lp26श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंदाचं प्रतीक. सृष्टीचा सृजनोत्सव. हिरवाईच्या विविध छटांचा, फुलांच्या रंगगंधांचा उत्सव.. सगळी सृष्टीच तो साजरा करत असताना आपण तरी मागे कशाला राहायचं? चला तर श्रावणाच्या रंगात रंगू या..

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे जरी असले तरी आपण सर्वजण नेहमीच पावसाची आतुरतेने वाट पाहतो. वाट पाहण्याची कारणे प्रत्येकाची वेगवेगळी असतात. उदा. शेतकरी आपल्या शेतीसाठी, सर्वसामान्य उन्हाच्या काहिलीतून सुटका होण्यासाठी, पिण्याच्या पाण्याच्या त्रासातून सुटका होण्यासाठी, शाळेतील मुले सुट्टीसाठी (अर्थात मराठी माध्यमातून शिक्षण घेणारी), किशोरवयीन भटकंती करण्यासाठी, तसेच स्त्रिया येणाऱ्या सणांसाठी. इतकेच कशाला आपले सरकारदेखील पाऊस व्यवस्थित पडावा याची वाट पाहात असते. कारण आपले अर्थकारणदेखील या पावसावर अवलंबून असते. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आपण आजही काही गोष्टींसाठी निसर्गावर अवलंबून आहोत. यात पावसाचा क्रमांक फार वरचा आहे.
‘पाऊस पडणे’ या एकाच घटनेत देखील किती वैविध्य असते. कधी फक्त पाऊस तर कधी साथीला विजा आणि गडगडाट. कधी संथ तर कधी मुसळधार. ‘विविधता’ हा तर जणू निसर्गाचा अविभाज्य भाग. याला पाऊस तरी कसा अपवाद असेल? पावसाने आषाढात भरपूर मेहनत केल्यामुळे पुढे येणारा श्रावण महिना हा थोडय़ा विश्रांतीचा महिना असतो. आषाढात मुसळधार कोसळणारा पाऊस श्रावणात रिमझिम पडू लागतो. धरतीने जणू हिरवा शालू नेसला आहे असे सर्वत्र हिरवा रंग पसरल्याने वाटते. एवढे सुंदर वातावरण असेल तर कवींनाही सुंदर गाणी सुचणे अगदी स्वाभाविक आहे. साहजिकच या श्रावणाची सुंदर गाणी लिहिली गेली आहेत. आणि ही गाणी ऐकवून श्रावण सुरू झाला आहे याची आठवण जणू काही रेडिओ करून देतो. कितीतरी छान गाणी/कविता आहेत श्रावणावरती. ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात’, ‘हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला’ इ. हिंदीत देखील ‘सावन का महिना पवन करे सोर’, ‘आया सावन झुमके’, ‘सावन को आने दो’, ‘रिमझिम गिरे सावन’, ‘सावन के झुले पडे तुम चले आओ’ अशी अनेक सुंदर गाणी आहेत.
माझ्या आठवणीतला श्रावण आहे तो मात्र ‘प्राजक्तांच्या फुलांचा.’ माहेरच्या अंगणात असणाऱ्या या झाडाला श्रावणाच्या आसपास भरपूर फुले येत असत. रात्री ओटीवरच्या झोपाळ्यावर बसले की या फुलांचा मंद सुवास वाऱ्याच्या झुळुकेबरोबर येत असे. तो सुवास मला प्रचंड आवडे. अजूनही कुठे मोठे फुललेले प्राजक्ताचे झाड पाहिले की हटकून त्या झाडाची आठवण येते. सकाळी झाडाखाली खूप छान असा फुलांचा सडा पडे. त्याचे हार करणे हाही एक नेहमीचा उद्योग असे. कधी जर झाडाखाली फुले कमी दिसली तर झाड हलवून आम्ही फुले पाडत असू. झाडावरून पडणारी फुले पाहणे हेदेखील गमतीचे असे. जणू काही ‘टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’ या गाण्याचा अनुभव घेत असू. अंगणात भरपूर झाडे असूनही बुलबुल नेमके याच झाडावर घरटे करीत असे. घरटय़ात अंडी घातल्यावर आमचे झाडाजवळ जाणे जवळजवळ बंद होत असे कारण झाडाजवळ गेल्यास बुलबुल ओरडून गोंधळ घालत असे.
श्रावण महिना हा सण आणि व्रतवैकल्य यांचा महिना. नागपंचमी, श्रावणी सोमवार, जरा – जिवंतिका पूजन, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, पोळा, पिठोरी अमावास्या इ. याच महिन्यात असतात. यातील नागपंचमीचा दिवस तर अजूनही लक्षात आहे. पाटावर तांदळाने काढलेले नाग, त्यांची केलेली पूजा हे सर्व पाहावयास, अनुभवण्यास मजा येत असे. या निमित्ताने नाग-सापांचे महत्त्व पटवून देत असत. हे सर्व जरी खरे असले तरी मुळातच मला वळवळणारे प्राणी फारसे आवडत नसत त्यामुळे जरी पाटावरती काढलेले नाग आवडत असले तरी प्रत्यक्षात फारसे कधी आवडले नाहीत. अर्थात त्यामुळे त्यांचे महत्त्व काही कमी होत नाही हेही तितकेच खरे.
या सणांसाठी लागणारी पाने, फुले हे फक्त शोभेसाठी नसून यांचे औषधी महत्त्वदेखील आहे. एकंदरीतच काय, तर हे सण आपल्याला जणू काही संदेश देत असतात ‘निसर्गाकडे चला, निसर्ग वाचवा.’
मेघना शहा

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी