‘आम्हाला मूल नकोच’ या ठाम निर्णयाप्रत आलेल्या तरुण जोडप्यांच्या आई-वडिलांची ‘आजी-आजोबा’ होण्याची ओढ अगदी समजण्यासारखी आहे. पण जोडप्यांनी संतती न होऊ देण्याचा घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे आपण कसं ठरवणार? प्रत्येकाला उलगडलेला आयुष्याचा अर्थ कोण कसा कवेत घेऊ शकेल? पण आपण आपला अर्थ शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.
प्रश्न- मी आणि माझी पत्नी आता साठीच्या पुढचे आहोत. आमचा एकुलता एक मुलगा पस्तिशीचा आहे, सून त्याच्यापेक्षा २-३ वर्षांनी लहान आहे. सगळ्यांची वयं सांगण्याचं कारण असं की आम्हा नवरा-बायकोला आता नातवंडांची ओढ फार जाणवते. पण आमचा मुलगा आणि सून दोघांनाही मूल मुळी नकोच आहे. ते दोघं अगदी त्यांच्या लग्नापासूनच असाच विचार करतात. अर्थात आम्हाला ते या विचारावर ठाम असल्याचं अलीकडे जाणवू लागलं. ‘आपण चौघं एकत्र राहतोय, चांगलं चाललंय की, मूल हवंच कशाला,’ हे त्यांचं म्हणणं. ते दोघं चांगल्या नोकऱ्या करणारे, तसं म्हणाल तर आम्हालाही त्यांच्याकडून काही त्रास नाही. वरवर पाहता सर्व बरं चाललंय. पण आम्ही आता ‘रिटायर’ झालोय. आपल्याला आजी-आजोबा म्हणून कुणीतरी जीव लावावा, नातवंडांचे लाड करण्याची संधी मिळावी, असं फार वाटतं. पण सून आणि मुलाचे विचार ऐकल्यावर विफलता आल्यासारखं वाटतं. कुणी आजी-आजोबा म्हणणारंच नसेल तर नुसतं वयानं आजी-आजोबा होण्याला अर्थ तो काय, असं वाटत राहतं.
उत्तर- तुम्ही जो प्रश्न विचारलाय, तो खरं तर मानसशास्त्राच्या कक्षेत मावतो का, हे पाहायला हवं. तुमच्या इच्छा-आकांक्षा काही चुकीच्या म्हणता येणार नाहीत. त्यामुळे तुमचं दुख, तडफड मी समजू शकतो. एकुलता एक मुलगा अन् सून हे त्यांच्या मूल न होऊ देण्याच्या विचारावर ठाम असण्यानं तुमच्या मनात काय-काय येऊन जात असेल, हे खरं तर दुसरं कुणी सांगू शकणार नाही. तुम्हीच त्याच्या जमेल तशा नोंदी ठेवा. तुमच्या मनातल्या सगळ्या दुष्ट शंका आणि चिवट आशांचा आढावा घेऊया. मग मूल नको, असा निर्णय घेणाऱ्यांचे  काय- काय हेतू असू शकतात, त्यासाठी काय करता येईल, याचाही अंदाज घेऊया. मधल्या काळात तुम्ही नक्कीच आजूबाजूच्या मुलांना जीव लावू शकता. शाळा-महाविद्यालयीन चमूमध्ये कोणत्या प्रकारे सहभागी होता येतंय का, याची चाचपणी करू शकता, शिष्यवृत्ती देऊ शकता. थोडक्यात म्हणजे स्वतची नातवंडं जोपासायला नाही मिळाली, तरी इतर मुलांच्यातलं नातू आणि नातपण बघून समाधान मिळतं का, याचा अंदाज येईल.
सध्याच्या काळातला लोकसंख्येचा स्फोट, संसाधनांची कमतरता यामुळे खूप जण व्याकूळ होऊन जातात, आपल्या परीने तरी या पृथ्वीवरचा भार हलका करावा, अशा हेतूनं ते ‘मूल नको’ असा निर्णय घेण्याकडे त्यांचा कल असू शकतो. स्वत:च्या गरजा कमीत कमी ठेवणं, लोकांसाठी आयुष्य वेचणं, ही याच्याही पुढची पायरी म्हणायला हवी. काही जण आपल्यामध्ये असलेली दुखणी पुढच्या पिढीत जायला नको, म्हणून असा पवित्रा घेऊ शकतात. किंवा त्यांच्यात असलेली वेगळी लंगिक जाणीव किंवा अशा आकर्षणाचा अभाव, हे सुद्धा अशा निर्णयाच्या मागे असलेलं कारण असू शकतं. मग इतर सगळ्या बाबतीत उत्तम असलेल्या जोडीदाराला एवढय़ा एकाच कारणानं सोडायला ते तयार नसतात. किंवा काही जणांना मुलं होऊ देणं, त्यांना वाढवणं या जबाबदाऱ्या नको वाटतात. बऱ्याच वेळा अशा लोकांना आपल्या स्वतच्या पालकांबद्दल अन ज्या पद्धतीनं आपल्याला वाढवलं गेलं, त्याबद्दल तक्रारी असू शकतात. ते जर खूप हळवे अन् मानी असतील, तर ते आपल्या पालकांना क्षमा करायला राजी नाहीत, असंही असू शकतं. मग कायम विरोधी पक्षात राहून आता अचानक सत्ताधारी पक्षात जावून स्वत: जबाबदारी घेणं, म्हणजे अवघड परीक्षाच म्हणायची की स्वत:ची!..
पण आपलं तरी हे सगळं बरोबरच असेल हे कशावरून? कदाचित त्यांनी केलेला विचारही बरोबर असू शकेल. पुन्हा अशा गोष्टींमध्ये बरोबर-चूक तरी कसं करणार? प्रत्येकाला उलगडलेला आयुष्याचा अन् अस्तित्वाचा अर्थ कोण कसा कवेत घेऊ शकेल?
म्हणून फक्त मानसशास्त्रावर अवलंबून न राहता साहित्य, नाटय़, कला, तत्त्वज्ञान, इतिहास, संस्कृती अशा विविध अंगांनी आपला अभ्यास आणि साधना चालू ठेवली पाहिजे. आपला अर्थ आपल्यालाच गवसेल, मन दुसरीकडे गुंतवल्यावर विफलताही कमी होईल. पण अगदी वाटलीच गरज, तर मानसशास्त्र मदत नक्कीच करेल.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…