पदवी-पदविका, मुलाखत, एखादी नोकरी, व्यवसायात शिरण्याचा विचार.. यातील काही टप्पे पार करीत आपण एका ठिकाणी पोहोचतो. आत्तापर्यंत मिळवलेली शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता म्हणजे पुढच्या स्तराच्या दारापर्यंत पोहोचवणारा जणू गेटपास असतो. मात्र, ही करिअरची सुरुवात असते. त्यापुढचे कित्येक स्तर पार करून कल्पनेतल्या यशाच्या शिखरापर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं. त्यासाठी लागणारी विशिष्ट भावनिक, बौद्धिक ताकद आपल्यात आहे याची आपल्याला खात्री असते खरी! मात्र, पुढचा स्तर असतो, तो आपल्यात दडलेली क्षमता ओळखून-वापरून-वाढवून स्वत:ला सिद्ध करण्याच्या सक्षमतेचा! या प्रवासात आणखी काही सोबती मिळवावे लागतात. ते म्हणजे आत्मविश्वास, दर्जा आणि सातत्य, अनुभव, कष्टांची तयारी, कौशल्ये आणि सकारात्मक विचारशक्ती!

कौशल्य, आत्मविश्वास आणि अनुभव  हा क्षमता बांधणीमधला अविभाज्य भाग आहे. एखाद्या विषयात आत्मविश्वास येण्यासाठी, तो वाढण्यासाठी त्यामध्ये कौशल्य मिळवावं लागतं. कौशल्यासाठी माहिती आणि सराव लागतो. क्षमता पुन:पुन्हा वापरून पाहणं म्हणजे सराव. उदाहरणार्थ- आपल्याला आपलं म्हणणं थोडक्यात व नीटनेटके मांडण्याची क्षमता वाढवायची आहे. मनातल्या भीतीला थोडा वेळ बाजूला ठेवून संधी मिळेल तिथे बोलण्याचे धाडस केलं पाहिजे किंवा संधी निर्माण होतील असे प्रयत्न केले पाहिजेत. मग अनुभवातून कौशल्य वाढतं. क्षमताबांधणीमध्ये अनुभवासोबत जाणीवपूर्वक असणारी कष्टांची तयारीदेखील अध्याहृत असते.

आव्हान, संधी आणि सृजनशीलता
बाहेरच्या परिस्थितीच्या संदर्भात आपण कुठे उभे आहोत याचं त्रयस्थ व प्रामाणिकपणे भान ठेवलं की तक्रार आणि भीतीची जागा ‘जाणीव’ घेते. समजा, सध्या बाजारात मंदी आहे तर याचा अर्थ असाही असू शकतो की ‘आता मला पूर्वीपेक्षा दुप्पट काम करावं लागणार आहे. रूढ पद्धतींपेक्षा वेगळय़ा पद्धती वापरायला लागणार आहेत.’ हे लक्षात घेऊन कामाचं नियोजन केलं की तक्रार उरत नाही. नवे सृजनशील मार्ग शोधणं हे आता बुद्धीसाठी आव्हान बनतं. कष्ट जास्त पडले तरी मजा येते, कारण आपली क्षमता नव्या दिशांनी वापरली जाते, चतुरस्र वाढते.

क्षमतेबद्दलच्या स्वकल्पना
स्वत:च्या क्षमतेबद्दल आपल्या मनात काही कल्पना असतात. ‘माझ्यातली क्षमता दिसते त्यापेक्षा खूप जास्त आहे’ असं जवळपास प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. मात्र, प्लेसमेंट किंवा मनुष्यबळ विकास विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं याबाबतचं मत असतं- काही ना काही करण्याची क्षमता (पोटेन्शिअल) प्रत्येक व्यक्तीत असते खरी. पण खरी समस्या असते ती स्वत:चं ‘पोटेन्शिअल’ ओळखून, सातत्याने वापरून आपली क्षमता वृद्धिंगत करणारे सापडत नाहीत ही!
‘करीन तर हजाराला भारी.. पण वेळेला घात करी’ असंच बहुतेकांचं असल्याने एकीकडे हजारोंच्या संख्येने बेकार युवावर्ग तर दुसरीकडे योग्य कौशल्यप्राप्त व्यक्तींची कायमच कमतरता भासणारी क्षेत्रे, असा टोकाचा विरोधाभास आपल्याला दिसतो.

दर्जा, सातत्य आणि सहजता
क्षमता बांधणीसाठी कामाचा दर्जा राखणे अत्यावश्यक असते. क्षमता मोजताना सातत्य अभिप्रेत आहे, हे विसरलो तर ‘माझ्या पोटेन्शिअलएवढं मला मिळत नाही’ ही भुणभुण मनात कायम राहते. नियोजनशून्य घिसाडघाई कायमची अंगवळणी पडली तर त्यातून सततचं दडपण ही जीवनशैली बनते. संपूर्ण कामाचा किंवा एक-दोन वर्षांचा एक टप्पा म्हणून विचार केला तर समाधानापेक्षा अस्वस्थतेची सोबत जास्त असते आणि त्यामुळे कामात दर्जा, सातत्य आणि सहजता राहत नाही.

मोजता येण्यासारखं आटोक्यातलं ध्येय
* क्षमता वाढवण्यासाठी कृती हवी, कृतीला दिशा मिळण्यासाठी ध्येय हवं. हे ध्येय मोजता येण्यासारखं आणि आटोक्यातलं हवं.
* ‘खूप काम करायचंय/खूप मोठं व्हायचंय’ असली ध्येयं फसवी असतात. ‘मी नेमकी काय कृती करणार आहे?’ ते त्यातून स्पष्टच होत नाही। सध्या मी ज्या टप्प्यावर आहे तिथून एक पाऊल पुढे नेणारी जी पहिली छोटी कृती आवश्यक आहे, ते पहिलं ‘छोटं आणि आटोक्यातलं’ ध्येय. उदा.‘येते ८ दिवस मी रोज पहाटे पाचला उठून दोन तास अभ्यास करेन’ असं काही तरी ‘मेजरेबल आणि रीझनेबल’ ध्येय हवं. ‘मी वर्षभर रोज आठ तास अभ्यास करेन’ असलं अशक्य ध्येय नको, जे ठरवतानाच भीती वाटेल. प्रत्यक्षात आठातले पाच दिवस जरी ठरवल्याप्रमाणे घडलं तरी त्यातले फायदे जाणवतात.
* आपण ठरवलं ते करू शकलो यातून आत्मविश्वास वाढतो, आठवडय़ाभरात पहाटे उठायची सवय लागली की पहिला टप्पा पार झाला. मग पुढच्या टप्प्यासाठीचं छोटं ध्येय ठरवायचं.
* या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं ध्येयाकडे जायला लागल्यावर हळूहळू त्यातले बारकावे कळायला लागतात. नवे रस्ते सापडायला लागतात, सर्जनशीलता वाढते, रस वाढतो आणि आपोआपच सातत्यदेखील येतं.
* सक्षम किंवा पारंगत होणं हा एक मुक्काम नसतो, तर सतत चालणारी प्रक्रिया असते हे अनुभवातून उमगतं.

मनाची स्वसंरक्षण यंत्रणा
* आपल्या रेंगाळण्यामुळे परिस्थिती अगदी गळय़ाशी आल्यानंतर रात्रंदिवस अभ्यास / काम करण्याला पर्यायच नसतो. चालढकल करणे शक्य नसते, तेव्हा मनाची स्वसंरक्षण यंत्रणा जागी होते. मात्र, अनेकदा आपण वेळेवर काम करत नाही/ केलं नाही हे मान्य करण्याऐवजी, शेवटच्या टप्प्यात रात्रंदिवस काम केल्याचा अभिमान अनेकदा बाळगला जातो. आणि मग ‘शेवटच्या क्षणाच्या एवढय़ा दडपणातदेखील मी मारून नेलं’ यावर फुशारकी मारता येते. शिवाय, ‘मी करायचं ठरवलं तर काहीही करण्याची धमक (पोटेन्शिअल) माझ्यात आहे’, ‘एवढय़ा कमी वेळात इतकं काम देऊ शकत असेन, तर नियोजनपूर्वक केल्यावर मी कुठल्या कुठे पोहोचेन?’ अशी स्वत:च्या सक्षमतेच्या प्रमेयाची तिरपागडी सिद्धतादेखील मांडता येते.

* खरं तर हे कल्पनारंजन म्हणजे स्वत:ला कुरवाळणं आहे. शेवटच्या क्षणी आपल्याकडून घडतं तसं जबरी काम आपण सलग महिनाभर करू शकत नाही, हे मान्य केलं तर आपण आपल्या क्षमतेपर्यंत वस्तुनिष्ठपणे जाऊ शकू.
* कधी कधी खरोखरीच वेळ थोडा आणि लक्ष्य मोठं असतं तेव्हा रात्रंदिवस काम करावंच लागतं हे खरं, पण तो अपवाद असावा.

आळस / टाळाटाळ / चालढकल
आपल्यात दडलेल्या क्षमतेचं रूपांतर करता न येण्याचं मुख्य कारण अनेकदा ‘आळस’ हेच असतं. ‘पुढे जायचं असेल तर चालायला हवं. आपण जेवढी पावलं टाकू तेवढे आपण पुढे जाणार’ हे तत्त्वत: सर्वानाच माहीत असतं. पण टाळाटाळ, चालढकल हे आळसाचे भाऊबंद सतत मध्ये येतात.
परीक्षा/ सादरीकरण ऐन तोंडावर आल्याशिवाय बहुतेकांना जाग येत नाही. कामाबाबत चर्चा करणं हे अनेकदा काम समजलं जातं. वर कॅन्टीनमध्ये / चर्चा-चर्चा खेळण्यामध्ये गेलेला पुष्कळसा वेळ ‘कामासाठीच’ घालवला असं आपण स्वत:लादेखील भासवतो. आळसावर पांघरूण घालताना आपण कुठलीही समर्थनं देत असलो तरी स्वत:च्या सक्षमतेच्या बाता मारण्यात ‘वेळ निघून जाते’ ही वस्तुस्थिती असते.