अनेकांना ठरावीक दिनक्रम पाळणे म्हणजे रुटीनमध्ये अडकणे आणि त्यामुळे सर्जनशील मनावर र्निबध येणे असे वाटते. रुटीन हे कंटाळवाण्या, कॉर्पोरेट, आपल्या भावना व्यक्त करू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी आहे, मुक्त विचारांच्या व्यक्तींसाठी नाही, अशीही एक गैरसमजूत असते. मात्र लक्षात घ्यायला हवे, की दररोज काय करायचे आहे आणि कुठल्या क्रमाने, हे एकदा का तुम्हाला समजले की तुमचे मन पुढची कामे आपोआप करते आणि तुम्ही अधिक महत्त्वाची कामे करण्यासाठी मुक्त होता. निरीक्षण करा- आपल्या रुटीनचे निरीक्षण करा. कुठला वेळ तुम्ही अधिक चांगला वापरू शकता, कुठली कामे बाजूला सारून तुम्ही तो वेळ दुसऱ्या कशासाठी वापरू शकता याचा विचार करा. वेळेची गणना- तुमच्यापाशी किती वेळ असतो, कुठल्या कामासाठी किती वेळ लागतो, हे लक्षात घ्या. तुमची कामे अधिक सुरळीत होण्यासाठी ती कामे सक्षमतेने उरका किंवा अधिक लवकर उठा. कामांची यादी करा- कुठली कामे करायची आहेत यांची यादी बनवा आणि त्यातील प्राधान्यक्रम ठरवा. त्यासाठी लागणारा वेळ ध्यानात घ्या. नोंद करा- निरीक्षणाअंती ज्या गोष्टी हाती आल्या आहेत, त्या नमूद करा. उदा. सकाळची कामे, संध्याकाळची कामे इत्यादी. दिनक्रमात बदल- तुमच्या दिनक्रमात बदल करायचा असल्यास त्यात वेगळ्या गोष्टींचा समावेश करावा लागेल. त्यासाठी तुमच्या कामांची पुनर्माडणी करा. काही कामे वगळावी लागतील.