मान्सूनचा पाऊस जवळ आला असला तरी मुंबईसह राज्यात चर्चा आहे ती उष्माघाताची. विदर्भ – मराठवाडय़ातील तापमानाचे आकडे उच्चांक गाठत असतानाच इतर भागातील तापमानही त्यांच्या फार मागे नाही. मुंबई- ठाण्यासारख्या किनारी भागातील दमट हवेमुळे उष्माघाताचा धोका नसला तरी कडक उन्हामुळे चक्कर येणे, अस्वस्थता वाढण्यासारखी लक्षणे दिसतात. वेळीच शरीराची हाक ऐकून उपाय केले तर या उष्ण वातावरणातही तग धरता येतो.
उन्हाळ्यात शेतावर किंवा मजुरीची कामे करताना शरीरातील पाणीसाठा कमी झाला की उष्माघात होतो. शहरी जीवनात काम करणाऱ्यांना आता या कडक उन्हाचा सामना कमी प्रमाणात करावा लागत असला तरी उष्म्याचा त्रास या ना त्या स्वरुपात होत राहतो. अनेकांना त्यांचा शारीरिक त्रास हा उष्णतेमुळे होत असल्याचेही पटकन लक्षात येत नाही. अस्वस्थता, मानसिक गोंधळ ही देखील उन्हाची कामगिरी असू शकते. उन्हापासून बचावासाठी अनेक मार्ग शोधून काढले गेले असले आणि अनेक जाहिरात कंपन्यांनी ते आपल्यापर्यंत पोहोचवले असले तरी त्यातील नेमके काय बरोबर, काय चुकीचे हे माहिती असायला हवे.

उष्माघात म्हणजे काय?
हवेचे तापमान वाढले की त्वचेतील छिद्रांद्वारे पाणी बाहेर टाकून शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवले जाते. मात्र काही कारणाने शरीर उत्सर्जित करत असलेल्या उष्णतेचा वेग बाहेरील तापमान शोषून घेण्याच्या वेगापेक्षा कमी झाला की शरीराचे तापमान वाढत जाते. सर्वसाधारणपणे शरीराचे तापमान ९८ फॅरनहाइट किंवा ३४ अंश से. असते. हे तापमान १०४ फॅरनहाइट किंवा ४० अंश से.च्या पुढे गेले की शरीरातील अवयवांवर परिणाम होण्यास सुरुवात होते. याला उष्माघात म्हणतात.

लक्षणे
संपूर्ण शरीरच उष्माघाताचे परिणाम विविध लक्षणांद्वारे दाखवण्यास सुरुवात करते. थकवा, चक्कर, निरुत्साही वाटणे, अस्वस्थता येणे ही सुरुवातीची लक्षणे. ही लक्षणे लवकर ओळखून उपाय केले नाहीत तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा कोरडी पडते, जीभ आत ओढली जाते. रक्तदाब वाढतो. मानसिक बैचेनी वाढते, शरीराचे तापमान वाढते. काही वेळा शुद्धही हरपू शकते.

उपचार
* एखाद्याला उष्माघातामुळे किंवा अति उन्हामुळे चक्कर आल्यास त्याला सावलीत आणावे. मोकळी हवा पोहोचू द्यावी.
* ताप वाढत असल्यास गार पाण्याने अंग पुसावे. तहान लागल्यासारखे वाटत नसले तरी पाणी, नारळपाणी थोडय़ा थोडय़ा वेळाने घोट घोट प्यावे. यामुळे अनेकदा बरे वाटते.
* उन्हाळ्यात चहा, कॉफी ही पेय शक्यतो टाळावीत. कोणत्याही स्वरुपातील मद्य टाळावे. अतिथंड पाणी, सरबत टाळावे. त्यामुळे पोटात मुरडा पडतो.
* शरीराचे तापमान १०४ फॅरनहाइट किंवा ४० अंश से. पेक्षा वाढले की स्नायू, मूत्रपिंड, मेंदू किंवा हृदयावर परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मूत्राचा रंग गडद पिवळा झाला, डोकेदुखी वाढली किंवा भोवळ आली तर तातडीने जवळच्या रुग्णालयात जा.
प्रतिबंधात्मक उपाय
* शरीरातील पाण्याचा साठा कमी होऊ न देणे ही मुलभूत बाब आहे. उष्मा वाढला की सतत पाणी पिणे आवश्यक आहे. यावेळी शरीराला ग्लुकोज व क्षारांचा पुरवठा होणे गरजेचे असते. सरकारी जाहिरातींमधून दाखवले जाणारे, एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर व चिमूटभर मीठ टाकून केलेले- जलसंजीवनी पेय यासाठी उत्तम असते. मात्र अतिसाखरयुक्त सरबत टाळा.
* हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे घाला. उन्हात जाताना गॉगल, टोपी, छत्री वापरा.
* घाम अंगावर सुकू देऊ नका.
* उन्हात कष्टाचे काम करू नका, व्यायाम करणे टाळा.
* दुपारच्या वेळेत काम करण्याऐवजी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा बाहेरच्या कामांची आखणी करावी.
* काही कारणाने उन्हात थांबावे लागले तर भरपूर पाणी प्या.
डोक्यावर जाड कापड गुंडाळा. अधूनमधून सावलीत जा.