खोडी माझी काढाल तर.. हे बालगीत आपण सर्वानीच आपल्या लहानपणी ऐकलं असेल आणि लहानग्यांना ऐकवलंसुद्धा असेल. या गाण्यातील गंमत म्हणून वापरलेले शब्द आजूबाजूला खरे होऊन वावरताहेत असेच वाटते. ‘अश्शी मारीन फाइट’, ‘अंगावरती याल तर अस्सा देईन ठोसा’ यासारखे आणि असे अनेक प्रसंग अगदी चिमुरड्यांच्या बाबतीतसुद्धा सर्रास पाहायला मिळतात. ‘अरे ला कारे’ म्हणायचे शिक्षण नकळत आपणच तर देत नाही ना?
थोडय़ाबहुत फरकाने सर्वच वयोगटात आणि समाजाच्या सर्व स्तरात संतापाची भावना आणि त्याचे प्रकटीकरण वाढीस लागले असल्याचे जाणवते. जगण्यासाठीची स्पर्धा, मागण्या व पुरवठय़ाचे व्यस्त प्रमाण यासारखी सामाजिक, आíथक कारणे यामागे काही प्रमाणात असली तरी सुद्धा मानसिक व भावनिक-वैचारिक कारणे त्याहून महत्त्वाची आहेत. ‘फ्रस्ट्रेशन टॉलरन्स’ नावाची एक मानसशास्त्रीय संज्ञा आहे. कूकरच्या शिटीचं उदाहरण घेऊ. हळूहळू वाफ धरते आणि वेळेत गॅस बंद केला नाही तर शिटी व झाकण उडालेच समजा. ही वाफ धरून ठेवण्याची क्षमता म्हणजेच हा टॉलरन्स किंवा सहनशीलता. नेमकी हीच कमी होत चालल्याचे दिसते. म्हणजे अगदी थोडय़ाशा आगीने किंवा आगीच्या शक्यतेनेही कूकरचे झाकण उडालेच समजा. अमूक गोष्ट माझी आहे, ती मला मिळायला हवी इथपर्यंत ठीक आहे. परंतु मिळत नाही म्हणजे काय, ती मलाच (इतर कोणाला नव्हे) मिळायला हवी, हा हट्ट झाला. वस्तूचे सोडा पण एखादी परिस्थिती आपल्याला अनुकूल असावी असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतु जर ती तशी झाली नाही तर थेट ‘सहन करण्यापलिकडे आहे’ याला एखाद्या गोष्टीचे अतिरंजीकरण म्हणता येईल. ‘संपलं सगळं’, ‘मेलो, अशक्य आहे’ हे शब्द किती सहज वापरतो आपण.
मुले सर्वात अधिक निरीक्षणातून शिकतात. उद्धट बोलू नये, चिडचिड करू नये हे त्यांना शब्दांतून सांगून पुरेसे नाही. आदळआपट, भांडण, आरडाओरड ही जर घराची रीत असेल तर मूल साहजिकच तीच पद्धत शिकेल. आपल्या मनासारखे घडले नाही तर काय करायचे याचं शिक्षण अप्रत्यक्षपणे घरात व्यक्तींकडून दिवसरात्र बाळ घेत असते मग जेवणात मीठ जास्त पडले तर ओरडून प्रश्न सुटतो हे जर वडिलांकडून समजले किंवा भाजीवालीने फसवले की कचाकचा भांडायचा वसा जर आई देत असेल तर शाळेत शेजारच्या मुलाने पेन्सिल घेतली तर भांडण करण्याव्यतिरिक्त काही मार्ग असू शकतो हे समजणार तरी कसं? कार्टून बघून मुले संतापी होतात का हा प्रश्न अनेक पालक विचारतात. आगाऊ शिनचॅन पाहून मूल आगाऊपणे बोलणार हे स्वाभाविक आहे तर मग घरातील राग पाहून होणार नाही का?
संतापाच्या उद्रेकाचे अनुकरण या विषयावर बऱ्याच काळापासून संशोधन सुरू आहे. लहान मुले टीव्हीवरील िहसाचार पाहून िहसक होतात हे यात सिद्ध झाले आहे. केवळ कार्टून नव्हे तर िहसक जाहिराती-मालिका- चित्रपट, व्हिडीओ-संगणक-मोबाइलवरचे खेळ या सर्वाचा परिणाम होतो. आवडत्या नटाला तसे वागताना पाहून किंवा िहसक व्यक्तीचे कौतुक होताना पाहून तर ती अधिकच िहसक वागतात. एका सहा वर्षांच्या मुलाच्या पालकांनी कौतुकाने ‘तो अजिबात कार्टुन वगरे पाहत नाही. फक्त सीआयडी आणि क्राइम पेट्रोल पाहतो’, असे सांगितल्यावर मी चाटच पडले. मुलांना काय पाहू द्यावे याचा रिमोट पालकांच्या हाती असावा. २४तास त्यांच्यावर पाळत ठेवणे शक्य नाही हे खरे आहे. पण ते काय पाहतात, त्यांच्या मित्रमंडळींशी काय गप्पा मारतात याविषयी त्यांच्याशी गप्पा मारायला हव्या. राग ही भावना मुळात नकारार्थी नाही परंतु त्या रागाचे प्रकटीकरण कसे करायचे ते शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. समोरचा म्हणेल तर आणि तसे मान्य करणे आणि त्याच्या अंगावर धावून जाणे याच्या दरम्यानही काही मार्ग आहे. आपले म्हणणे शांतपणे परंतु ठामपणे समोरच्याला सांगता येऊ शकते. हे मार्ग मुलांना शिकवायला हवेत तर खोडी काढल्यावर फाइट मारायची गरज कमी होईल.
मानसी जोशी, मानसोपचारतज्ज्ञ