आहारतज्ज्ञ सर्वात विस्तृत आणि चांगली माहिती देतात, असं तुम्ही म्हणता, ते कसं काय?
असं छातीठोकपणे सांगण्याचं कारण म्हणजे ते प्रथम तुमच्या खाण्याच्या सवयींची पूर्ण माहिती घेतात. याला हिस्टरी टेकिंग म्हणतात. मग तुमचं वय, तुमचं वजन, दिवसभरात तुम्ही किती शारीरिक श्रम करता, तुम्हाला कुठला इतर आजार आहे का हे पाहतात. या सगळ्या गोष्टी एकत्रित लक्षात घेऊन मग तुमच्या खायच्या पद्धतींशी त्याची सांगड घालतात. एका कागदावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय खायचं ते लिहून देतात. प्रत्येक पदार्थाला पर्याय सुचवतत. वजन कमी करण्याचा सल्ला देताना तुम्हाला सगळी जीवनसत्त्व, सगळे क्षारदेखील व्यवस्थित मिळतील याची दक्षता घेतात. इतका सगळा द्राविडी प्राणायाम ते करत असतात. अनेक संदर्भ, अनेक व्यवधानं पाळून ती सल्ला देत असल्यानं तो बराच परिपूर्ण असतो.
असे सल्ले पाळणं कठीण नाही का? आपण अनेक समारंभात जातो, कधी कधी हॉटेलमध्ये खातो त्यावेळी हे कसं सांभाळणार?
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. १४०० कॅलरी, १६०० कॅलरी असं सांगितल्यावर भल्याभल्यांना अर्थबोध होणं कठीण आहे. सल्ला जेवढा काटेकोर तेवढा तो समजून घेणं आणि त्यावर अंमल करणं अवघड असतं. म्हणून मी बऱ्याचदा एकदम सोपा सल्ला देतो. हेदेखील स्पष्ट करतो की माझा सल्ला परिपूर्ण नाही. पण तो समजायला अतिशय सोपा आणि सहज पाळता येण्यासारखा आहे. शिवाय मधुमेह काबूत राहायलाही तो बऱ्यापकी मदत करतो.
काय आहे तो सल्ला?
मी त्याला ‘वन मिनिट टेस्ट’ असं म्हणतो. पदार्थ तुम्ही तोंडात घातल्या घातल्या गोड लागला तर तो खाऊ नका. अशा पदार्थामध्ये साखर, गूळ, मध वगरे वज्र्य गोष्टी असण्याची शक्यता जास्त असते. एक मिनिट चघळल्यावर जर जरासा गोडसर लागायला लागला तर तो मर्यादेत खा. भाकरी. चपाती, पाव, बटाटे, भात असे पिष्टमय पदार्थ तोंडातल्या लाळेने थोडेसे पचतात. त्यांच्यातली ग्लुकोज मोकळी होते आणि तुम्हाला त्यांची थोडीशी गोड चव मिळते. जे पदार्थ एक मिनिट चघळल्यावही जराही गोडसर होत नाहीत ते खुशाल हवे तेवढे खा. पालक, मेथी सारख्या पालेभाज्या, सलाड बरंच चघळूनही गोड लागत नाही. त्यांचं पचन तोंडात होतच नाही. त्यामुळं त्यांच्यात दडलेली ग्लुकोज बाहेर येत नाही. फक्त फळं या नियमाला अपवाद आहेत. कारण सगळीच पिकलेली फळं गोड लागणार. त्यांच्यासाठी वेगळा नियम वापरता येईल. ज्या फळांचा रस होत नाही ती टाळली की झालं. मग आंबा, केळं, सीताफळ, चिकू, फणस वगरे बाद होतील. हा सल्ला माझाही वेळ वाचवतो आणि बऱ्यापकी उत्तम काम करतो. मुख्य म्हणजे कोणालाही तो सहज समजतो, सहजपणे पाळता येतो. मग तुम्ही हॉटेलमध्ये जेवा की घरी. फारसा फरक पडत नाही.
अर्थात मधुमेहासोबत तुम्हाला इतर काही प्रश्न असतील तर त्याचाही विचार आहारात उमटावा लागतो. रक्तदाब असेल तर मीठ कमी ठेवावं लागतं. जेवणातून कमीत कमी मीठ कसं जाईल ते पहावं लागतं. मूत्रिपड निकामी झालं तर प्रथिने कमी ठेवण्याबरोबर पाणी पण ठराविक प्रमाणात घ्यावं लागतं. तेव्हा मी असा ढोबळ सल्ला द्यायचं टाळतो.
औषधांचा आणि खाण्याचा काही संबंध असतो का?
नक्कीच. काही औषधं शरीरात जबरदस्तीनं इंश्युलीन बनवतात. ही औषधं घेतल्यावर वेळेवर जेवणं गरजेचं असतं. नाहीतर तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते. सल्फोनील युरिया, ग्लायनाइड गटाची औषधं असं करतात. पोट रिकामी असताना तुम्हाला सडकून भूक लागत असेल, घामाघूम होत असाल तर डॉक्टरांकडून औषधांचा डोस पुढे मागे करून घ्यावा लागेल. मेटफोर्मीनमुळं आणि अल्फाग्लूकोसायडेज गटातल्या औषधांनी पोट बिघडतं. ती जेवणासोबत घेतल्यानं हा त्रास कमी होतो. अल्फाग्लूकोसायडेज तर जेवणाच्या पहिल्या घासासोबत घ्यावं लागतं. शिवाय जेवणात पिष्टमय पदार्थ असतील तरच अल्फाग्लूकोसायडेज ही औषधं नीट काम करतात.
इंश्युलीनबद्दल जरा अधिक काळजी घ्यावी लागते. वेगवेगळ्या इंश्युलीनची रक्तात पूर्णत उतरण्याची वेळ निरनिराळी असते. काही इंश्युलीन्सचा तर जेवणाशी कुठलाच संबंध नसतो. ती दिवसाच्या विशिष्ट वेळी घ्यावी लागतात. वेळ पाळली की प्रश्न येत नाही. परंतु इतर इंश्युलीन मात्र जेवणाआधी ठराविक वेळेत घ्यावी लागतात. तुम्ही कोणतं इंश्युलीन घेताय त्याप्रमाणे ते जेवणापूर्वी किती अगोदर घ्यावं हे ठरेल. म्हणून या संदर्भात तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणं योग्य. मधुमेहाच्या इतर औषधांचा खाण्याशी थेट संबंध असतोच असं नाही. कायमची रात्रपाळी करणाऱ्या माणसांच्या जेवणाच्या वेळा विचित्र असतात. त्यांना खाण्याचा सल्ला देताना आणि त्यांची साखर सांभाळताना मात्र दमछाक होते.
डॉ. सतीश नाईक-dr.satishnaik.mumbai@gmail.com