सर्वानाच आनंदी व्हायचं असतं. पण हा आनंद नक्की कशामुळे मिळतो याची हमी कुणी देऊ शकतं का? आनंदी जगायला नक्की काय लागतं? अधिकार? मित्रमंडळी? कुटुंबीय? आज नोकरी टिकवणं अथवा करिअरमध्ये आगेकूच राखणं अधिकाधिक जिकिरीचं बनत चाललं आहे. या स्पर्धात्मक वातावरणात दिवसाचे सर्वाधिक तास कामात व्यतीत होत असतात आणि हे काम दमछाक करणारं असतं. अशा वातावरणात आनंदी राहण्यासाठी एका फॉम्र्युलाचे पालन करणं आवश्यक आहे.

* आरोग्य-
दैनंदिन वेळापत्रक कितीही व्यग्र असलं तरी फिटनेस राखण्यासाठी जरूर वेळ काढा. वेळच्यावेळी खाणं आणि व्यायाम या गोष्टी कामाचा उत्साह, दर्जा राखण्यासाठी आवश्यक असतात. आरोग्याशिवाय कुणीही सुखी होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. व्यायामामुळे ताणतणाव, संताप, नराश्य कमी होतं
आणि स्वत्वाची भावना, आत्मविश्वास आणि विचारशक्ती वाढते.
* स्वातंत्र्य-
आपलं स्वातंत्र्य मग ते विचारस्वातंत्र्य असो वा वागण्याचं स्वातंत्र्य, ते जपा. दुसऱ्या कुणालाही तुमचं स्वातंत्र्य हिसकावून घ्यायला देऊ नका. मग ते तुमचे कुटुंबीय असोत, मित्रमंडळी असोत वा तुमच्यावर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या इतर कुणी व्यक्ती.. समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी आपल्या स्वातंत्र्याची जपणूक करणं गरजेचं आहे.
* योग्य निवड महत्त्वाची-
एखादा निर्णय घेताना आपल्यासमोर नेहमीच अनेक पर्याय असतात. मग तो निर्णय करिअरसंबंधीचा असेल, मित्रमंडळी निवडण्यासंबंधीचा असेल किंवा सहचर निवडीबाबतचा असेल.. कोणताही पर्याय निवडण्याआधी तुमची मूल्यं, प्राधान्यक्रम, गरजा आणि इच्छा लक्षात घ्या. करिअर निवडताना तुम्हाला त्या कामाचं स्वरूप पटतंय, आवडतंय का, ते लक्षात घ्या. शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा ते करिअर निवडणं योग्य ठरेल, याकडे लक्ष पुरवा.
* स्वप्रयत्नांवर विश्वास ठेवा-
शिक्षण क्षेत्रात अथवा करिअरमध्ये काहीतरी संपादन करण्याचा आपला उद्देश असतो. मात्र ध्येय गाठण्याच्या मधल्या टप्प्यात आपल्याला लोक काय म्हणतील याची भीती वाटत असते आणि समोरच्यांच्या विरोधाच्या भीतीने तसेच अपयशाच्या भीतीने आपण प्रयत्न सोडून देतो. असे करू नका. आपल्या स्वप्नांवर आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास बाळगून वाटचाल करत राहणे यश मिळवण्यासाठी आवश्यक असते.
* नकारात्मक व्यक्तींकडे दुर्लक्ष करा-
आपल्या भोवताली नकारात्मक विचारांच्या काही व्यक्ती असतात, ज्या तुमच्या प्रयत्नांवर पाणी फिरवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करा.
काही व्यक्ती आपण किती स्मार्ट आहोत, यावर इतरांनी विश्वास ठेवावा, यासाठी प्रयत्नशील असतात. सगळ्या समस्या सोडविण्याचा आपल्याकडे जणू फॉम्र्युला आहे असा त्यांचा दावा असतो. अशांच्या बोलण्यावर भाळून त्यांचे शिष्यत्व स्वीकारायचे टाळा. कुठलीही समस्या असो, ती सोडवण्याचा कुठला शॉर्टकट नसतो हे ध्यानात ठेवा.
* आलेला क्षण जगा-
खुलेपणाने जगा. मौजेचे क्षण पुढे ढकलू नका. तुमचं काम, त्यातल्या समस्या, शिकण्याचा अनुभव आणि तणाव हेही एन्जॉय करा. छोटे छोटे यशाचे क्षण साजरे करा.

ओशोंनी एकदा म्हटलं होतं- भूतकाळ संपलेला असतो आणि भविष्य दूर अंतरावर असतं. आपण केवळ या क्षणी आणि या क्षणापुरतं इथे असतो. आलेला क्षण तुम्ही तुमचा या पृथ्वीवरचा शेवटचा क्षण असल्यासारखा जगा. प्रतिकूल परिस्थितीतही सुखाने जगण्यासाठी हे सारे आवश्यक घटक ठरतात. आपल्याला केवळ सकारात्मक भावभावना विकसित कराव्या लागतात. खरं तर तुमचं आयुष्य अधिकाधिक उत्तम करण्याची सर्वाधिक जबाबदारी तुमची आहे. त्यासाठी आयुष्यात महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोष्टींची निवड स्वत: करण्याचा हक्क बजावा आणि आयुष्यात प्रत्येक वेळेस सुखाची, आनंदाची निवड करा.