एखादा रुग्ण असह्य़ दुखण्याची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे जातो. त्याच्या आजाराबाबतची माहिती जरी डॉक्टरांना विविध तपासण्यांद्वारे कळत असली तरी त्याला नेमके किती दुखते आहे याचा अंदाज त्यांना रुग्णाच्या सांगण्यावरूनच बांधावा लागतो. मात्र आता मेंदूच्या विशिष्ट प्रतिमांद्वारे दुखण्याची तीव्रता मोजणेही शक्य झाले आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बल्डर’ने केलेल्या एका अभ्यासात हे तंत्र समोर आले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले असून ‘सायन्स डेली’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मेंदूद्वारे विविध प्रकारच्या दुखण्याची जाणीव कशी जन्म घेते हे जाणून घेण्यासही या तपासणीद्वारे नवी दिशा मिळू शकेल.  दुखण्याव्यातिरिक्त एखाद्या व्यक्तीला आलेले नैराश्य, राग, चिंता अशा भावनांचेही मापन करणे या तपासणीद्वारे शक्य होऊ शकेल.
दुखण्याची तीव्रता मोजण्याच्या या अभ्यासात व्यक्तींना एका वस्तूला वाढत्या तापमानाच्या विविध टप्प्यांवर स्पर्श करण्यास सांगितले गेले. प्रथम वस्तूचे तापमान अगदी कोमट ठेवून ते हळूहळू वाढवत शेवटी अगदी जास्त ठेवले गेले. या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर सहभागी व्यक्तींच्या मेंदूच्या प्रतिमा घेण्यात आल्या. या प्रतिमांचे संगणकाच्या साहाय्याने विश्लेषण करून चटका बसण्याच्या प्रत्येक टप्प्यावर मेंदूतून उत्पन्न होणारी दुखण्याची जाणीव पाहिली गेली. दुखण्याच्या जाणिवेबाबतची मेंदूची ही प्रतिक्रिया प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी असल्याचेही या अभ्यासात दिसून आले. दुखण्याला मारक असे अ‍ॅनाल्जेसिक औषध दिल्यानंतर व्यक्तींची दुखण्याची जाणीव कमी होत असल्याचे या मापनातही परावर्तित झाले. ही तीव्रता मापन पद्धती प्रत्यक्षरित्या अंमलात येण्यास वेळ लागणार असला तरी जुनाट दुखण्यांमध्ये समाविष्ट असणाऱ्या विविध शारिरिक घटकांबाबत या मापन पद्धतीद्वारे अधिक माहिती मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात जुनाट दुखणी दूर करण्यासाठी या अभ्यासाचा नक्कीच उपयोग होईल, असा आशावाद शास्त्रज्ञानी व्यक्त केला आहे.