बाळाला जन्मापासूनच ओळखीचे व अनोळखी आवाज ओळखता येतात. जन्मानंतर पाच वर्षांपर्यंत मुलांच्या भाषा- बोलण्याचा विकास वेगाने होतो. यासाठी भाषेची समज, पुरेसा शब्दसंग्रह, शब्द जोडण्याचे व्याकरण, शब्दांचे उच्चार, स्वर- सूर आणि समोरच्याचे पुरेशा एकाग्रतेने ऐकणे- अशा सर्वच गोष्टी जमून याव्या लागतात. या सर्वामधील एकाही गोष्टीत उशीर किंवा थोडा अस्वाभाविक बदल दिसून आला तर त्याला भाषा आणि वाणीचा विकार (स्पीच अ‍ॅण्ड लँग्वेज डिसॉर्डर) आहे, असे म्हणता येईल. जन्मापासूनच मूल हुंकार द्यायला, आवाजानुसार व्यक्ती ओळखायला शिकत असते. पाच वर्षांपर्यंत साधारण मोठय़ा माणसांसारखे त्यांना बोलता येते. असे बोलता आले नाही तर नक्कीच मुलाला त्रास आहे, असे समजले पाहिजे. पण पाच वर्षांपर्यंत वाट पाहिली, तर प्रभावी उपचार करण्याची वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे बाळाचा हुंकार, त्याचा प्रतिसाद याबाबत पालकांनी जागरूक राहायला हवे. या त्रासाचे निदान दोन वर्षांंच्या आधी झाले तर सर्वात जास्त फायद्याचे ठरते.

यासाठी कोणत्या तपासण्या?
कर्णबधीरपणामुळे येणारा मूकपणा टाळण्यासाठी नवजात शिशुच्या कानाची तपासणी केली पाहिजे. बाळाचा घसा, जीभ, ओठ आणि पडजीभ नीट आहे की नाही याची तपासणी नवजातशिशुतज्ज्ञ करतात. शिशुच्या शरीरातील थाइरॉइड द्रव्याचे प्रमाण पाहावे लागते. त्यानंतर बालरोगतज्ज्ञाकडून नियमितपणे बाळाची विकासपत्रिका भरून घ्यावी. यातून बाळाच्या विकासाबद्दल माहिती मिळू शकते. शंका असल्यास भाषा-वाणी तपासून यासंबंधीच्या विशेष तज्ज्ञांकडे जावे. बुद्धय़ांक मोजण्याची गरज पडू शकते कारण बुद्धीची वाढ खुंटली असेल तरीही मूल उशिरा बोलायला शिकते. कधीकधी आईच्या उदासीनतेमुळे, अयोग्य पाळणाघरामुळे आणि घरातील क्लेशकारक वातावरणामुळे मुलाचा विकास खुंटतो किंवा मनात भीती बसते. त्यामुळे बाळाच्या वातावरणाची तपासणीही महत्त्वाची असते.

कसे टाळता येईल?
बाळाच्या जन्मापासूनच त्याच्याशी सतत गप्पा मारण्याची सवय पालकांनी लावून घ्यावी. त्याच्याशी बोलण्याने त्याच्या भाषेचा विकास चांगला होत जातो. याचा अर्थ बाळाला सतत रेडियो, टीव्ही किंवा सीडीसमोर बसवावे, असा होत नाही. बाळाचे उच्चार स्पष्ट होण्यासाठी बाळाला उच्चार समजावून सांगावे. मुखाच्या, जिभेच्या मांसपेशीची वाढ होण्यासाठी चावण्यास कमीअधिक सोयीचे असतील असे पदार्थ चावायला द्यावते. फुगा फुगवणे, साबणाचे फुगे करणे, बासरी वाजवणे, शिट्टी वाजवणे, उस चोखणे, नळीतून पाणी पिणे अशा क्रिया करू द्याव्यात. चित्राची पुस्तके, तक्ते दाखवावे. त्याला समोर बसवून वाचून दाखवावे, त्याला वाचनाची गोडी लावावी. मुलासारखे बोबडे बोलू नये किंवा त्याची चेष्टाही करू नये. प्रेमाने आणि आदराने त्याचे बोलणे ऐकून घ्यावे आणि योग्य उच्चार करून त्याला उत्तर द्यावे. स्क्रॅबल, शब्दकोडे यासारखे खेळ भाषेचे प्राविण्य वाढवतात.

कधी आणि कसे समजायचे?
 कुठल्याही वयात बाळाशी खूप बोलल्यानंतरही बाळाकडून सातत्याने प्रतिसाद मिळत नसेल तर काहीतरी बिघडलेले आहे, असे समजावे. दोन वर्षांपर्यंत मूल बोलत नसेल म्हणजे काहीतरी अस्वाभविक असल्याचे लक्षात घ्यावे. शाळेतून तक्रारी, मुख्यत्वे भाषेच्या वर्गातून तक्रारी येणे, शुद्धलेखनाच्या सतत चुका करणे हीसुद्धा याची लक्षणे आहेत. मुलामध्ये जर घाबरटपणा, तोतरेपणा आढळला तर भाषा-वाणी तज्ज्ञांकडून चाचण्या-उपचार करून घ्यावे. या स्थितीत झपाटय़ाने वाढ होण्याची शक्यता असते आणि दोष वाढल्यावर उपचारांचा प्रभाव कमी होत जातो.

भाषा- वाणीचा विकास न झाल्याचे दुष्परिणाम
मुलाला नीट बोलता आले नाही किंवा बोललेले समजले नाही तर त्याचे खूप नुकसान होते. हे त्याच्या भविष्यासाठी आणि व्यक्ती विकासासाठी धोक्याचे ठरते. त्यामुळे पालकांनी वाणी आणि भाषेकडे गांभीर्याने पाहायला हवे. पुसटशी शंका आली तरी चाचणी करून घ्या. यातील बरेचसे दोष उपचारांमुळे पूर्ण बरे होऊ शकतात.
डॉ. वाणी कुल्हळी -vbkulhalli@gmail.com