सुनीता, १७ वष्रे, अगदी बारीक, काटकुळी झाली होती. आधीच्या सहा महिन्यात तिचे वजन कमी झाले होते. तरीही तिच्या दिनक्रमात काही बदल होत नव्हता. नियमित जीम, जॉगिंग, जिन्याने वर येणे आणि त्याबरोबरच कॉलेजमध्ये नृत्याचा सराव. इतरांना ती हाडांचा सापळाच वाटे, पण तिला मात्र आणखी बारीक व्हायचे होते. गेल्या दोन महिन्यात तिची पाळी थांबल्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांकडे दाखवले. उपासमार आणि अतिव्यायामामुळे सुनीताच्या शरीरात कमकुवतपणा आल्याने तिची पाळी थांबली आहे, योग्य समतोल आहाराने वजन वाढवले पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. सुनिताला मात्र यातील काही खरे वाटत नव्हते. उलट आणखी बारीक होण्याचा तिचा अट्टाहास सुरू राहिला.
उपाशी राहून, सतत व्यायाम करून स्वत:ला बारीक करणाऱ्या मुलींची संख्या भारतात वाढत आहे. हा प्रकार वेळेवर थांबवला नाही तर अतिअशक्तपणामुळे मुलीचा मृत्यू देखील होऊ शकतो. सर्व सुबत्ता असताना मुली उपासमार करून घेतात, कारण त्यांचे विचार आणि वागणे बिघडलेले असते. हा मानसिक आजार आहे. असे का घडते, मेंदूतले कुठले भाग बिघडतात, हे अद्याप नीट समजलेले नाही. हा आजार बहुतेक वेळेला पौगंडावास्थेतील किंवा तरुण मुलीमध्ये होतो. सिनेमा, मॉडेिलग, जिमनॅस्टिककिंवा नृत्यामध्ये या मुलींना आवड असते अथवा त्यांच्या स्थूलपणाबद्दल त्यांना वाईट वाटलेले असते. जर खाण्यावर नियंत्रण राहिले नाही तर या मुली खाल्ल्यानंतर उलटी करून किंवा जुलाबाची गोळी घेऊन ते सर्व अन्न शरीरातून काढण्याचा प्रयत्न करू लागतात. हडकुळे शरीर म्हणजे सौंदर्य व तंदरुस्ती ही पाश्चात्य संकल्पना आपल्या समाजात पसरत आहे. म्हणून हा आजार प्रचलित समाज- संस्कृतीमुळे होणारा असा आजार आहे. सवयी हीच या आजाराची लक्षणे. उपाशी राहण्याच्या लक्षणाला अ‍ॅनोरेक्सिया म्हणतात. या प्रकारे ३ ते १० वर्षे उपास केल्यानंतर मुलीचे खाण्याकडे लक्ष केंद्रित होऊ लागते व मग एका वेळेला खूप जास्त म्हणजे किलो-किलो इतके खायला सुरुवात होते; या प्रकाराला बुलीमिया म्हटले जाते.
आपल्या संस्कृतीतही धार्मिक कारणाने मुलींनी उपास करण्याची प्रथा आहे. काही वेळेला या मुली किंवा स्त्रिया आठवडे- आठवडे कडक उपास करतात. आता हेही एक प्रकारचे अ‍ॅनोरेक्सिया आहे. उपास करण्याचे कारण वेगळे असले तरी, इतर सर्व गोष्टी सारख्याच असतात. म्हणजे लहान वयात सुरुवात, कडक उपास, शारीरिक दमछाक, बारीक झाल्याची जाणीव नसणे अशा या सवयी. त्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून या प्रकारच्या उपासांनाही उपचार द्यावे, असे मत पडले आहे.
अतिस्थूलपणा, सतत उलटय़ा होणे, खाण्याच्या खूप जास्त आवडी-निवडी हेदेखील मनाच्या अस्वस्थतेमुळे घडते. खाण्याच्या सवईमुळे जेव्हा आरोग्यावर परिणाम होऊ लागतो- त्याला ‘इटिंग डिसॉर्डर’ म्हटले जाते. अगदी क्वचित मधुमेह, आकडी, मेंदूतली गाठ, काही अनुवंशिक आजार आणि हार्मोन्सच्या त्रासामध्ये ही लक्षणे दिसून येतात. म्हणूनच या आजाराच्या तपासण्या केल्या जातात.  
अशी व्यक्ती ज्या कुटुंबात असते त्या कुटुंबाची घडी पार बिघडून जाते. स्वयंपाक, जेवण ही साधारण किंवा आनंददायी गोष्ट त्रासदायी होत जाते. आई- वडील मुलीला कशी मदत करावे याबद्दल संभ्रमित होतात. कुटुंबातील लोकांना मानसिक आधार आणि समुपदेशन करून रुग्णाला कसे हाताळायचे शिकवल्यानंतर ते परिस्थिती नियंत्रणात आणू शकतात. या आजारासाठी रुग्णासोबत पूर्ण कुटुंबाला उपचार दिला जातो. विदेशात यासाठी विशेष रुग्णालय असतात. आपल्याकडे मुलीचे वजन अगदीच टोकाला कमी असेल, तर जीवावरचा धोका टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल करून समतोल आहार दिला जातो आणि कुटुंबाचे समुपदेशन केले जाते. काही मुलींना याबरोबर इतर मानसिक आजार होऊ शकतात. त्या आजारांचा उपचार केल्यानेही त्यांचे खाणे वाढते.
हा आजार टाळणेच बरे. उपास करून, व्यायामाचा अतिरेक करून वजन नियंत्रित करण्याकडे कल असेल, तर मुलीला वेळीच मार्गदर्शन करून ती सवय मोडायला पाहिजे. वजन खूप कमी नसेल तरीही लवकरात लवकर समुपदेशन करून ते आणखीन कमी होणार नाही अशी काळजी घ्यावी.
डॉ. वाणी कुल्हळी -vanibk@rediffmail.com