रक्तदान, नेत्रदानाइतकेच महत्त्वाचे पण दुर्लक्षित राहिलेले दान म्हणजे त्वचादान. पुण्यातील पहिल्या त्वचा बँकेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. ही त्वचा बँक रोटरी क्लब ऑफ खडकी, सूर्या आणि सह्य़ाद्री रुग्णालय तसेच ‘समवेदना’ या सामाजिक संस्थेच्या सहयोगाने सुरु झाली आहे. मागील वर्षभरात पंधरा रुग्णांना या त्वचा बँकेचा उपयोग झाला आहे. या दानाविषयी जाणून घेऊया या लेखात..
पुण्यात वर्षभरापूर्वी सुरु करण्यात आलेल्या त्वचाबँकेचा फायदा रुग्णांना होऊ लागला असल्याचे चित्र या बँकेच्या कार्याची माहिती घेतल्यानंतर स्पष्ट होते. रोटरी क्लब ऑफ खडकीच्या पुढाकाराने सूर्या रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या या त्वचाबँकेची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवणे, त्वचाबँकेविषयी जागरुकता करण्याचे कार्य ‘समवेदना’ ही गरजू रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत देणारी संस्था करीत आहे. या सगळ्यांच्या प्रयत्नांनी वर्षभरात या बँकेमध्ये ३६ त्वचांची भर पडली. यापैकी १५ त्वचांचा भाजलेल्या रुग्णांसाठी वापर करण्यात आला. त्वचारोपण करण्यासाठी येणारा खर्च केवळ बारा रुग्णांकडून घेण्यात आला, इतर तीनजणांना पूर्णपणे मोफत त्वचारोपण करण्यात आले. आग, इलेक्ट्रीक शॉक, रसायन अंगावर पडणे, लाइट रेडिएशनचा संपर्क अशा वेगवेगळ्या सौम्य, मध्यम किंवा तीव्र स्वरुपाच्या अपघातांमधे भाजलेल्या रुग्णांपैकी तीव्र स्वरुपाच्या किंवा फार मोठय़ा आकाराच्या जखमांनी जे रुग्ण दगावण्याची शक्यता असते त्यांना त्वचादानाद्वारे नवसंजीवनी मिळू शकते.
तीस टक्क्य़ांहून जास्त भाजलेल्या रुग्णांच्या तीव्र स्वरुपाच्या जखमांचे व्यवस्थापन करणे अधिक जिकिरीचे असते. या उपचारांमध्ये मृतवत टिशू काढावे लागतात. ते शक्य नसेल तर ड्रेसिंग करुन आतील मांस-पेशीचे बाह्य़ वातावरणापासून संरक्षण करणे, तसेच शरीरातील आवश्यक द्रव पदार्थ जखमेतून बाहेर पडण्यापासून रोखणे, योग्य प्रकारची प्रतिजैविके रुग्णाला देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जखमांचे संरक्षण होऊन त्या भरुन येण्यासाठी त्वचारोपण (स्किन ग्राफ्टिंग) करणे आवश्यक असते. ५० टक्क्य़ांहून अधिक भाजलेल्या रुग्णांपैकी रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. खोलवर झालेल्या जखमा हे याचे प्रमुख कारण. या  रुग्णांना  बाह्य़ वातावरणापासून संरक्षित ठेवण्यासाठी त्वचादानातून मिळणाऱ्या त्वचेमुळे ‘बायोलॉजिकल ड्रेसिंग’ उपलब्ध झाले आहे. बायोलॉजिकल ड्रेसिंग म्हणजे मानवी त्वचेने ती जखम आच्छादून (झाकून) टाकणे, म्हणजेच ‘स्किन ग्राफ्ट’ करणे.
त्वचादानामध्ये मृत व्यक्तीची त्वचा जशी घेतली जाते, तशीच जिवंत व्यक्तीची त्वचा घेणेदेखील शक्य असते.  जिवंत माणसाची त्वचा घेतली तर फक्त मांडी व पाठीवरची त्वचा घेतात. मूल आणि आई-वडील, नवरा-बायको, भाऊ-बहीण आवश्यकतेनुसार आपली त्वचा नातेवाइकाला देऊ शकतात, पण त्यामुळे घरातीलच भाजलेल्या व्यक्तीबरोबरच ही व्यक्तीदेखील महिना-दीड महिन्यासाठी रुग्ण होते, त्वचादान केलेल्या व्यक्तीची सेवा सुश्रुषादेखील तेवढी महत्त्वाची ठरते. त्याबरोबरच काहीही झालेले नसताना स्वत:हून ओढवून घेतलेल्या या दानामुळे मिळणाऱ्या यातना आणि त्वचादान करणाऱ्या व्यक्तीवर केला जाणारा वैद्यकीय खर्च या बाबीदेखील वाढतातच. त्यामुळे जिवंत व्यक्तींची त्वचा घेण्यापेक्षा त्वचाबँकेचा वापर करणे अधिक इष्ट.
त्वचादानाचे महत्त्व जर अधिकाधिक लोकांना पटले, घरातील व्यक्तीच्या निधनानंतर दु:ख बाजूला ठेवून त्या मृत व्यक्तीच्या त्वचेमुळे एखाद्या भाजलेल्या रुग्णाचे प्राण वाचतील, ही भावना ठेवली तर अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतील. काही वेळा भाजलेल्या व्यक्तीच्याच शरीरातील इतर भागातील त्वचादेखील वापरली जाते, पण त्यामुळे त्या व्यक्तीच्या वेदनांमध्ये कळत नकळतपणे भरच पडते. भाजलेल्या रुग्णांच्या यातना टाळायच्या असतील, तर त्वचादान हादेखील रक्तदान आणि नेत्रदान यांसारखाच दानाचा महत्त्वाचा मार्ग आहे.
त्वचादानासाठी त्वचा घेताना ती मृतदेहाचे पाय, पोट, पाठ, दंड इत्यादींवरची घेतली जाते. मुख्य म्हणजे ही त्वचा घेताना त्वचेचा केवळ थरच काढला जातो. तेथील त्वचा काढल्यानंतर फक्त खरचटल्यासारखे व्रण दिसतात. पण तेही दिसू नयेत म्हणून मृत व्यक्तीची त्वचा काढल्यानंतर सुयोग्य पद्धतीने ड्रेसिंग करुनच तो मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला जातो. कुठेही तो विद्रुप होणार नाही, याची काळजी त्वचा घेताना व नंतरही घेतली जाते. यासाठी मृत व्यक्तीने त्वचादानाचा फॉर्म भरलेला असायलाच हवा, अशी सक्तीही नाही. त्वचादानाचा अर्ज मृताचा नातेवाईकदेखील भरु शकतो. एखाद्याच्या निधनानंतर नातेवाइकाची परवानगी मिळाल्यानंतर सहा तासांच्या आतच त्वचा काढावी लागते. एका व्यक्तीकडून सुमारे १.५ ते १.६ चौ.मीटर त्वचा मिळते. ही त्वचा काढल्यावर त्या मृताचे २० सी.सी. रक्तही काढले जाते. मृत व्यक्तीला संसर्गजन्य आजार नसल्याची खात्री करुन घेतल्यानंतरच त्वचा घेतली जाते. त्वचा वापरात आणण्यासाठी आवश्यक प्रक्रियेचा एक भाग म्हणून रक्ततपासणी करुन इतर संसर्गजन्य आजार नाही ना, याची खात्री केली जाते. कॅन्सर, एच.आय.व्ही., हिपॅटायटिस, त्वचारोग सापडल्यास ती त्वचा नष्ट केली जाते. अशा कोणत्याही प्रकारच्या आजारांपासून मुक्त असणारी त्वचा वापरण्यापूर्वी सुमारे दीड महिना त्यावर प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेनंतर त्या त्वचेचा आकार, इतर माहिती यांचे कोडींग करुन ही त्वचा पेढीत (बँकेत) ग्लिसरोल या रासायनिक माध्यमात फ्रिजमध्ये ठेवली जाते.ही त्वचा पुढे साडेतीन वर्षांपर्यंत कधीही वापरता येते.
सगळ्या प्रक्रियांमधून पार पडलेली त्वचा भाजलेल्या व्यक्तीसाठी वापरताना, त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असल्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. हे त्वचारोपण रुग्णांच्या जखमांनुसार केवळ पंधरा दिवस ते तीन आठवडे इतक्याच कालावधीपर्यंत रुग्णाच्या शरीरावर राहते, नंतर ते झडून जाते.साध्या, सोप्या भाषेत बोलायचे झाले तर एखादी जखम भरेपर्यंत ज्या पद्धतीने आपण वेळोवेळी ड्रेसिंग करतो व जंतुसंसर्ग होऊ नये, याची काळजी घेतो, त्याच पद्धतीने केवळ ड्रेसिंग करण्यापुरतीच ही त्वचा वापरली जाते.
त्वचादानातून घेतलेली ही त्वचा म्हणजे,काही कालावधीसाठी घेतलेल्या  कवचकुंडालासारखी असते. आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांचे रक्षण करणारी ही त्वचा जणू पांघरुणासारखीच असते. शरीराचे तापमान योग्य राखणे, शरीराच्या अवयवांचे उन, पाऊस तसेच जखमांपासून संरक्षण करणे, पाण्याचे बाष्पीभवन थांबवणे आणि अशी अनेक कामे त्वचा करीत असते. आपल्याला या त्वचेचे महत्त्वदेखील आपण जिवंत आहोत तोपर्यंतच; आपल्या निधनानंतर या त्वचेचा आपल्याला काहीच उपयोग नाही, हे आपण निश्चितपणाने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच आपल्या त्वचेची योग्य काळजी घेण्याबरोबरच आपली त्वचा आपल्या मृत्यूनंतरही उपयोगी पडेल, या हेतूने त्वचादानासाठी सज्ज झाले पाहिजे.

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !