काही ठिकाणी मदरशांमध्ये झालेला विरोध, शिक्षकांची नाराजी अशी अडथळ्यांची शर्यत पार करत राज्यभरात शाळाबाह्य़ मुलांचा शोध घेण्याची मोहीम शनिवारी पार पडली. मात्र, मदरशांमध्ये शालेय विषय शिकवण्याबाबतचा रकानाच माहितीपत्रात नसल्यामुळे या माहितीची कशी नोंद करायची याबाबत प्रगणकच संभ्रमात होते. राज्यातील बहुतेक जिल्ह्य़ांमध्ये शाळांना या सर्वेक्षणासाठी सुट्टीच देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा असलेल्या मुंबईत साधारण ७ हजार मुले शाळेपासून वंचितच असल्याचे समोर आले.
सकाळी ७ वाजल्यापासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली. बहुतेक ठिकाणी रात्री ८ वाजेपर्यंत सर्वेक्षणाचे काम सुरू होते. प्रत्येक १०० कुटुंबांसाठी एक प्रगणक नियुक्त करण्यात आला होता. राज्यातील काही भागांमध्ये मदरशांमध्ये तपासणी करण्यासाठी प्रगणकांची अडवणूक झाली, तर काही ठिकाणी अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये रमझान सुरू असल्यामुळे सकाळच्या वेळी माहिती गोळा करण्यासाठी प्रगणकांना अडचणींना सामोरे जावे लागले.
मदरशांमध्ये शालेय अभ्यासक्रमातील विषयांचे शिक्षण देण्यात येते का, याचीही पाहणी करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या होत्या. मात्र, माहिती भरण्यासाठी दिलेल्या प्रपत्रात मदरशांची तपशिलात माहिती देण्यासाठी रकानाच नसल्याचे काही प्रगणकांनी सांगितले. त्यामुळे हे विद्यार्थी शाळाबाह्य़ ठरणार का, याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. मिरज, सांगली या भागातील काही मदरशांमध्ये विज्ञान, गणिताचे शिक्षण दिले जाते. मात्र, नियोजित अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जात नसल्याचे सर्वेक्षणादरम्यान दिसून आले.
मुलांच्या बोटाला शाई लावण्यावरून पालकांनी घेतलेल्या आक्षेपांनंतर सर्वेक्षणात सगळीकडे मार्कर वापरण्यात आले.  नाशिकमध्ये वेळेपूर्वीच सर्वेक्षण पूर्ण झाले. पुण्यातील अनेक भागातील बांधकामांची ठिकाणे, सिग्नलवर काम करणारी मुले यांच्यापर्यंत प्रगणक पोहोचलेच नाहीत.
एकीकडे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उपलब्ध असतानाही मुंबई महानगरीतील सात हजाराहून अधिक मुले शाळेची पायरी चढू शकलेली नाहीत. सहा ते १४ या वयोगटातील ३९८६ मुलगे व ३३०५ मुली शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळले. पालिकेच्या शाळांमधील ८३९२ विद्यार्थ्यांनी शाळा अर्धवट सोडली असल्याचे समोर आले आहे. या पाहणीत बालकांच्या नोंदीसोबतच अपंगत्व, बालकामगार, शाळा सोडली असल्यास पूर्वीची शाळा यांचीही नोंद घेण्यात आली आहे.