही तर कित्येकांना जेवल्यासारखंच वाटत नाही! पण प्रत्येक जेवणानंतर पक्वान्नाचा रतीब आरोग्यासाठी बरा नक्कीच नाही. गोडाची आवड पूर्ण करणारे आणि आरोग्यासाठीही चांगले असे काही पदार्थ नक्कीच आहेत. नैसर्गिकरीत्याच गोडवा असणारा सुकामेवा, ताजी फळे, मध, गूळ या पदार्थामधूनही आपल्याला जीवनसत्त्वे आणि खनिजेही मिळतात. भरपूर साखर वापरलेल्या गोड पदार्थाऐवजी यातला एखादा पदार्थ नक्कीच खाऊन पाहता येईल.
खजूर – खजुरात लोहाचे प्रमाण भरपूर असते. खजुराबरोबर आवळ्याच्या किंवा लिंबाच्या रसासारखा थोडा आंबट पदार्थ खाल्लेला असेल तर त्यातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे खजुरातील लोह शरीराला मिळते. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक ग्लास ताक प्या. त्यानंतर एक खजूर विडय़ाच्या पानात गुंडाळून चावून चावून खावा. या पानात खजुराबरोबरच थोडी बडिशेप, गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखरही घालावी. पाचक आणि ‘माऊथ फ्रेशनर’ असणारे हे पान ‘गोडखाऊं’ना आवडेल!
सकाळी सकाळी दुधाबरोबर खजूर खाल्ला तर पुढे दिवसाच्या धावपळीत शक्ती टिकून राहायला मदत होते. थोडे खजूर लहानशा डब्यात घालून बॅगमध्ये नेले तर केव्हाही पटकन तोंडात टाकायलाही बरे पडतात.
सुके अंजिर आणि मनुका – भिजवून ठेवलेले सुके अंजिर किंवा भिजवलेले मनुकेसुद्धा सकाळी खायला उत्तम. काही मिठाया सुक्या अंजिराचा ‘बेस’ वापरून बनवल्या जातात. अशा सुक्या अंजिराच्या मिठाईचा एखादा तुकडाही गोड आवडणाऱ्यांना खूश करून जातो.
गूळ – पूर्वी घरी आलेल्या पाहुण्याला गूळ-पाणी देण्याची पद्धत होती. पण कधी लिंबूपाण्याबरोबर गुळाचा खडा खाऊन पाहिलाय? उन्हातून आल्यावर पिण्यासाठी हे उत्तम पेय आहे. या लिंबूपाण्यात थोडा पुदिनाही घातला तर आणखी छान. गुळाबरोबर भाकरी किंवा पोळी खायला अनेकांना आवडतेच. जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची आवडही त्यातून पूर्ण करता येते. गुळात लोह चांगले असते. गूळ घातलेल्या किंवा गुळाच्या पाकात बनवलेल्या लाडूचा किंवा चिक्कीचा तुकडा जेवणानंतर खाता येईलच, पण कधीतरी मधल्या वेळी खायलाही हे पदार्थ नक्की आवडतील.
मध – मधात नुसते औषधी गुणधर्मच नसतात, त्याला एक छान, वेगळा स्वादही असतो. गोड पदार्थाना हा स्वाद आणखी चविष्ट बनवू शकतो. तांदळाच्या साध्या धिरडय़ावर किंवा ‘पॅनकेक’वर मध घालून खाऊन पाहिलंय?
कच्चे किंवा पिकलेले केळे ओल्या नारळाच्या चवाबरोबर नॉनस्टिक पॅनमध्ये परतून घ्या. त्यावर गोडी वाढवायला थोडा मध घालून खाऊन पाहा. बांधून ठेवलेले घट्ट दही, थोडा मध आणि ताजा पुदिना यांचे छान गार ‘डिप’ तयार करता येते. या डिपबरोबर गाजर किंवा काकडीचे काप खाता येतात.
कोमट दुधात मध घालून चवीला छान लागतेच, पण झोपण्यापूर्वी असे दूध घेतल्याने झोपही चांगली लागते.
फळे – फळांमध्ये नैसर्गिक साखर, तंतूमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंटस् खजिनाच असतो. ताज्या फळांचे तुकडे करून किंचित वाफवले आणि त्यात स्वादाला दालचिनीही घातली तर ते चवीला चांगले लागते. ही ‘स्वीट डिश’ गार किंवा गरमही खाता येते. त्यामुळे जेवणानंतरच्या गोडासाठी हा पर्याय चांगला. ताज्या फळांच्या गरापासून बनवलेली पेये किंवा फळांचा गर आणि पाणी यापासून बनवलेली ‘सॉर्बे’सारखी ‘डेझर्टस्’ उन्हाळ्यात ताजेपणा आणणारी. हल्ली चिक्कू, वेगवेगळ्या बेरीज् अशी फळे वाळवलेल्या स्वरूपातही (सन ड्राईड) मिळू लागली आहेत. ही फळेही केव्हाही तोंडात टाकता येतील.
रत्ना राजे थर -ratna.thar@gmail.com