घरातील अन्य व्यक्तींना मधुमेह नसेल तर मधुमेह होत नाही?
भारतात ९५ टक्के लोक हे मधुमेहाच्या दुसऱ्या प्रकारातील आहेत. शरीरातील इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नसल्याने हा मधुमेह होतो. यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन कारणीभूत ठरते. शरीरातील जीन्समुळे काही प्रमाणात हा आजार होऊ शकत असला तरी सवयीमुळे मधुमेह होण्याची शक्यता ६० ते ७० टक्के असते. जुळ्या भावांच्या खाण्यापिण्याच्या, व्यायामाच्या सवयी भिन्न असतील तर त्यांपैकी एकाला मधुमेह होण्याची आणि दुसऱ्याला मधुमेह न होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे घरातील मोठय़ा व्यक्तींना मधुमेह नसला म्हणून गाफील राहण्याचे कारण नाही.

साखर, गोड पदार्थ खाल्ले नाहीत, तर मधुमेह होणार नाही?
हा आणखी एक गैरसमज. सर्व पदार्थामध्ये कमी-अधिक प्रमाणात ग्लुकोज असते. काही पदार्थामधील विशिष्ट घटक जिभेवर विरघळत असल्याने ते आपल्याला गोड वाटतात. मात्र एकदा गळ्याखाली पदार्थ उतरले की कोणतीही चव राहत नाही. भात, पालक, कोबी, बटाटा या सर्व पदार्थामध्ये ग्लुकोज असते. मात्र पालकसारख्या पदार्थातील ग्लुकोजचे विघटन होण्यासाठी बरीच प्रक्रिया व्हावी लागते, तोपर्यंत हा पदार्थ मोठय़ा आतडय़ापर्यंत पोहोचलेला असतो. साखर किंवा ग्लुकोज हे लगेचच पचत असल्याने थेट रक्तात मिसळले जातात. त्यामुळे एखादा पदार्थ कमी-अधिक गोड असण्यापेक्षा त्यातील ग्लुकोज किती वेगात रक्तात मिसळते ते महत्त्वाचे ठरते.

कडू पदार्थ खाल्ल्यास मधुमेह बरा होतो?
चवीचा आणि मधुमेहाचा काही संबंध नाही. गोड पदार्थाना मारक ठरणारे म्हणून अनेकदा मेथीचा रस, कारल्याचा रस घेतले जातात. मात्र गळ्याखाली अन्न उतरल्यावर चवीचा काहीच संदर्भ नसल्याने कडू-गोड पदार्थ हा केवळ भ्रम ठरतो. जांभळाचा रसही मधुमेहावर उत्तम उपाय असल्याचे बोलले जाते. मात्र यावर अजूनही संशोधन झालेले नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण किती असल्यास किती रस घ्यावा, त्याचा किती उपयोग होतो यावर अभ्यास होणे गरजेचे आहे.

मधुमेही व्यक्तींनी फळे खाऊ नयेत?
फळांमधून पोषक तत्त्वे मिळतात. त्यामुळे ती खाण्यास हरकत नाही. कच्ची फळे खावीत. कैरी, केळे, चीकू ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होतात. कलिंगड, मोसंबी, संत्रे सुरुवातीपासून तयार होऊन येतात.