जि. प. माध्यमिक विभागाच्या वादग्रस्त शिक्षणाधिकारी लता सानप यांना शिक्षण आयुक्तांनी निलंबत केल्याचे आदेश महिनाभरापूर्वीच बजावले. निलंबन काळात बदली न करण्याचा नियम असला, तरी दोन दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने निलंबित सानप यांची औरंगाबाद येथे निरंतरच्या शिक्षणाधिकारीपदी बदली केल्याचे आदेश जारी केले. वजन वापरून निलंबत काळात बदली झाल्याचे समोर आल्यानंतर नाचक्की टाळण्यासाठी शिक्षण विभागाने रात्रीतून बदली आदेश रद्द करून चुकीने बदली झाल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; तरीही मंत्रालयातील सावळ्या गोंधळाचे पुन्हा दर्शन झालेच!
माध्यमिक शिक्षणाधिकारी सानप यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिक्षण आयुक्तांनी सानप यांच्या कारभाराची चौकशी केली. यात शासकीय कामकाजातील अनियमितता, विनापरवानगी गरहजर राहण्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी यांनी ४ जूनला सानप यांना निलंबित करण्याचे आदेश बजावले. दोन वर्षांच्या कालावधीत कायम वादग्रस्त असलेल्या सानप यांनी निलंबन आदेशानंतरही शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसत असल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान, आपल्यावर जाणीवपूर्वक कारवाई झाली. त्यामुळे सानप यांनी वरिष्ठ पातळीवर आपले वजन वापरून बदली करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून शालेय शिक्षण विभागाने ३० जूनला महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ प्रशासन शाखाअंतर्गत सानप यांची औरंगाबाद जि. प.मध्ये निरंतर शिक्षण विभाग शिक्षणाधिकारीपदी बदली करण्यात आल्याचा आदेश बजावला.
प्रशासकीय कारणास्तव बदली केल्याचे नमूद केले असले, तरी निलंबन काळात बदली झाल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला. शिक्षणमंत्री विनोद तावडे एका प्रकरणात अडचणीत आले असतानाच निलंबित शिक्षणाधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट येईल, हे लक्षात येताच दुसऱ्याच दिवशी बुधवारी नव्याने आदेश काढून सानप यांचा बदली आदेश रद्द करण्यात आला व बदली नजरचुकीने झाल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने केला. परंतु तरीही या प्रकरणाने मंत्रालयातील कारभार पुन्हा चव्हाटय़ावर आला.