माणसाच्या लैंगिक व्यवहारांबद्दल लहान मुलांना कुतूहल असणं अगदी साहजिक आहे. आपल्या पातळीवर ती ठिकठिकाणांहून या विषयातली माहिती गोळा करत असतात. आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्यांचा सगळ्यात सोपा स्त्रोत म्हणजे त्यांची मित्रमंडळी. शाळेत, बसमधून ये- जा करताना एकमेकांच्या थोडय़ाथोडक्या माहितीवरुन एकमेकांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जातो. घरातली मोठी भावंडं, सोसायटीतले ताई- दादाही हीदेखील शंका विचारण्यासाठीची हक्काची ठिकाणं असतात. माहितीची राहिलेली राहिलेली कसर चित्रपट आणि इंटरनेटच्या माध्यमातून भरून काढली जाते. त्यामुळे आपल्या मुलाला कोणत्या वयात या गोष्टींची कितपत माहिती असावी याबद्दल आई-वडिलांच्या कल्पना काहीही असल्या तरी आता साधारणपणे ६ ते ८ वर्षांपर्यंतच्या मुलांना ‘..म्हणजे काय करतात’ या सहसा वाच्यता न होणाऱ्या गोष्टीची बऱ्यापैकी माहिती असते.
पूर्वीचं लैंगिक शिक्षण गरोदरपण आणि लैंगिक संबंधांद्वारे पसरणारे रोग या दोनच गोष्टींविषयी मर्यादित होतं. ‘लैंगिक संबंध ही काहीतरी भयंकर वाईट्ट गोष्ट आहे’ आणि ‘लग्न होईपर्यंत गप्प बसा’ एवढाच या लैंगिक शिक्षणाचा सूर होता. आताचं लैंगिक शिक्षण मात्र या मुद्दय़ांपुरतं संकुचित राहून चालणार नाही. पालकांनी स्वत:हून मुलांना माहिती दिली नाही तरी मुलं ती आपल्या ‘सोर्सेस’मधून मिळवणारच आहेत. पण मुलांनी आपली आपण मिळवलेली माहिती बऱ्याच अंशी चुकीची असण्याची शक्यता असते. बऱ्याच मुलांनी १२-१३ वर्षांच्या वयात किंवा दहावीचा टप्पा पार करण्यापूर्वी ‘पॉर्नोग्राफिक फिल्म’देखील बघितलेल्या असतात. इंटरनेटवर, शाळेत मित्रांकडून घेऊन किंवा काही वेळा अगदी खुद्द आई- वडिलांच्याच मोबाइलवर या फिल्म चोरून बघितल्या जातात. हे असं असेल हे बऱ्याच पालकांना कदाचित चटकन पचणार नाही. पण या गोष्टी खरंच आता अगदी ‘कॉमन’ झाल्या आहेत.

कधी बोलू?
योग्य लैंगिक शिक्षण द्यायचं असेल तर मुलांच्या मनात जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं देण्याची पालकांची आणि शिक्षकांची तयारी हवी. मूल रोज ज्या वातावरणात वाढतं त्या वातावरणाला साजेशी, शास्त्रीयदृष्टय़ा खरी आणि मुलाच्या भावविश्वाशी मिळतीजुळती उत्तरं देणं अगदी सोपं निश्चितच नाही. मुलांना आपण या गोष्टींविषयी काही सांगितलं तर पालक म्हणून आपण या सर्व गोष्टी करण्याची परवानगीच देतो आहोत असा अर्थ मुलं काढतील आणि त्यातल्या कशाचा तरी प्रत्यक्ष प्रयोग करुन पाहण्याचा प्रयत्नही ती करतील, अशी अनेक पालकांना धास्ती असते. बालमानसशास्त्र असं सांगतं की पालकांना जेव्हा ‘आता मुलांशी या विषयावर बोलायला हवं’ असं वाटायला लागतं तेव्हा साधारण पाच वर्ष उशीर झालेला असतो! अजुनही अनेक आई-वडील मुलाचं किंवा मुलीचं लग्न व्हायची वेळ आली की हा विषय काढतात. तेव्हा १०-१२ वर्षांचा उशीर नक्कीच झालेला असतो. ‘सुरुवात कधी करू’ या प्रश्नाचं खरं उत्तर एकच आहे. जेव्हा समोरुन प्रश्न येईल तेव्हा उत्तर द्यायला सुरुवात करावी. अगदी पाच वर्षांच्या मुलानं जरी लैंगिक व्यवहारांसंबंधी एखादा प्रश्न विचारला तर त्या वेळी तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतं, ते त्याला देणं ही त्याच्या लैंगिक शिक्षणाची सुरुवात ठरेल. मूल जेव्हा असा प्रश्न विचारतं, तेव्हा त्यानं तुमच्यावर खूप विश्वास टाकलेला असतो. तेव्हा त्याला पालकानं किंवा शिक्षकानं उत्तर द्यायलाच हवं.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
Parenting Mistakes That Spoil Children
आई-वडीलांच्या ‘या’ चुकामुळे मुलांवर होतात चुकीचे संस्कार! मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवताना पालकांनी काय काळजी घ्यावी?

काय माहिती असतं?
नववी- दहावीतल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांपेक्षाही अधिक गोष्टी माहिती असतात. आई- वडील रागवतील किंवा त्यांना वाईट वाटेल म्हणून मुलांनी हे घरात सांगितलेलं नसतं इतकंच. ज्या फिल्म्स बघून त्यांनी ही माहिती घेतलेली असते, त्यात लैंगिक संबंधांचं केलेलं चित्रण विकृत असतं हेही तितकंच खरं. ‘शरीर अमुक- असंच असावं’, ‘अमुक एक गोष्टी केल्या तरच ‘परफॉर्मन्स’ चांगला झाला, असं म्हणता येईल’ वगैरे गोष्टी मुलामुलींच्या मनात खूप गोंधळ निर्माण करतात. क्रिया कळली पण त्यातली नैसर्गिकता कळलीच नाही, अशी या मुलांची अवस्था होते. मुलांचा टीव्ही आणि इंटरनेट बंद करण्याचा विचार पालकांच्या मनात येतो. तो तद्दन चुकीचा आहे. माहितीच्या स्रोतांवर कुठवर बंधनं घालणार आणि ती घालून मूल माहिती मिळवण्याचं राहणार आहे का याचा पालकांनीच एकदा विचार करावा.

काय आणि कसं बोलू?
लैंगिक शिक्षणात महत्वाची भूमिका असते ती पाचवी किंवा सहावीपर्यंत वर्गशिक्षकाची आणि सहावीनंतर जीवशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकाची. महिन्या- दोन महिन्यांतून एकदा तरी प्रत्येक वर्गात एक शंका- समाधान सत्र घेतलं जाणं खूप गरजेचं आहे. मुलांच्या प्रश्नांची स्वच्छ आणि व्यवस्थित उत्तरं देणं हा या सत्रांचा उद्देश असायला हवा. त्यांच्या मनातले गैरसमज दूर करण्यासाठी, ‘त्या’ गोष्टींविषयी डोक्यात असलेल्या काळज्या दूर करण्यासाठी ही सत्रं हवीतच. यातही शिक्षकांनं स्वत:चे समज मुलांवर न थोपवता त्यांना खरी आणि शास्त्रीय माहिती देणं अपेक्षित आहे. एका शंकेचं निरसन झालं की पुढच्या वेळी नवी शंका विचारली जाईल, इतर मुलांचं विचारणं पाहून वर्गातली थोडी लाजाळू असलेली मुलंही धीर करून आपला प्रश्न विचारायला पुढं होतील. लैंगिक शिक्षणाला आपण शिक्षण म्हणत असू तर ती सातत्यानं चालणारी प्रक्रिया असायला हवी. लसीकरणासारखी वर्षांतून एकदा करण्याची ही गोष्ट नव्हे! मुलींना फक्त मासिक पाळीची माहिती देऊन मोकळं व्हायचं किंवा मुली आणि मुलगे अशा दोघांना गरोदरपणा आणि लैंगिक संबंधांमधून पसरणारे रोग याची माहिती देऊन घाबरवून सोडायचं हा लैंगिक शिक्षणाचा उद्देश नक्कीच नसावा. लैंगिक शिक्षण कसं द्यावं यासाठी शिक्षणांनी विशेष प्रशिक्षण घेण्याची गरज आहे ती त्यासाठीच.
– डॉ. भूषण शुक्ल -bhooshan.shukla@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)