रक्तदाबाची समस्या (बीपी) आता केवळ पन्नाशीपुढच्या जनसमुदायाची चिंता राहिलेली नाही. मोठय़ा शहरातील आणि अगदी गावातही तरुणांमध्ये उच्च रक्तदाब दिसू लागला आहे. वेळीच आवर घातला नाही तर उच्च रक्तदाब अनेक आजारांकडे घेऊन जाणारा राजमार्ग ठरतो. १७ मे रोजी ‘जागतिक रक्तदाब दिन’ आहे. त्यानिमित्त या विकाराची माहिती.

धावती जीवनशैली, कामाचे लांबणारे तास, तणाव, धुम्रपान, मद्यपान आणि अनारोग्यदायी जेवण या सगळ्यामुळे अधिकाधिक तरुणांमध्ये उच्च रक्तदाब दिसून येत आहे. शहरी भागात सुमारे २० ते ३० टक्के प्रौढांमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास असू शकतो. मात्र अनेकांना त्याची कल्पनाच नसते. त्यातच अनेकजण उच्च रक्तदाबाच्या पूर्व पायरीवर उभे असतात.
 साधारण १४०/९०  रक्तदाब असलेल्या व्यक्तींना हा त्रास असल्याचे समजले जाते. उच्च रक्तदाबाबाबतची सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे त्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे रक्तदाब वाढलेल्या व्यक्तीही त्याबाबत अनभिज्ञ असतात. याला ‘रूल ऑफ हाफ’ ((rule of halves)) म्हणतात.
याचा अर्थ उच्च रक्तदाबाच्या निम्म्या रुग्णांना ही समस्या असल्याचे लक्षातच येत नाही. ज्यांना समस्या लक्षात येते, त्यातील
पन्नास टक्क्यांना उपचार मिळत नाही आणि ज्या उर्वरित पन्नास टक्के लोकांना उपचार मिळतात त्यातील निम्म्या लोकांचा उच्च रक्तदाब तरीही काबूत येत नाही. अर्थात आता ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे. अनेक आजारांची पहिली पायरी असलेल्या उच्चरक्तदाबाबाबत विकसित राष्ट्रांमध्ये जनजागृती होत आहे. मात्र भारतासारख्या देशात अजूनही याबाबत फारशी माहिती नाही.
एक २७ वर्षांचा तरुण माझ्याकडून उपचार घेत होता. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या या मुलाला कामाच्या ठिकाणीच हृदयविकाराचा झटका आला. या मुलाला बरेच दिवस उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू असणार. मात्र त्याला त्याची कल्पना नसल्याने ते सर्व त्याला हृदयविकाराच्या आजारापर्यंत घेऊन गेले.  एवढय़ा वर्षांत तो त्याच्या आरोग्याबाबत अगदीच बेफिकीर होता.
त्याला जो काही थोडा वेळ मिळत होता, त्या वेळेत सोशल मीडियावर चिकटून राहायचा. सोशल मिडीयाच्या व्यसनामुळे अनेक तरुणांची रात्रीची झोपेची वेळही दोन तासांनी कमी झाली असल्याचे अनेक चाचण्यांमधून दिसून आले आहे. अपुरी झोप घेणाऱ्यांना रक्तदाब आणि हृदयविकाराची शक्यता अधिक असते. हृदयविकाराच्या झटक्यासोबतच आकडी येणे, हृदयाचे काम बंद पडणे, मूत्रिपड निकामी होणे, अंधत्व येणे अशा अनेक आजारांमागे उच्च रक्तदाब असतो. सिस्टोलिक प्रेशर (रक्तवाहिन्या आकुंचित असतानाचा दाब) २० पॉइंटने वाढला किंवा डायस्टोलिक प्रेशर (रक्तवाहिन्या प्रसरण पावलेल्या असतानाचा दाब) दहा पॉइंटने वाढल्यास आजार व त्यातून मृत्यू येण्याची शक्यता दुपटीने वाढते.
एवढय़ा सर्व आजारांना आमंत्रण देणारया रक्तदाबाविरोधात काहीच करता येण्यासारखे नाही  का? नक्कीच आहे. जीवनशैलीत सकारात्मक बदल करून हे निश्चितच साध्य करता येईल. सर्वात आधी जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करा. प्रत्येक व्यक्तीला दिवसभरात पाच ग्रॅम मीठ पुरेसे असते. समतोल आहार घ्या. मद्यमान, सिगारेट ओढणे, तंबाखू- पानमसाला ही व्यसने वाईट आहेत, हे सांगणे नकोच. मुख्य म्हणजे नियमित व्यायाम करा. यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अर्थात रक्तदाबाची समस्या वाढलेली असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषध, व्यायाम, आहार व जीवनशैलीतील बदलांमुळे रक्तदाब नियंत्रित ठेवता येईल.

Today's Horoscope 19 March 2024 in Marathi
शनी झाले जागृत! १९ मार्चचा मंगळवार मेष ते मीन राशींपैकी ‘या’ मंडळींना ठरेल मोदकासारखा गोड, पाहा तुमचं भविष्य
Sex racket by young women on name of massage at Dream Family Spa
नागपूर : मसाजच्या नावावर तरुणींकडून देहव्यापार, ड्रीम फॅमिली स्पामध्ये ‘सेक्स रॅकेट’
how to sleep when bp is high
हाय बीपीच्या रुग्णांनी डोक्याखाली नाही तर पायाखाली ठेवावी उशी; जाणून घ्या झोपण्याची ‘ही’ योग्य पद्धत
तरुणपणीच ‘बीपी’

तो कसा मोजतात?
रक्तवाहिन्या आकुंचित झालेल्या असतानाचा दाब (सिस्टॉलिक) आणि प्रसरण पावलेल्या असतानाच दाब (डायस्टॉलिक) मोजला जातो. सामान्यत: सिस्टॉलिक प्रेशर १२० तर डायस्टॉलिक प्रेशर ८० मिमी (१२०/८०) असणे अपेक्षित असते. हा रक्तदाब १४०/९० वर गेला की उच्च रक्तदाबाची पूर्वपायरी समजले जाते.

तरुणांमधील उच्चरक्तदाबाची कारणे
ताण, असमतोल आहार  (तेलकट, मसालेदार, अधिक मीठ), सिगारेट ओढणे, मद्यपान, अपुरी झोप.

– डॉ. प्रदीप गाडगे -ब्रीच कॅण्डी रुग्णालय