अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर न्युमोनिया म्हणजे फुप्फुसाला होणारा संसर्ग व त्यामुळे छातीत दुखणे, ताप, खोकला, दमा असा होणारा त्रास. सर्वसाधारणपणे हा आजार जगभरात सर्व वयोगटांमध्ये सर्रास दिसून येतो. मात्र नेहमी येणाऱ्या पाहुण्याकडे जसे कमी लक्ष दिले जाते, तसेच या आजाराकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्रतिकारशक्ती उत्तम असलेल्यांमध्ये न्युमोनिया अनेकदा साध्या उपायांनी बराही होतो. मात्र वृद्ध, लहान मुले तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींना न्युमोनिया झाल्यास तो गंभीर होण्याची शक्यता वाढते. वृद्धांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने तसेच लक्षणांवरून सुरुवातीच्या काळात हा आजार लक्षात येत नसल्याने काही वेळा गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यूही येण्याची शक्यता असते. या आजाराविषयी अजूनही फारशी जनजागृती झालेली नाही.

न्युमोनिया का होतो?
न्युमोनिया साधारण चार प्रकारचा असतो. जीवाणूंमुळे होणारा, विषाणूंमुळे होणारा, क्षयरोगासोबतचा तसेच काही वेळा फंगसमुळेही (एकप्रकारची बुरशी) न्युमोनिया होऊ शकतो. हा आजार वयाच्या कोणत्याही टप्प्यात होऊ शकतो. स्वाइन फ्लू हेदेखील न्युमोनियाचे एक कारण ठरू शकते. अधिकतर वेळा न्युमोनिया हा जीवाणू, विषाणूंमुळे झालेला आढळतो. मात्र न्युमोनिया उपचारांना दाद देत नसेल तर तो क्षयरोगाशी संबंधित नाही ना, याची चाचणी करणेही आवश्यक ठरते. काही वेळा मधुमेह किंवा कर्करोग असल्यास फंगल न्युमोनियाचीही शक्यता असते.

लक्षणे
न्युमोनियाची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे तीव्र स्वरूपाचा ताप. काही वेळेला सर्दी-खोकलाही होतो, श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत दुखते. सर्वसाधारण व्यक्तींमध्ये ही लक्षणे दिसत असली तरी साधारण साठीपलीकडे गेलेल्या व्यक्तींमध्ये ही लक्षणे दिसतीलच असे नाही. त्यामुळे अनेकदा या आजाराकडे दुर्लक्ष होते व डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत आजाराने पुढची पातळी गाठलेली असते. वृद्धांमधील प्रतिकारक्षमता आधीच कमी झालेली असते. त्यांना न्युमोनियाच्या विषाणू, जीवाणूंचा संसर्ग होतो तेव्हा थकवा येतो, मरगळल्यासारखे वाटते. अशक्तपणा, गुंगी येणे, अंग मोडून आल्यासारखे वाटणे अशीही आणखी काही लक्षणे आहेत. मात्र वृद्धांना अधूनमधून असे वाटत असल्याने या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. काही वेळा अशक्तपणा घालवण्यासाठी शक्तीवर्धक औषधे, ग्लुकोज लावणे असेही उपाय केले जातात. मात्र यामुळे फायदा झाला नाही आणि लक्षणे वाढली की मग डॉक्टरांकडे नेले जाते. तेव्हा कदाचित न्युमोनियामुळे शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होण्यास सुरुवात झालेली असते. आधीच प्रतिकारक्षमता कमी झाल्याने या आजाराशी दोन हात करता येत नाहीत. संसर्गाचा परिणाम इतर अवयवांवर झाला असेल तर उपचार अपुरे पडू शकतात.

प्रतिबंध
न्युमोनियाचे अनेक प्रकार आहेत. त्यात स्ट्रेप्टोकोकल किंवा न्युमोकोकल न्युमोनिया हा जास्त प्रमाणात आढळतो. जीवाणू व विषाणूंमुळे होत असलेल्या न्युमोनियावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहेत. पॉलीसॅक्राइड या लसीमुळे साधारणत: स्ट्रेप्टोकोकल न्युमोनियांच्या २३ विविध विषाणूंचा प्रतिबंध करता येतो. त्याची किंमत साधारण साडेबाराशे रुपये आहे. कॉन्जुगेट व्हॅक्सिन यामुळे न्युमोनियाचे गंभीर १३ उपप्रकार प्रतिबंधित करता येतात. त्याची किंमत अडीच ते तीन हजार रुपये आहे. पॉलीसॅक्रेड ही लस साधारणत: दर पाच वर्षांनी घ्यावी लागते तर कॉन्जिगेट लस एकदाच टोचली की आयुष्यभर प्रतिकारक्षमता तयार होते. या लस ६५ वर्षांनंतर द्याव्या, असे वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे सांगतात. पण आताची बदलती परिस्थिती लक्षात घेता साधारणत: साठीनंतर या लस घेण्यास हरकत नाही. मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग असलेल्या ज्येष्ठांनाही या लस देता येतात; किंबहुना अशा व्यक्तींसाठी या लस अधिक योग्य ठरतात. यामुळे सर्वच प्रकारच्या न्युमोनियावर मात होत नसली तरी त्यांचा प्रभाव कमी होण्यासाठी मदत होते. पूर्वी एकूणच सर्व लसींबाबत व त्यांच्या दुष्परिणामांबाबत वैद्यकीय क्षेत्रात मतमतांतरे होती. आता बरेच रुग्ण व डॉक्टरांमध्ये बरीच जागृती झाली आहे. लसींमुळे होणारे नुकसान, त्यांच्या फायद्याच्या प्रमाणात कमी असते.    
न्युमोनियासारख्या एन्फ्ल्युएन्झा विषाणूंमुळे होणाऱ्या आजारासाठीची लस आता उपलब्ध आहे. स्वाइन फ्लूसाठीसुद्धा ही प्रतिबंधक लस असते. प्रत्येक वर्षी पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही लस घ्यावी लागते. हृदयविकार, फुप्फुसविकार, किडनीविकार असे दीर्घकालीन आजाराचे रुग्ण तसेच सतत रुग्णासोबत असलेले डॉक्टर, परिचारिका, मदतनीस यांना ही लस घेणे आवश्यक आहे.

परिणाम
न्युमोनियाचा संसर्ग प्रथमत: छातीत होतो. त्यामुळे ताप, खोकला, छातीत दुखणे अशी लक्षणे दिसतात. रक्तदाब कमी झाल्यामुळे गोंधळल्यासारखे वाटते, ग्लानी येते, मानसिक धक्का बसल्यासारखी अवस्था होते. त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, तर न्युमोनियाचे परिणाम अधिक गंभीर होऊ लागतात. न्युमोनियामुळे मेंदूज्वर (मेनिन्जायटिस), किडनीविकार, सांधेदुखी, हृदयदाह असे त्रास सुरू होतात. आधीच प्रतिकारशक्ती रोडावलेल्या वृद्धांना त्यावर मात करणे जिकिरीचे होते.