पाककौशल्याच्या आधारे पदार्थ बनवून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना आज अनेक संधी उपलब्ध आहेत. अलीकडे अनेक छोटे-मोठे समारंभ साजरे करतेवेळीसाठी कॅटिरगची सेवेची मदत घेतली जाते. पाककौशल्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना कॅटिरग क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. पाककौशल्याला चालना देणारा अभ्यासक्रम मुंबईस्थित इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटिरग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड अप्लाइड न्यूट्रिशन या संस्थेने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा आहे. जुल ते सप्टेंबर आणि जानेवारी आणि मार्च अशा दोन बॅचमध्ये हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचे शुल्क ३० हजार रुपये आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर स्वयंरोजगारासमवेत मोठी हॉटेल्स, छोटी उपाहारगृहे, गेस्ट हाऊसेस आदी ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात.
पाककौशल्य विषयक अभ्यासक्रमात कॅटिरग व्यवसायाला उपयुक्त ठरतील अशा बहुतेक सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय आणि कॉन्टिनेन्टल खाद्यपदार्थ कसे बनवायचे, सलाड कसे तयार करायचे, पदार्थाची सजावट आदी गोष्टी शिकवल्या जातात. डेझर्ट्स बनविण्याचेही प्रशिक्षण दिले जाते.
भारतीय पद्धतीची स्टार्टर्स, विविध भातांचे प्रकार, विविध गोड पदार्थ, २० प्रकारच्या नॉन-व्हेज डिशेस तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, सांबार तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. कॉन्टिनेन्टल, इंटरनॅशनल, चायनीज, इटालियन, फ्रेंच, मेक्सिकन, ब्रिटिश प्रकारच्या खाद्यप्रकारांमध्ये कौशल्य प्राप्त करता येण्याच्या दृष्टीने विविध पदार्थ शिकवले जातात.
संस्थेचा पत्ता- इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,
कॅटिरग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड अप्लाइड न्यूट्रिशन,
व्ही.एस. मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- ४०००२८.
वेबसाइट-  www.ihmctan.edu 
ई-मेल-  info@ihmctan.edu